तैगा : तैगा हा तुर्की–रशियन शब्द असून त्याचा अर्थ पाणथळ जागेतील सूचिपर्णी अरण्ये असा होतो. चिलीचा अगदी दक्षिणेकडील भाग व न्यूझीलंडच्या दक्षिण बेटातील अपवाद वगळता तैगा प्रदेश फक्त उत्तर गोलार्धात आढळून येतात. उत्तर अमेरिकेत तैगाचा विस्तार सु. ५५° उ. ते ६६° ३० उ. अक्षांशापर्यंत आढळतो. यामध्ये अलास्का, कॅनडाचा सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापर्यंतचा व त्यापलीकडे लॅब्रॅडॉर व न्यू फाउंडलंडपर्यंतचा प्रदेश येतो, तर युरोप खंडात तैगाचा विस्तार ६०° उ. ते ६६° ३० उ. असून त्यात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश व युरेशियाचा काही भाग येतो. आशियाच्या उ. भागात ५०° उ. अक्षांशापासूनच तैगा प्रदेशाला सुरूवात होऊन आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस तो पसरलेला आढळतो. यात कॅमचॅटका द्वीपकल्पाचा समावेश होतो. (नकाशा मुख्य तैगा प्रदेश दर्शवितो).

हवामान : अतिशीत हिवाळे, सोसाट्याचे वारे, हिमवृष्टी, बेताचा पाऊस व उन्हाळ्यातील दीर्घकाळ टिकणारे प्रकाशमान या सर्व गोष्टींचा तगातील वनस्पतींवर परिणाम होतो. खंडांतर्गत शीत व विषम हवामानाच्या प्रदेशात तैगातील वनस्पतींची वाढ होते. तैगा प्रदेशातील हिवाळे दीर्घकाळ टिकणारे (८ ते ९ महिने) व अतिथंड असतात. हिवाळ्यात तपमान गोठण बिंदूखाली –३०° ते ४०° से. पेक्षाही कमी असते. अशा ठिकाणी सूचिपर्णी वृक्षांखेरीज इतर वृक्ष तग धरू शकत नाहीत. येथील उन्हाळे लहान असून फक्त चारच महिने तपमान ६° से. वर असते. उन्हाळ्यात सु. २० तासांपेक्षा जास्त काळ प्रकाश मिळतो व तो वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त ठरतो. या भागात वर्षभर थोडा थोडा पाऊस पडतो. तो सु. ३० ते ५० सेंमी. असतो. उन्हाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात हिमवृष्टी होत असून वर्षभर सरासरी तपमान कमी असल्याने बाष्पीभवनाचा वेग अगदी कमी असतो. उन्हाळ्याच्या सुरूवातीस हे बर्फ वितळू लागते आणि पाणी जमिनीत मुरते. त्याचा उपयोग वनस्पतींना चांगलाच होतो.

 

वनस्पती : येथील हवामान सूचिपर्णी वृक्षांच्या वाढीस अनुकूल आहे. झाडांची पाने जाड, सुईसारखी अणकुचीदार, अरूंद व स्निग्ध असतात. यामुळे बाष्पोत्सर्जनावर नियंत्रण राखले जाऊन झाडातील पाणी कमी प्रमाणात शोषले जाते. झाडांची खोडे आतून नरम परंतु जाड सालीची असतात. त्यामुळे दहिवरापासून झाडांचे रक्षण होते. झाडांच्या फांद्या जमिनीकडे वाकलेल्या असतात. त्यायोगे हिवाळ्यात पडणारे हिम झाडावरून घसरून खाली पडते. झाड बुंध्याशी मोठे व शेंड्याकडे निमुळते होत गेलेले असते. निमुळत्या शेंड्यामुळे या प्रदेशातील सोसाट्याच्या वाऱ्यापासून झाडे उन्मळून न पडता उभी राहतात. झाडांची फळे शंकाकृती व टणक असतात. त्यावर हवेचा परिणाम मंद गतीने होतो. झाडांची मुळे जमिनीलगत पसरलेली आढळतात. त्यामुळे हिवाळा संपल्यानंतर जेव्हा पृष्ठभागावरील बर्फ वितळते तेव्हा झाडांना लगेच पाणी उपलब्ध होऊ शकते. हिवाळा संपताच वा थोडा प्रकाश मिळताच प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू होते.


