आ. १. यंत्राला रबराच्या तुकड्यांचा दिलेला आधार : (१) यंत्र, (२) रबराचे तुकडे, (३) गाडीच्या डब्याला जोडलेली यंत्राची बैठक.

धक्काशोषक : एखाद्यायंत्रणेच्या किंवा तिच्या भागाच्या वस्तुमानाचा (वजनाचा) प्रवेग त्याची चौकट किंवा त्याचा आधार यांच्या सापेक्ष (यांच्या संदर्भाने) कमी करण्यासाठी वापरलेली वस्तू किंवा साधन. धक्का बसून हलणाऱ्या वस्तुमानाचा प्रवेग कमी केला, तर धक्क्याची तीव्रता कमी होते. वस्तू लवचिक आणि नरम पदार्थाची (उदा., रबराची) असणे आवश्यक असते. हेच उद्दिष्ट पाणी, तेल, संपीडित (दाबाखालील) हवा वा दुसरा एखादा वायू या माध्यमांनीही (दमनकुंभाद्वारा) चांगले साधता येते. साधनाची उदाहरणे स्प्रिंग आणि दमनकुंभ ही आहेत. धक्काशोषण व्यवस्था ही निरनिराळी मापके आणि अन्य उपकरणे यांत व मुख्यतः मोटारगाड्या, आगगाड्या यांसारख्या जलद गतीच्या वाहनांत वापरावी लागते. रेल्वेच्या डब्याच्या खिडकीला खालच्या बाजूला असलेली रबराची जाड वादी (पट्टी) हे धक्काशोषकाचे नेहमीच्या व्यवहारातले अगदी साधे उदाहरण आहे.

खिडकी एकसारखी वरखाली करावी लागत नाही पण एखादे यंत्र उदा., स्थानिक रेल्वे गाडीतील हवा संपीडक व त्याचे चालक विद्युत् चलित्र (मोटर) बसविले, तर त्याला गाडीचे धक्के सतत बसत राहतील. अशा परिस्थितीत यंत्राला बसणारे धक्के कमी व्हावे म्हणून यंत्र आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे रबराच्या जाड तुकड्यांवर बसवितात. रबर चांगल्या प्रतीचे असेल, तर धक्क्यांचा जोर बराच कमी होतो.

आ.२ मोटारगाडीतील मळसूत्री स्प्रिंगेचा धक्काशोषक (१) पुढचा आस, (२) पुढचे चाक, (३) मोटारीचा गाडा, (४) धक्काशोषक स्प्रिंग

स्प्रिंग : पोलादी स्प्रिंगांचा धक्काशोषणात चांगला उपयोग होतो. स्प्रिंगांचे अनेक प्रकार असतात पण त्यांत दोन मुख्य आहेत : तारेच्या मळसूत्री व पट्ट्यांच्या कमानी स्प्रिंगा.

 

मळसूत्री स्प्रिंग : या बारीक किंवा जाड तारेच्याही (सळीच्या) असतात. बारीक तारेची स्प्रिंग कमी वजनासाठी व हलक्या धक्क्यांसाठी आणि जाड तारेची भारी वजन व जोराचे धक्के यांसाठी वापरतात. मापकात व उपकरणात पहिल्या प्रकारच्या आणि वाहणात दुसऱ्या प्रकारच्या स्प्रिंगा असतात. रस्त्यातील खाचखळग्यांमुळे मोटार गाडीच्या पुढील चाकांना बसणाऱ्या धक्क्यांच्या शोषणासाठी जाड तारेच्या स्प्रिंगेचा करण्यात येणारा उपयोग आ. २ मध्ये दाखविला आहे. या स्प्रिंगा उभ्या दिशेतील धक्के चांगल्या प्रकारे शोषित असल्या, तरी त्यांना पार्श्वीय हालचालीला रोध करता येत नाही. स्प्रिंग सरळ आसावर न बसविता बाजूला दुसऱ्या भागांच्या साहय्याने बसवितात. यामुळे धक्काशोषणाचे कार्य अधिक चांगले होते. आकृतीत विशबोन (दोन शाखा असलेल्या हाडाच्या आकाराचा) रचनाप्रकार दाखविला आहे. रेल्वेच्या डब्यांच्या साठ्यात या स्प्रिंगांचा सरळ उपयोग केलेला असतो. सर्पिल (घडाळातल्या सारख्या) स्प्रिंगेचाही धक्काशोषक म्हणून प्रसंगी उपयोग करतात.


