तृणधान्ये : तृण कुलातील (ग्रॅमिनी) वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे. त्यांची लागवड मुख्यत्वेकरून त्यांच्या पिष्टमय बियांसाठी केली जाते. तृणधान्यांचा उपयोग मनुष्याच्या पोषणासाठी, जनावरांच्या खाद्यांत आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्चासाठी केला जातो. गहू, भात, मका, राय, ओट, सातू, ज्वारी आणि ज्वारी वर्गातील पिके, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी यांचा तृणधान्यांत समावेश होतो. यांतील बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी ही बारीक तृणधान्ये (मिलेट) आहेत. काही शास्त्रज्ञ ‘मिलेट’ हा शब्द दुय्यम प्रतीच्या तृणधान्यांसाठी वापरतात आणि गहू, भात, राय, ओट व सातू यांखेरीज सर्व तृणधान्यांचा समावेश त्यांत करतात. सर्व तृणधान्ये वर्षायू (एक वर्ष जगणारी) आहेत. गहू, राय, सातू व ओट ही पिके जगातील थंड हवामानाच्या प्रदेशांत आणि इतर सर्व पिके उष्ण अगर समशीतोष्ण भागांत होतात.
तृणधान्यांपासून मनुष्याला इतर दुसऱ्या कोणत्याही पिकापेक्षा अन्नाचा जास्त पुरवठा त्यांतील कार्बोहायड्रेटांमुळे होतो. तुलनेने शरीरपोषणासाठी कमी खर्चात जास्त कॅलरी (ऊर्जा) तृणधान्यांतून मिळतात. गहू, भात व त्याखालोखाल मका या तीन धान्यांवर जगातील पुष्कळसे लोक आपली उपजीविका करतात. बाकीचे लोक मका, राय, सातू, ज्वारी आणि बारीक तृणधान्ये यांवर उपजीविका करतात. जनावरांना चारा व खाद्य यांसाठीही तृणधान्यांना फार महत्त्व आहे. औद्योगिक उत्पादनात त्यांचा उपयोग विशेषेकरून जास्त उत्पादनाच्या देशांत स्टार्च, डेक्स्ट्रोज, गोड पाक (सायरप), खळ, खाद्य तेले आणि औद्योगिक अल्कोहॉल तयार करण्यासाठी होतो.
जगातील लागवडीखालील जमिनीपैकी सु. निम्मे क्षेत्र तृणधान्याखाली आहे. १९७० मध्ये जगात ७०·३८ कोटी हे. क्षेत्र तृणधान्याखाली होते. त्यापैकी पीकवार क्षेत्र पुढीलप्रमाणे होते : (आकडे कोटी हेक्टरचे) गहू २१·०३, राय २, सातू ७·८, ओट ३·२, मका ११·०८, भात ११·२३, ज्वारी व बारीक तृणधान्ये ११·२३. उत्पादनाच्या बाबतीत गहू, भात, मका, सातू, ज्वारी व बारीक तृणधान्ये, ओट आणि राय असे क्रमांक होते. १९७० साली जगातील तृणधान्याखालील क्षेत्राच्या १४·५% क्षेत्र आणि ९·३% उत्पादन भारतात झाले. तृणधान्यांपैकी भारतात भाताखाली सर्वांत जास्त क्षेत्र आहे. त्यानंतर ज्वारी, बाजरी व गहू यांचे त्या क्रमाने क्षेत्र आहे. इतर सर्व तृणधान्यांचा क्रमांक यानंतर लागतो.
तृणधान्ये इ. स. पू. ७००० वर्षे लागवडीत होती, असे मानण्यात येते. जगातील प्रमुख संस्कृतींपैकी प्रत्येक संस्कृतीतील लोकांनी पोषणासाठी तृणधान्यांचा प्रामुख्याने वापर केला आहे. पुरातन अवशेषांच्या उत्खननात गहू व सातू साठविण्याची कोठारे मेसोपोटेमिया, ईजिप्त, ग्रीस व इटलीत आणि मक्याची कोठारे माया, ॲझटेक, इंका आणि पश्चिम गोलार्धातील इतर संस्कृतींच्या उत्खननांत मिळाली आहेत. तृणधान्याची लागवड केल्यामुळे उदरभरणाची हमी मिळू लागली त्यामुळे प्राचीन रानटी अवस्थेतील भटक्या जमातीच्या लोकांनी भटकणे सोडून स्थिर जीवनक्रम सुरू केला. पुढील हंगामातील पीक मिळेपर्यंत धान्य साठविता येत असल्याने त्यांना फुरसत मिळून ते लोक कलाकौशल्याकडे विशेष लक्ष देऊ लागले. अशा रीतीने तृणधान्याच्या लागवडीमुळे कलाकौशल्याच्या वाढीला उत्तेजन मिळाले, असे म्हणता येईल.
