तेर : महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक स्थळ. लोकसंख्या ७,०६६ (१९७१). हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या इशान्येस सु. ३२  किमी.वर तेरणा नदीकाठी वसले आहे. तेरचे प्राचीन नाव तगर, तगरपुर, वा तगरनगर. त्याचे भौगोलिक व व्यापारी महत्त्व प्राचीन ग्रंथांत व प्रवासवर्णनांत उल्लेखिलेले आढळून येते. परिप्लस ऑफ द एरीथीअन सी या इसवी सनाच्या पहिल्या–दुसऱ्या शतकांतील ग्रंथांत तगरनगरचा उल्लेख असून ते पैठणच्या पूर्वेस दहा दिवसांच्या प्रवासाइतके दूर आहे, असे लिहिले आहे. तगरनगरातून विविध प्रकारचे उत्कृष्ट कापड बॅरगेझ (भरूकच्छ = भडोच, गुजरात राज्य) येथे निर्यात केले जाई. त्याचप्रमाणे तगरमध्ये किनारपट्टीवरून विविध वस्तू आयात केल्या जात, असे पेरिप्लसचा ग्रंथकर्ता सांगतो. याउलट टॉलेमी (इ. स. दुसरे शतक) हा लेखक म्हणतो की, तगर पैठणच्या ईशान्येस आहे. सध्याचे तेर पैठणच्या काहीसे आग्नेय दिशेस आहे. पुराणात याचा उल्लेख सत्यपुरी या नावाने येतो. मात्र प्राचीन काळी तेर हे पैठण, नेवासे, जुन्नर इ. नागरी केंद्राशी व्यापारी मार्गाने जोडले गेले होते, यात शंका नाही. भारतीय वाङ्‌मयात ज्या व्यापारी मार्गाचा उल्लेख आहे, त्यानुसार तेर हे गाव पैठण (प्रतिष्ठान), औरंगाबाद (राजतलाफ), भोकरदन (भोगवर्धन), अजिंठा महेश्वर (माहिष्मती) मार्गे उज्जयिनीशी जोडले गेले होते, असे दिसते.

प्राचीन त्रिविक्रम मंदिर, तेर.सातवाहन काळात हे नगर अत्यंत भरभराटलेले होते. त्या वेळी त्याचा रोम व ग्रीस यांच्याशी व्यापार असावा. अलीकडील उत्खननांत तेथे काही रोमन बनावटीची नाणी सापडली. शिलाहारांच्या आधिपत्याखालीही ते होते. कारण येथे शिलाहारांची नाणी व मुद्रा सापडल्या आहेत. एका नाण्यावर गजलक्ष्मीचे चित्र आहे.

तेरला अनेक प्राचीन टेकाडांत मंदिरे, शिल्पे इत्यादींचे अवशेष आढळून येतात. त्यांतील त्रिविक्रम मंदिरांची बांधणी चैत्यासारखी आहे. त्याचा काळ इ. स. दुसरे ते पाचवे शतक या दरम्यानचा आहे. याशिवाय उत्तरेश्वर व कालेश्वर ही मंदिरे महत्त्वपूर्ण आहेत. यांतील उत्तरेश्वच्या गाभाऱ्याच्या दरवाज्याची लाकडी चौकट उत्कृष्ट कोरीव कामाबद्दल व नक्षीदार विटांबद्दल प्रख्यात आहे. वेलबुट्ट्या, विविध प्राणी व मानवी आकृत्या यांनी ती अलंकृत केली आहे. कालेश्वराचे शिखर दाक्षिणात्य (द्राविड) शैलीचे असून अभ्यासकांच्या मते ही दोन्ही मंदिरे राष्ट्रकुटांच्या कारकीर्दीतील असावीत.

याशिवाय प्राचीन स्तूपांचे अवशेष तेरमध्ये सापडतात. उत्कष्ट कोरीव कामामध्ये असलेले स्तूपांच्या कठड्यांचे खांब व इतर शिल्पे तेथील वस्तुसंग्रहालयात ठेवली आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्वखात्याने केलेल्या उत्खननात सातवाहनकालीन स्तूपांचे अवशेष, नाणी, मृत्तिकामूर्ती, मृत्पात्रे, मणी, इ. त्याचप्रमाणे रोमन मृत्पात्रे व पुतळ्या उपलब्ध झाल्या आहेत.

तेरचे रहिवासी रामलिंगप्पा लामतुरे यांचा वस्तुसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यात हस्तीदंताच्या कोरीव स्त्रीमूर्ती, विविध हस्तभूषणे, नाणी इत्यादींचा अंतर्भाव आहे. अशाच तऱ्हेची हस्तीदंती स्त्रीमूर्ती इटलीतील पाँपई या प्राचीन शहराच्या उत्खननात सापडल्याने तेर हे एक कलाकेंद्र होते व रोमन नगराशी व्यापारी संपर्क होता, हे आता सिद्ध झाले आहे.

संदर्भ : 1. Barrett, Douglas, Ter, Bombay, 1960.

   2. Cousens, Henry, Ter–Tagara”, Annual report, Archaeological–Survey of India, 1902–03.

देव, शां. भा.