द्विभाषिकत्व व बहुभाषिकत्व : प्रत्येक मनुष्य हा कोणत्यातरी समाजाचा घटक असतो आणि त्यामुळे त्या समाजाची भाषा हे त्याचे विनिमयसाधन असते. बाहेरच्या जगाशी संपर्क नसलेला व चाकोरीतील संथ जीवन जगणारा प्राणी एकभाषिक असतो. दुर्गम वन्य प्रदेशात अथवा डोंगराळ मुलखात राहणाऱ्या अलिप्त जमातींना हे विधान विशेष लागू पडते. पण प्रत्यक्षात एकापेक्षा अधिक भाषा येणारी माणसे किंवा एकापेक्षा अधिक भाषा नियमितपणे वापरणारे समाजही थोडे नाहीत. या व्यक्तींना किंवा समाजांना द्विभाषिक किंवा बहुभाषिक हे विशेषण लागू पडते. मात्र केवळ दोन भाषा येणे किंवा वापरणे, एवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. त्यामागची कारणपरंपरा आपण पहायला लागलो म्हणजे त्यातील वैचित्र्य आणि गुंतागुंत आपल्या लक्षात येईल.
कारणे व प्रकार : शहरी जीवनात एखादे कुटुंब बहुसंख्य अन्यभाषिक कुटुंबे असलेल्या वस्तीत राहते. अशा परिस्थितीत वाढलेल्या अल्पसंख्य भाषिकाच्या मुलांना बहुसंख्य लोकांची भाषा सहजपणे येऊ शकते कारण समाजात वावरायला लागणारे मूल भाषा शिकत नाही, तर त्याच्या नैसर्गिक संवेदनाक्षमतेमुळे ती त्याला यायला लागते. हे द्विभाषिकत्व मुलाला विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात प्राप्त झालेले असते. मातृभाषा व स्थानिक भाषा या त्या मुलाच्या स्वाभाविक भाषा असतात व त्या दोन्हींवर त्याचे सारखेच प्रभुत्व असते. त्या मुलाची आई व घरातील इतर माणसेही नोकरांशी संबंध आल्यामुळे किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यांत मिसळून कमीअधिक प्रमाणात द्विभाषिक बनतात.
हे वैयक्तिक स्तराचे उदाहरण झाले पण सामाजिक किंवा प्रादेशिक स्तरावरही हे घडू शकते. परभाषिक विजेत्यांचे आक्रमण हे त्याचे कारण असते. आर्यभाषिक लोकांचे भारतात, लॅटिनभाषिकांचे जर्मानिकभाषिक फ्रँक लोकांत अशा प्रकारची आक्रमणे या घटनेच्या मुळाशी असतात. मात्र या घटनेत एक सबंध समाज गुंतलेला असतो. परिस्थितीच्या दडपणामुळे त्याला जेत्यांची भाषा शिकावी लागते आणि ह्या नव्या भाषेवर पराजितांच्या मूळ भाषेचा ठसा उमटतो. कित्येकदा पराजित लोक आपली मूळ भाषा सोडून जेत्यांचीच भाषा स्वीकारतात पण ही नवी भाषा शिकायला लागल्यापासून जुनी पूर्णपणे टाकून देईपर्यंतचा काळ ‘द्विभाषिक काळ’ म्हणून ओळखला जातो. काही पिढ्यांनंतर मात्र ही नवी भाषाच मुलांची परंपरागत भाषा होते. म्हणजे या समाजात विशिष्ट कालमर्यादेत द्विभाषिकत्व ही एक संक्रमक घटना असते.
पराजित समाजाने स्वतःची भाषा सोडली नाही आणि जेत्यांनी पादाक्रांत प्रदेशात कायमची वसाहत केली, तर मात्र असा प्रदेश द्विभाषिक होतो. अनेक परभाषिक लोक येऊन स्थायिक झाल्यामुळे एखादा प्रदेश द्विभाषिक होतो. अतिशय मोठ्या प्रमाणावर भारत हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
या दोनही उदाहरणांत भाषा शिकणाराची इच्छा किंवा हेतू यांना महत्त्व नसते. पण स्वेच्छेने किंवा हेतूपूर्वकही व्यक्ती द्विभाषीक किंवा बहुभाषिक होऊ शकते. याची महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे :
(१) धार्मिक : जुनी भाषा प्रचारातून गेलेली असली, तरी धार्मिक कृत्ये, प्रार्थना इ. प्रसंगी वापरण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या संस्कृत, पाली, लॅटिन यांसारख्या भाषा पुरोहिताचा व्यवसाय करणारा मनुष्य शिकतो. कित्येकदा मात्र कुठे काय म्हणायचे ते अर्थ न समजता पाठ करूनही द्विभाषिकत्वाचा आभास निर्माण करता येतो.
(२) संशोधनपर : प्राचीन इतिहास समजण्यासाठी, जुने ग्रंथ वाचून तत्कालीन समाजस्थिती, इतिहास, भाषा इत्यादींचे ज्ञान मिळविण्यासाठी किंवा केवळ साहित्याच्या आस्वादासाठी अभ्यास केला जातो.
(३) ज्ञानार्जन : ज्याची शास्त्रीय प्रगती आपल्यापेक्षा अधिक आहे, त्या समाजाची भाषा शिकली जाते.
(४) साहित्य : केवळ साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी काही लोक समृद्ध भाषा शिकतात.
(५) भाषांतर : परकीय साहित्य, जुने साहित्य, शास्त्रीय वाङ्मय इ. स्वभाषेत आणण्यासाठी किंवा स्वभाषेतील परभाषेत नेण्यासाठी दुसऱ्या भाषा शिकल्या जातात.
(६) दुभाषीपणा : एकमेकांची भाषा समजू न शकणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये विनीमयाचे काम करण्यासाठी काही लोक धंदा म्हणून एक किंवा अनेक परभाषा शिकतात.
परिणाम : बुद्धिपुरःसर द्विभाषिकत्व पत्करण्याची गरज भाषांतरे, परराष्ट्रीय व्यवहार, दुभाषीपणा, ज्ञानार्जन इत्यादिंच्या अपरिहार्यतेमुळे वाढीला लागलेली आहे. संयुक्त राष्ट्रांत किंवा काही परिषदांत होणाऱ्या भाषणाचे तिथल्यातिथे भाषांतर करावे लागते आणि ते करणाऱ्या व्यक्तीचे भाषेवरील प्रभुत्व व भाषांतर ताबडतोब सांगण्याची झडप यंत्रासारखी असावी लागते.
या जागतिक गरजेमुळे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समाज्यांच्या आणि व्यक्तींच्या गरजेमुळे परभाषा शिकणे व शिकविणे यांचे एक तंत्र बनले आहे. या तंत्रामुळेच भाषेचे अध्यापन या विषयाला गती मिळाली असून अनेक शिक्षणपद्धती, यांत्रिक साधने इ. अस्तित्वात येत आहेत. त्याचप्रमाणे शब्दकोश, व्याकरणे, वाचनमाला इ. साहित्यही फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. भाषाशिक्षक व दुभाषी यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्याही वाढीला लागली आहे.
संदर्भ : 1. Cohen, Marcel, Pour une sociologie du language, Paris, 1956.
2. Meillet, Antoine. Linguistique historique et Linguistique generale, Paris, 1937.
कालेलकर, ना. गो.
“