सूचिपर्णी वृक्षांच्या सात–आठच जाती आढळतात. एकाच जातीची हजारो झाडे एकाच भागात असतात, त्यास ‘स्टॅंड’ म्हणतात. देवदार, पाइन, हेमलॉक, स्प्रूस, चिनार, लार्च, फर या प्रमुख जाती आहेत. हे सूचिपर्णी वृक्ष जेथे दाटीदाटीने वाढतात त्या जंगलात दाट सावली पडते. या सावलीमुळे इतर झाडे जमिनीवर वाढू शकत नाहीत. जेथे सावली नसते अगर कमी असते, अशा ठिकाणी बर्च जातीची झुडूपे आढळतात. थंडीमुळे जमिनीवर पडलेल्या पानांचा अगदी मंद गतीने रासायनिक क्रिया होऊन नाश होतो.

युरेशियात (युरोप व आशिया) अटलांटिकच्या किनाऱ्यापासून ते पॅसिफिक (प्रशांत) महासागराच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत सु. ८,००० किमी. पसरलेला या जंगलांचा एक सलग पट्टा आढळून येतो. आशियाई भागापेक्षा युरोपच्या भागात झाडांच्या जाती कमी आढळतात. या सलग पट्ट्यांचे पाच भाग पडतात : (१) स्कॅंडिनेव्हियन जंगल, (२) लार्च–फर जंगले, (३) प. सायबीरीयातील दलदलीतील जंगले, (४) पू. सायबीरियातील जंगले, (५) प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील जंगले. या व्यतिरिक्त आल्प्स, कॉकेशस व खिंगन (शिंगान) पर्वतावरदेखील या प्रकारची जंगले आढळून येतात.

वरील पाच प्रकारांतील वनस्पतींत तेथील हवामाननुरूप थोडा फरक आढळतो आणि पाचही विभागात वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य आढळते. पहिल्या विभागात नॉर्वेजियन स्प्रूस किंवा ख्रिसमस वृक्ष व स्कॉट्‌स पाइन यांची संख्या जास्त असते, तर दुसऱ्या विभागात सायबीरीयन फर व सिल्व्हर फर जातीची झाडे जास्त असतात. हा विभाग प्रामुख्याने युरोपिय रशियात आढळतो. प. सायबीरीयातील दलदलीच्या प्रदेशातील जंगले ओब नदीच्या खोऱ्यात आढळतात. या विभागात सायबीरीयन फर जातीची झाडे अधिक संख्येने आहेत. चौथ्या प्रकारातील तैगा जंगले येनेसी नदीच्या पूर्वेकडे आढळत असून त्यावर विषम–अतिथंड हवामानाचा परिणाम झालेला आढळतो. येथे पानझडी वृक्ष, लार्च, दगडी पाइन, सीडार हे वृक्ष प्रामुख्याने आहेत. पाचव्या प्रकारातील जंगले कॅमचॅटका, सॅकालीन बेटे व सायबीरीयाची पूर्व किनारपट्टी येथे आढळतात. येथे हवामानाच्या विविधतेमुळे अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात परंतु दगडी पाइन व सायबीरीयन फर हे वृक्ष अधिक प्रमाणात आहेत.

उत्तर अमेरिकेतील तैगा व युरेशियन तैगा यांत दुहेरी फरक आहे. उत्तर अमेरिकेत झाडांच्या खूप जाती आहेत आणि तेथील वेगवेगळ्या विभागांत वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य असते श्वेत पाइन व कृष्णवर्णी स्प्रूस या जातींचे अधिक प्राबल्य आहे.

