तूरिन : इटलीच्या पीडमाँट विभागाची आणि तूरिन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ११,८७,८३२ (१९७१). हे विस्तृत व सपाट मैदानी प्रदेशात पो नदीवर असून इटलीचे एक औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. इटलीच्या ८०% मोटारींचे उत्पादन येथील फियाट आणि लान्सिया कारखान्यांत होते. विमाने, कापड, कागद, रबरी व कातडी वस्तू, छपाई, रेडिओ, काच, रसायने, धातुकाम, प्लॅस्टिक, विद्युत्–रासायनिक उद्योग, चॉकोलेट, मद्ये इ. अनेकविध कारखाने विद्यापीठ, शास्त्र, कला व व्यापारोद्योगविषयक विविध शैक्षणिक संस्था, संग्रहालये व ग्रंथालये ऐतिहासिक अवशेष इत्यादींनी शहर समृद्ध आहे. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून इ. स. एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक सत्तांखाली तूरिनने राजधानीचे वैभव उपभोगिले. दुसऱ्या महायुद्धातही याची फारच नासधूस झाली परंतु ते पुनः उभारले गेले. येथे सडका, लोहमार्ग, आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानमार्ग एकवटले आहेत.
मांढरे, जयवंत