सर्व तृणधान्यांच्या जगातील लागवडीचा साकल्याने विचार करता असे दिसून येते, की भात, गहू व राय या पिकांची लागवड मुख्यतः मनुष्याच्या खाद्यान्नासाठी केली जाते. उ. अमेरिका, यूरोप आणि ऑस्ट्रेलियात मका, सातू, ओट आणि ज्वारी वर्गातील (सोर्घम) पिकांची लागवड बहुतांशी जनावरांचे खाद्य म्हणून केली जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिणेकडील संस्थाने आणि इटली, रूमानिया व ईजिप्त या देशांच्या काही भागांत मक्याचा वापर मनुष्याच्या खाद्यान्नासाठी करण्यात येतो. त्याच कारणासाठी सातू आणि राय या पिकांची लागवड गव्हाच्या पिकाला अनुकूल नसलेल्या देशांत करतात. ज्वारी (सोर्घम) आणि बारीक तृणधान्यांची लागवड रशिया, उ. आशिया आणि आफ्रिकेच्या अर्धरुक्ष प्रदेशांत करतात कारण तेथे भात व गव्हासारखी दुसरी तृणधान्ये पिकत नाहीत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बारीक तृणधान्ये सामान्यतः वाळविलेली वैरण व गुरांच्या चराईचे पीक म्हणून घेतात.
गहू: जगातील एकूण उत्पादनाच्या दृष्टीने हे सर्वांत महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील सु. निम्म्या लोकांच्या आहारात कमीजास्त प्रमाणात गव्हाचा वापर होतो. गव्हाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे चांगल्या दर्जाचा पाव तयार करता येतो. गव्हाखेरीज फक्त रायचा पाव करण्यासाठी उपयोग करतात परंतु तो पाव चांगल्या दर्जाचा नसतो. भात आणि इतर तृणधान्यांपेक्षा गव्हात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. गव्हाचा स्टार्च कपड्यांना लावण्यासाठी विशेष चांगला असतो [→ गहू].
भात : हेही जगातील फार महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील सु. ६०% लोकांच्या नेहमीच्या आहारात भाताचा समावेश होतो. त्याच्या एकूण क्षेत्रापैकी ९३% क्षेत्र पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांत आहे. चीन वगळता जगातील भात पिकविणाऱ्या देशांत भारताचा, क्षेत्र आणि उत्पादन याबाबतींत प्रथम क्रमांक आहे [→ भात].
मका : गहू व भात यांच्याखालोखाल हे जगातील महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील जवळजवळ सर्व देशांत ते पिकविले जाते. सर्वांत जास्त क्षेत्र अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत आहे. त्याचप्रमाणे ब्राझील, मेक्सिको, भारत, अर्जेंटिना आणि द. आफ्रिका या देशांतही मक्याखालील क्षेत्र बरेच आहे. हे पीक गेल्या ५,००० वर्षांपासून लागवडीत आहे, असे मानतात. कॅस्पियन भागात समुद्रसपाटीखालच्या प्रदेशापासून ते ४,००० मी. उंचीपर्यंतच्या जगाच्या निरनिराळ्या भागांत आणि हवामानांत ते पिकविले जाते, हे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व तृणधान्यांत संकरित मक्याचे हेक्टरी उत्पादन जास्त असते. अमेरिकेत पिकविणाऱ्या मक्याच्या उत्पादनापैकी तीनचतुर्थांश उत्पादन जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते. यातील स्टार्चाचा निरनिराळ्या औद्योगिक उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. उदा., कापड आणि कागद उत्पादनांत लागणारी खळ, आसंजक (चिकटविण्यासाठी वापरण्यात येणारा डिंकासारखा पदार्थ), मद्ये. तृणधान्यात तेलाचा अंश फार अल्प प्रमाणात असतो, परंतु मक्यापासून पुरेशा मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन होते [→ मका].
ओट : हे जगातील तृणधान्याचे चवथे महत्त्वाचे पीक असून ते मुख्यतः वैरणीचे पीक आहे. घोड्यांना आणि दुभत्या जनावरांना ते विशेष पौष्टिक असते. दाण्याच्या उत्पादनासाठी काही थोड्या प्रमाणावर त्याची लागवड होते. वैरणीसाठी लागवड मुख्यतः उ. अमेरिका (संयुक्त संस्थाने व कॅनडा), उ. यूरोप आणि रशियात होते. भारतात हे विशेष महत्त्वाचे पीक नाही [→ ओट].
