धनीराम ‘चात्रिक’ (ऑक्टोबर १८७६-१९५४). आधुनिक काळातील प्रसिद्ध पंजाबी कवी. सियालकोट जिल्ह्यातील पसिआनवाला नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यानी वडिलांजवळ पंजाबीचे अध्ययन केले. धनीरामांचे हस्ताक्षर उत्तम असल्यामुळे सुलेखनकार म्हणूनही त्यांचा लौकिक झाला. छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या पंजाबी टंकाचेही ते आध्यप्रणेते मानले जातात. हिंदी भाषाही त्यांना अवगत होती. अमृतसर येथे शाळेत त्यांनी उर्दू, इंग्रजी व फार्सीचा अभ्यास केला. त्याचे शिक्षण फारसे झाले नसले, तरी त्याच्या समकालीन लेखनाशी त्यांचा चांगला परीचय होता.

धनीराम ‘चात्रिक’

प्रख्यात पंजाबी कवी ⇨ भाई वीरसिंग (१८७२-१९५७) यांच्या संपर्कात १८९३ मध्ये धनीराम आले आणि तेंव्हापासून त्यांना कविता करण्याचा छंद जडला. आधुनिक पंजाबी काव्याचा पाया घालणाऱ्या कवींत त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. पंजाबी जीवनातून व संस्कृतीतून आपले काव्यविषय निवडून त्यांवर काव्यरचना करणारे धनीराम हे आद्य आधुनिक कवी होत. सामाजिक व धार्मिक दृष्टिकोन त्यांच्या कवितेत प्रतिबिंबित झाला आहे. त्याची कविता साधी, सरळ आणि हिंदू परंपरेशी आपले नाते दाखवणारी आहे. तसे ते परंपरावादी कवी आहेत. त्यांना अफाट लोकप्रियता लाभली आणि अनेक अनुयायीही मिळाले.

सुंदर निसर्गवर्णने, पंजाबी जीवनाचे व संस्कृतीचे उत्कृष्ट चित्रण, राष्ट्रीय आणि सामाजिक प्रवाह, परकीय सत्तेबाबतची चीड, लोकजागृती, धार्मिक व सामाजिक जीवनाची आवड, परंपरा व अद्‌भुतरम्यता यांचे आकर्षण, लयबद्ध व रागबद्ध रचना, लोकसंगीताचा व लोकगीतांचा प्रभाव, प्रतीकात्मक भाषेचा वापर इ. त्यांच्या कवितेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. आपल्या काव्यलेखनाने त्यांनी पंजाबी काव्य विशेष समृद्ध केले. त्यांचे स्थान आधुनिक पंजाबी साहित्यात बरेच वरचे मानले जाते. तत्कालीन परिस्थितीच्या प्रभावातून त्याची कविता निर्माण झाली.

त्यांची सुरुवातीची कविता भर्तृहरी, नलदमयंती अशा लोकप्रिय कथांवरच आधारित आहे. कविसंमेलनांतून व वाङ्‌मयीन चर्चांमधूनही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांनी पंजाबी कवितेला काल्पनिकाच्या साम्राज्यातून वास्तवाच्या जगात आणून सोडले. त्यांचा दृष्टिकोन आशावादी आहे. उत्तरोत्तर ते अधिकाधिक राष्ट्रवादी वृत्तीने काव्य लिहू लागले आहे. समीक्षकांच्या मते त्यांची सर्वोत्कृष्ट कविता त्यांच्या चंदनवाडी (१९४९) ह्या संग्रहात आढळते. योगीराज श्री मर्त्री हरीजी (१९३१), केसर किआरी (१९४०), नूर जहाँ बादसाह बेगम (१९४४), नवाँ जहान (१९४५), राजा नल ते राणी दमयंती (१९४९), सूफीखाना (१९५०) व मोहन मंतर हे त्यांचे उल्लेखनीय काव्यग्रंथ होत. यांशिवाय त्यांनी इसिपनिति हे पद्यकाव्य व रमय्या सेठ ही कादंबरीही लिहिली.

‘पंजाबी सभा’ ह्या १९२६ मध्ये स्थापन झालेल्या पंजाबी साहित्य संथ्येचे ते संस्थापक आणि पहिले अध्यक्षही होते. भाई वीरसिंगांना ते आपला गुरू मानीत.

के. जगजीत सिह (इं)  सुर्वे, भा. ग. (म.)