तून : (ताडू, तूण, कुरूक, महानिंब हिं. तूनी, लिम गु. टुन क. केंपू, तुंडू सं. कुबेरक, नंद वृक्ष, तूणी, तुनिका इं. इंडियन मॅहॉगनी, मौलमीन–सिंगापूर सीडार, सँडल नीम, तून लॅ. तूना सिलिएटा, सिड्रेला तूना कुल–मेलिएसी). हा एक मोठा, १८–३० मी. उंच, १·८–२·४ मी. घेराचा पानझडी वृक्ष उ. कारवार व कोकणातील घनदाट सदापर्णी जंगलात, हिमालयाच्या पायथ्यास, वायव्य हिमालय प्रदेशात आणि पूर्वेस सिक्कीम व आसामपर्यंत जलप्रवाहांच्या काठांनी तसेच बागंला देश, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रह्मदेश इ. देशांत आढळतो. हा रस्त्यांच्या दुतर्फा आणि लहानमोठ्या उद्यानांतून लावलेला दिसतो. वृक्षाची साल उदी–पिंगट असून जून झाल्यावर जाड तुकड्यांनी सोलली जाते. पाने संयुक्त, एकाआड एक, ०·३–०·९मी. लांब व पिसासारखी असून त्यांवर आठ ते तीस दले बहुधा समोरासमोर किंवा साधारणतः तशीच, तळास मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस असमान, लांब देठाची, भाल्यासारखी किंवा अंडाकृती असतात. फुले पांढरी, सुगंधी व शेंड्याकडे लोंबत्या शाखायुक्त मंजरीवर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ मेलिएसी अगर निंब कुलात वर्णिल्याप्रमाणे. संदले व प्रदले प्रत्येकी पाच असून केसरदले पाच व शेंदरी, केसाळ बिंब–खंडांवर रचलेली असतात [→ फूल]. किंजपुटात पाच कप्पे असून बोंड पटभिदुर (पडद्यांवर तडकणारी) व लांबट (२–२·५ सेंमी. लांब) असते बीजे अनेक, चपटी व त्यांच्या दोन्ही टोकांस एकेक पंख असतो.
तून वृक्षाचे लाकूड विटेसारखे तांबूस, चकचकीत, सुगंधी, मध्यम बळकट व टिकाऊ असून कापण्यास व रंधण्यास सोपे असते. प्लायवुड (तक्ते), फळ्या, दारे व खिडक्यांच्या झडपा, चहाची खोकी, होडकी, वल्ही, सिगारपेट्या, सतारीसारखी वाद्ये, तेलाची पिपे, खेळणी, बंदुकीचे दस्ते व आगगाड्यांच्या डब्यातील सजावट इत्यादींसाठी फार उपयुक्त असल्याने या वृक्षाला ‘हिंदी मॅहॉगनी’ असे नाव पडले आहे [→ मॅहॉगनी]. फुले पाण्यात उकळून लाल व पिवळा रंग मिळतो. तो कर्नाटकात रेशमी, लोकरीचे व कापसाचे धागे रंगविण्यास वापरीत असत. वायव्य प्रांतात फुलांपासून कुसुंबा व हळदीच्या साहाय्याने गंधकासारखा ‘बसंती’ रंग बनवून त्या रंगाचे कपडे वसंत ऋतूत वापरीत (त्यावरून बसंती नाव पडले). कोवळ्या फांद्या, पाला आणि बी गुरांना खाऊ घालतात. या वृक्षापासून डिंक मिळतो तो पिंगट व स्तंभक (आकुंचन करणारा) असतो. ⇨ गजग्याबरोबर (सागरगोट्याबरोबर) साल पाळीच्या तापावर आणि पौष्टिक म्हणून वापरतात. फुले आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) इंडोचायनात व मलेशियात साल अतिसारावर व पाळीच्या तापावर देतात. धन्वंतरिनिघंटु व राजनिघंटु (औषधी वनस्पतींचा कोश) या ग्रंथांत या वृक्षाचे वर्णन महानिंब या नावाने दिलेले आढळते शिवाय अनेक संस्कृत नावेही दिली आहेत.
परांडेकर, शं. आ.
“