सातू : हे फार पुरातन काळापासून लागवडीत असलेले तृणधान्य आहे. ते सर्वांत पुरातन तृणधान्य आहे असे काहींचे मत असून ५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीपासून ते लागवडीत असावे असे मानतात. ऋग्वेदात त्याचा उल्लेख यव असा केलेला आढळतो. भारतात उ. प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा व राजस्थानात या पिकाची लागवड मनुष्याच्या खाद्यान्नासाठी करतात. सातूचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळून त्याच्या रोट्या करतात. तसेच त्यापासून बिअर आणि व्हिस्की ही मद्ये तयार करतात [→ सातू].
राय : हे तृणधान्य विशेषेकरून उ. यूरोपात हलक्या जमिनीत पिकविले जाते. कडाक्याच्या थंडीचा त्यावर विशेष परिणाम होत नाही. या पिकावरील ⇨ अरगट नावाचा कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे होणारा) रोग यूरोपच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भारतात या पिकाची लागवड होत नाही [→ राय].
ज्वारी : हे तृणधान्य ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,००० वर्षे लागवडीत होते. याची लागवड आफ्रिका, भारत, चीन, मँचुरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर अनेक देशांत केली जाते. भारतात भातानंतर मनुष्याचे अन्नधान्य म्हणून ज्वारीच्या क्रमांक लागतो. भारतातील ज्वारीच्या क्षेत्रापैकी ३४% क्षेत्र महाराष्ट्रात आहे [→ ज्वारी].
बाजरी : हे बारीक तृणधान्य भारत, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील काही देशांत पिकते. भारतात ते ज्वारीच्या खालोखाल महत्त्वाचे असून त्याची लागवड विशेषेकरून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशात होते. ज्वारीपेक्षा बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते [→ बाजरी].
नाचणी : (नागली). दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे बारीक तृणधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते आणि त्यात प्रथिने व कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असतात. मधुमेही लोकांना ते उपयुक्त समजले जाते. या धान्याचा विशेष म्हणजे साठवणीमध्ये ते इतर तृणधान्यांपेक्षा अनेक वर्षे न किडता टिकते [→ नाचणी].
वरी : हे लवकर पिकणारे व रुक्षताविरोधक (अवर्षणाला तोंड देऊ शकणारे) पीक असून दुष्काळी भागात अगर अवर्षणाच्या काळात लागवडीसाठी योग्य आहे. पंजाब, उ. प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत हे पीक लागवडीत आहे [→ वरी].
राळा : हे बारीक दाण्याचे रुक्षताविरोधक पीक मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात लागवडीत आहे. २,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत या पिकाची लागवड होऊ शकते [→ राळा].
बंटी : हे लवकर पिकणारे, जाडजूड, तुरा असलेले, गवतासारखे वाढणारे पीक असून ते भारताच्या निरनिराळ्या भागांत आढळते. २.००० मी. उंचीपर्यंत हिमालयातही ते वाढते. ते रुक्षताविरोधक आहे परंतु त्याचबरोबर ते पाणथळ जमिनीतही वाढते [→ बंटी].
कोद्रा : चिवट आणि अतिशय रुक्षताविरोधक बारीक तृणधान्य. ते तमिळनाडू व उ. कर्नाटक या दोन राज्यांत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागांत लागवडीत आहे [→ कोद्रा].
सावा : हे गरीबांची धान्य असून रुक्षताविरोधक तसेच पाणथळ जमिनीत वाढणारे, बारीक तृणधान्य थोड्या प्रमाणावर लागवडीत आहे [→ सावा].
तृणधान्यांचे आहारातील स्थान : पोषण गुणधर्मांच्या बहुतेक बाबतींत सर्व तृणधान्ये एकमेकांशी मिळतीजुळती आहेत. पिवळा मका वगळता त्या सर्वांमध्ये कॅल्शियम आणि अ जीवनसत्त्वाचा अभाव असतो आणि त्यांतील प्रथिनांचे जैव मूल्य प्राणिज प्रथिनांपेक्षा कमी असते. यासाठी तृणधान्यांचा आहारात उपयोग करताना त्यांत कॅल्शियम आणि अ जीवनसत्त्व मिसळण्याची आणि दूध, अंडी, मांस यांसारख्या प्राणिज प्रथिनांचा समावेश करण्याची शिफारस आहार तज्ञांनी केलेली आहे.
संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y. N. Field Crops of India, Bangalore, 1958.
2. Kumar, L. S. S. Agarwala, A. C. Arakeri, H. R. Kamath M. G. Moore, E. N. Donahue, R. L. Agriculture in India, Vol. II, Bombay, 1963.
3. Leonard, W. H. Martin, J. H. Cereal Crops, New York, 1963.
4. Mudaliar, V. T. S. South Indian Field Crops, Madras, 1960.
5. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.
चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.
“