 आ. ३. रेल्वे गाडीच्या डब्याच्या टोकाचा धक्काशोषक : (१) डबा, (२) बाहेरची नळी, (३) आतील नळी, (४) तबकडी, (५) स्प्रिंग.रेल्वेच्या उतारू व माल डब्यांच्या टोकांना जाड तारेची मळसूत्री स्प्रिंग असलेले धक्काशोषक (बफर) बसवितात. हा प्रकार आ. ३ मध्ये दाखविला आहे. या शोषकात दोन मोठ्या नळ्या असून त्या निसरी (एकमेकींत जाणाऱ्या) आहेत. आतलीच्या मोकळ्या टोकाला एक तबकडी लावतात. गाडीच्या गतीचे रोधन होत असता कितीही अकस्मात गतिरोधक लावण्याची पाळी आली असता डबे अशा शोषकांमुळे एकमेकांवर आदळत नाहीत. आतील स्प्रिंग दिसावी म्हणून आकृतीत एका शोषकाच्या नळ्या कापलेल्या दाखविलेल्या आहेत.

बोरीबंदर व बाँबे सेंट्रलसारख्या बंद (गाडी पलीकडे न जाणाऱ्या) रेल्वे स्थानकात शेवटी एंजिन थांबले नाही, तर धक्क्यावर आढळून इमारतीचे व एंजिनाचेही नुकसान होईल. हे टाळण्यासाठी तेथेही धक्काशोषक बसवितात पण हे द्रविय पद्धतीचे असतात. म्हणजे स्प्रिंगेच्या जागी दाबित पाणी किंवा तेल आणि सिंलींडर-दट्ट्या अशी योजना केलेली असते.

आ. ४. कमानी स्प्रिंगेचा धक्काशोषणासाठी उपयोग : (अ) वाहनाच्या लांबीत (दृढ आसासमवेत ) : (१) स्थिर आधार, दृढ आस, (३) धक्काशोषण स्थान, (आ) वाहनाच्या रुंदीत (तरत्या आसासमवेत) (१) स्थिर आधार, (२) तरता आस, (३) धक्काशोषण स्थाने.

कमानी स्प्रिंगा : मोटारगाडी, रेल्वे गाडी यांसारख्या मोठ्या व जलद गतीच्या वाहनांत कमानी स्प्रिंगा वापराव्या लागतात. या पोलादी पट्ट्यांच्या करतात व त्यांना थोडा बाकही दिलेला असतो त्यामुळे त्यांचा आकार थोडा दीर्घवर्तुळी (धनुष्यासारखा) होतो. सर्वांत लांब पट्टीच्या टोकांना आधारासाठी डोळे करतात. त्यांतील एक स्थिर राहतो व दुसरा किंचित सरकू शकेल (स्प्रिंग दाबली की, डोळ्यांमधील अतंर वाढेल म्हणून) अशा रीतीने आधारलेला असतो. या स्प्रिंगा वाहनाच्या लांबीत (मालमोटारी, रेल्वे गाड्यांचे डबे) वा रूंदीत (खासगी मोटारी) वापरतात. आ. ४ (अ) मध्ये तिचा लांबीत व ४ (आ) रुंदीत उपयोग केलेला दाखविला आहे. आ. ४ (अ) मधील व्यवस्थेत स्प्रिंगेची टोके साट्याच्या चौकटीवर बसविलेली  असून ज्या वस्तुमानाचे (कायेचे) धक्के शोषित व्हायचे ते स्प्रिंगेच्या मध्याला जोडतात. आ. ४. (आ) मध्ये याउलट वस्तुमान टोकांना जोडून स्प्रिंगेचा मध्य दृढ बसविलेला आहे.

आ. ५. धक्काशोषक पोलादी पीडन दांडी : (अ) तत्व : (१) दृढ आधार, (२) पीडन दांडी, (३) बाहू., (आ) अनुप्रयुक्ती- जर्मन फोक्सव्हागन गाडीमधील मागील चाकाना लावलेल्या पीडन दांड्या : (१) मागील चाके, (२, ३) पीडन दांड्या.

