चेल्ग्रेन, यूहान हेन्रिक: (१ डिसेंबर १७५१–२० एप्रिल १७९५). स्वीडिश कवी आणि समीक्षक. व्हेस्टर्यट्लँडमधील फ्लूब्यू येथे त्याचा जन्म झाला. फिनलंडमधील ओब्यू (टर्क्यू) येथे त्याचे शिक्षण झाले आणि सौंदर्यशास्त्राचा अधिव्याख्याता म्हणून त्याने तेथे काम केले. १७७८ मध्ये Stockholmsposten ह्या वैचारिक नियतकालिकाची त्याने स्थापना केली आणि त्याचा तो अनेक वर्षे संपादक होता. अठराव्या शतकातील बुद्धिवादाचा आणि नव-अभिजाततावादाचा त्याच्यावर प्रभाव होता. तर्कशुद्ध विचारसरणीचा हिरिरीने पुरस्कार करून तत्कालीन स्वीडिश समाजातील उमराव, धर्मोपदेशक इत्यादींवर तसेच अंधश्रद्धा व गूढवाद यांवर त्याने उपरोधपूर्ण टीका केली. स्वीडनचा राजा तिसरा गस्टेव्हस ह्याने पुरविलेल्या कथानकांवरून त्याने काही पद्यनाट्ये लिहिली. Gustaf Vasa(१७८६) ही देशभक्तिपर संगीतिका लिहिण्यासाठी तिसऱ्या गस्टेव्हसला त्याने सहकार्य दिले. ह्याच वर्षी गस्टेव्हसचा खाजगी चिटणीस म्हणून त्याची नेमणूक झाली, तसेच गस्टेव्हसने स्थापन केलेल्या ‘स्वीडिश अकादमी’च्या पहिल्या १८ सदस्यांत (१७८६) त्याचा अंतर्भाव करण्यात आला. चेल्ग्रेन हा आरंभी नव-अभिजाततावादाचा पुरस्कर्ता असला, तरी पुढे तो स्वच्छंदतावादाकडे झुकल्याचे दिसते. Den nya skapelsen(१७८९, इं. शी. द न्यू क्रिएशन) हे त्याचे दीर्घकाव्य त्या दृष्टीने लक्षणीय आहे. स्टॉकहोम येथे तो निवर्तला.  

मेहता, कुमुद