रशिया, कॅनडा व स्कॅंडिनेव्हियन देशांत तैगा जंगलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाकूड नरम असल्यामुळे ते कापण्यास सोपे जाते व इमारती लाकूड म्हणून त्याला फार मागणी आहे. तसेच एकाच प्रकारच्या झाडांचे अरण्य मोठा विस्तिर्ण प्रदेश व्यापते हे व्यापारी दृष्ट्या महत्वाचे आहे. तैगातील जंगलांपासून वर्तमानपत्रांचा कागद, कृत्रिम तंतू व लगदा तयार करतात. खेळाचे साहित्य व रासायनिक पदार्थ या जंगलातील वृक्षांपासून मिळतात. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने या जंगलांची निगा राखली जाते. रशियातील सूचिपर्णी वृक्षांचा उपयोग नैसर्गिक अडचणींमुळे पूर्णपणे होऊ शकत नाही.

प्राणिजीवन : या प्रदेशात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. काही भागात एल्म, मूस, कॅरिबू, रेनडियर या हरणाच्या जातीचे प्राणी असून ते शेवाळे आणि क्वचित व थोडे उगवणारे गवत किंवा झुडुपे यांवर जगतात. काही भागात लांडगेही आहेत. तसेच असंख्य लहान प्राणीदेखील विपुल असून त्यांत अर्मिन, बीव्हर, स्कंक, मार्टेन, सिल्व्हर फॉक्स, सेबल वीझल, मिंक व खार यांचा समावेश होतो. बहुतेक हे सर्व प्राणी नद्या, तळी, दलदली यांतील जलचर प्राण्यांवर उपजीविका करतात. यांच्या अंगावर दाट, मऊ केस, (फर) असतात, त्यामुळे त्यांचे कडक थंडीपासून संरक्षण होते. या प्राण्यांच्या केसाळ कातड्यांना फार मागणी असते. यांचे रंग आजूबाजूच्या प्रदेशसदृश्य असल्यामुळे ते सहज ओळखूही येत नाहीत.

मानवी जीवन : शीत हवामान आणि भूपृष्ठाचे मोठ्या प्रमाणात होणारे अपक्षालन यांमुळे तैगा प्रदेश शेतीच्या दृष्टीने फार उपयोगी नाही. या प्रदेशात शिकार हाच मुख्य धंदा आहे. अलास्का आणि कॅनडातील रेड इंडियन लोक कॅरिबू व रेनडियर यांच्या शिकारीवर उपजीविका करतात. प्राण्यांचे मांस व कातडी हेच त्यांचे अन्न–वस्त्र आहे. तसेच केसाळ कातडी विकून रोजच्या गरजेच्या वस्तु मिळविणे आणि लाकूडतोड हेही त्यांचे उद्योगधंदे आहेत. हिवाळ्यात झाडे तोडून त्यांचे लांबलांब ओंडके करून ते नदीच्या गोठलेल्या पात्रात ठेवून देतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून नदी वाहू लागली की, तिच्या बरोबर हे ओंडके वाहात जातात. ते खालच्या भागात ओढून घेतात व त्यापासून कागद, लाकडी सामान व खेळणी इ. वस्तु तयार करतात. कॅनडात हा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. तसेच अलिकडे या प्रदेशात सोने, खनिजतेल, लोखंड, कोळसा, युरेनियम, तांबे, मॅग्नेशियम, निकेल वगैरेच्या खाणी सापडल्यामुळे औद्योगिक वाढ झाली आहे.

चिलीच्या दक्षिण भागात लोकवस्ती अगदीच विरळ व मासेमारीवर उपजीविका करणारी असून ती इतर जगापासून दूर असल्यामुळे तो भाग अद्याप अविकसितच आहे. न्युझिलंडमधील सुचिपर्णी वृक्षांचा उपयोग रशियाप्रमाणेच नैसर्गिक अडचणींमुळे पूर्णपणे करता येत नाही त्यामुळे या प्रदेशातील अरण्यांचा उपयोग मर्यादित आणि स्थानिक स्वरूपाचाच राहिला आहे.

भागवत, अ. वि.