पीडन दांडी : गेल्या काही वर्षांत मोटारगाड्या वगैरेंसाठी धक्काशोषणाचे कार्य एका पोलादी दांडीने साधण्यात येऊ लागले आहे. दांडीचे एक टोक साट्याच्या चौकटीला दृढ बसवितात. दुसऱ्या टोकाला एक बाहू (तरफ) लावतात आणि त्याचे टोक चाकाच्या आसाला जोडतात. (आ. ५) अशा रचनेमुळे धक्के उत्पन्न होताना घडणारे कार्य दांडीच्या पीडनात सामावले जाते. 

दमनकुंभ-निसरी धक्काशोषक : बऱ्याचशा प्रकारच्या धक्काशोषकांत दमनकुंभाचे तत्त्व वापरून निसरी पद्धतीचे धक्काशोषक बनविलेले आहेत. दमनकुंभात सिलिंडर, त्यात तेल आणि दट्ट्या मूलतः असतात. दट्ट्यात बारीक भोके वा झडपा असतात. हीच व्यवस्था निसरी पद्धतीच्या धक्काशोषकात असते व ती आ. ६ मध्ये दाखविली आहे.


आ. ६. निसरी धक्काशोषक : (अ) धक्का बसताना (आकुंचन) : (१) बाहेरची नळी, (२) दट्ट्याचा दांडा, (३) दट्ट्या, (३अ) दट्ट्यातील झडपा, (४) आतील नळी, (५) आतल्या नळीच्या आतील नळी, (६) ५ च्या तळाची झडप, (७) तेल साठा.,(आ) धक्का संपल्यानंतर (प्रसरण).

 या निसरी धक्काशोषकात बाहेरची नळी (१) तिला दट्ट्या दांडा (२) बसविलेला असून त्याच्या आतल्या टोकाला दट्ट्या (३) आहे.दट्ट्यात तेल इकडून तिकडे व तिकडून इकडे जाऊ देणाऱ्या स्वतंत्र एकमार्गी बिजागरी झडपा (३ अ) आहेत. दट्ट्या दांड्यांच्या बाहेरच्या व आतील नळीच्या (४) बाहेरच्या टोकांना पुढील संबंधासाठी नेढी बसविली आहेत.(४) या नळीची दोन्ही टोके बंद केली असून तिच्या आत  आणखी एक नळी (५) आहे, याच नळीत दट्ट्या पुढे-मागे होतो. (४) या नळीमध्ये तेल भरले आहे, (५) नळीच्या या तळाला मधोमध तेल साठा, (७) मध्ये तेल जाऊ न देणारी एकमार्गी झडप आहे पण या झडपेच्या भोवती काही बारीक भोकेही असतात. अर्थात त्यांतून तेल दोन्हीकडे जाते.

स्प्रिंगेच्या धक्काशोषकात ज्याप्रमाणे स्प्रिंगेचे आकुंचन व नंतर प्रसरण या क्रिया होतात त्याचप्रमाणे या शोषकातही तशाच क्रिया घडतात. आ. ६ च्या (अ) भागात धक्का बसल्याने दट्ट्या जोडलेली व बाहेरची नळी (१) उजवीकडे सरकत असून दट्ट्याच्या उजवीकडील तेल त्यावर दाब पडल्याने (३ अ) मधून डाव्या भागात जात आहे. डाव्या भागात दट्ट्याचा दांडा असल्याने तो भाग उजव्यापेक्षा लहान आहे. म्हणून काही तेल या वेळी तळझडप बंद राहिल्याने बाजूच्या भोकातून तेल साठ्यामध्ये जाते. भोकातील प्रवाह अगदी मर्यादित असतो व त्यामुळे दट्ट्याच्या गतीला धक्क्याच्या प्रमाणात प्रखर रोध ऊत्पन्न होतो. धक्का संपल्यानंतर दट्ट्या उलट डावीकडे जाऊ लागतो व तेलही डावीकडून उजवीकडे येते पण उजवा भाग मोठा असल्यामुळे साठ्यातीलही तेल तळझडप उघडून नळीत येते. भोकांतूनही तेल येतच राहील, या वेळी दट्ट्याला रोध बराच कमी होतो व तो लवकर पूर्वस्थानी येतो.

संदर्भ : 1. Holmes, L., Ed. Odhams New Motor Manual, Bombay.             

           2. Judge, A. W. The Modern Motor Engineer, Vol. III, London, 1962.

ओगले, कृ. ह. दीक्षित, चं. ग.