द्वारावती : प्राचीन अवशेषांचे थायलंडमधील एक स्थळ. याच्या भौगोलिक स्थानासंबंधी अभ्यासकांत मतभेद आहेत परंतु ह्युएनत्संगने उल्लेखिलेले द्वारावतीचे राज्य मेनाम खोऱ्यात, मेनाम नदीकाठी पसरले असावे व त्याची राजधानी नाखोन पाटॉमजवळ बँकॉकच्या पश्चिमेस सु. ६५ किमी. वर द्वारावती या ठिकाणी होती. त्यापैकी एकाची राजधानी लवपुरी (आधुनिक लॉपबुरी) येथे होती. सातव्या-आठव्या शतकांतील मॉन कोरीव लेख या दोन ठिकाणी सापडले. त्यावरून येथील लोक मॉन होते व हीनयान या बौद्ध पंथाचे असावेत.

आग्नेय आशियातील निरनिराळ्या प्रदेशांशी भारताच्या सांस्कृतिक संपर्काची सुरुवात इसवी सनाच्या सुरुवातीपासूनच झाली. इसवी सनाच्या चौथ्या शतकात प्राचीन इंडोचायनात हिंदू राज्ये स्थापन होऊन त्यांनी संस्कृत ही अधिकृत भाषा स्वीकारली. द्वारावती या नावाने प्राचीन काळी ओळखला जाणारा सध्याचा सयामचा (थायलंड) प्रदेश प्राचीन कम्भुज (ख्मेर) साम्रज्याचा एक भाग होता. द्वारावतीच्या कलाशैलीचे नमुने लवपुरी येथे पहावयास मिळतात. येथे अनेक प्रकारची शिल्पे मिळाली. बुद्धाच्या व त्यांत बौद्ध धर्माशी निगडित मूर्ती जास्त आहेत. विष्णूच्या दगडी व ब्राँझच्या मूर्तीवर भारतीय कलाशैलीची छाप स्पष्ट दिसते. मात्र मध्ययुगीन बौद्ध कलेवर ख्मेरच्या शैलीचाच प्रभाव दिसतो.

संदर्भ : Dupont, P. T. Archaeologic Mone de Draravati, Paris,1955.

 

देव, शां. भा.