द्रव्यगुणकर्मविज्ञान: (आयुर्वेद). जीवशरीर शीर्यमाण म्हणजे झिजणारे असते, जीवाच्या जीवन प्रयत्नात होणाऱ्या हालचालींनी शरीरघटक झिजत असतात. शरीरघटक नाश पावत असतात. शरीराच्या ह्या नैसर्गिक घटनेबरोबरच शरीराची झीज भरून काढण्याची अगदी उलट स्वाभाविक प्रवृत्तीही असते. ही झीज जीवाभोवती पसरलेल्या पांचभौतिक किंवा पाच भौतिक विकार द्रव्यांच्या साहाय्यानेच भरून काढली जाते.

वरील दोन्ही प्रकारच्या परस्परविपरीत जीवनपूरक प्रवृत्तीमुळेच जीवाला त्याचे आरोग्यरक्षण,शरीराची पुष्टी,बलवर्धन,दीर्घ जीवन इ.मिळविता येतात.

उपकरण: निसर्गात जी वरील प्रकारची द्रव्ये जीवाच्या भोवती विखुरलेली आहेत,त्या सर्वांना उपकरण असे म्हणतात.ह्या उपकरणांमध्ये काही द्रव्ये शरीराच्या घटकांचे पोषण करतात,ही पोषक द्रव्ये शरीरात पचून शरीराचे घटक व्हावीत म्हणून त्यांना पाचककाही शरीरातील अग्नी वाढविणारी दीपककाही शरीरामध्ये निरुपयोगी द्रव्ये असल्यास ती बाहेर काढून टाकणारी शोधक वगैरे अनेक प्रकारांनी शरीरावर कार्य करणारी असतात.जीवाखेरीज त्याच्याभोवती पसरलेली सर्व सृष्ट द्रव्ये ही त्याची उपकरणे होत.त्याचे शरीर,शरीराचे सर्व मूर्त,अमूर्त,सचेतन,जड व अध्यात्मिक भाव सभोवतालच्या सृष्टीतूनच निर्माण झालेले असतात.ह्या ठिकाणी मानवी जीवाचाच आपण विचार करणार आहोत व त्या दृष्टीनेच पुढील सर्व विवेचन केलेले आहे.

एकांत हितकर द्रव्ये : काही द्रव्ये योग्य उपयोगाने जीवनाला परिपोषक अशीच ठरतात. अशा द्रव्यांना एकांत हितकर द्रव्ये असे म्हणतात.

हिताहीतकर द्रव्ये : काही द्रव्ये वरच्या प्रकारची सर्वस्वी हितकर असत नाहीतती द्रव्ये मानवी शरीराच्या काही प्रकृतींना अनुकूल असतात, तर तीच द्रव्ये काही प्रकृतींना प्रतिकूल असतात.वात प्रकृतीला परिपोषक असणारी द्रव्ये पित्त प्रकृतीला वा कफ प्रकृतीला किंवा दोन्ही प्रकृतींना अनारोग्यकारक असतात.इतर प्रकृतींच्या बाबतीतही वरीलप्रमाणे विचार करावयाचा असतो.ह्या द्रव्यांना हिताहितकर द्रव्ये म्हणतात.

एकांत अहितकर द्रव्ये: काही द्रव्ये जीवशरीरांशी संपर्क आल्याबरोबर जीवशरीर घटकांचा नाश करतात. म्हणजे त्या शरीराच्या दृष्टीने विषारी असतात.

जगातले कोणतेही द्रव्य निरुपयोगी नाही. प्रत्येकाचा औषधी उपयोग होतो असा आयुर्वेदीयांचा सिद्धांत आहे. आरोग्याचे रक्षण करणे, शरीराचे घटक उत्तमोत्तम दर्जाचे बनविणे, आरोग्य बिघडवू न देणे, त्याकरिता देश, काल आणि स्वतःच्या शरीराच्या गुणाच्या विपरीत गुणकर्माच्या द्रव्यांची एकांत हितकर द्रव्यांतून निवड करून त्यांचे सेवन करणे, त्याला अनुसरून विहार करणे उपयुक्त ठरते. ह्याच दृष्टीने दुसऱ्या प्रकारच्याही द्रव्यांचा उपयोग करावयाचा असतो. ह्या योगाने पुढे होणारे रोग टळतात व झालेले रोग नष्ट होतात. तिसऱ्या प्रकारची द्रव्ये–विषे–ही शुद्ध करून अत्यंत सूक्ष्म प्रमाणामध्ये त्यांचा उपयोग करून वरील कार्ये साधता येतात.

सृष्टीतील सर्व द्रव्ये ह्या रीतीने मानव प्राणी आपल्या शरीर स्वास्थ्याकरता उपयोगात आणू शकतो. म्हणून कोणतेही द्रव्य औषध नाही असे नाही.

पांचभौतिकत्व: सृष्टीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पाच प्रकारची द्रव्ये विखुरलेली दिसतात, ह्यांना महाभूते असे म्हणतात. तशीच काल व दिशा ही दोन द्रव्ये पण अस्तित्वात आहेत. ह्या द्रव्यांच्या विशिष्ट संयोगाने निरनिराळी अनंत जड द्रव्ये निर्माण झाली आहेत, ह्या जड द्रव्यांप्रमाणे आत्मा व मन ही सचेतनत्व निर्माण करणारी द्रव्येही सृष्टीत आहेत.

पंचमहाभूत विकारता : आत्मा हा सर्वव्यापी आहे. पांचभौतिक द्रव्ये आणि आत्मा व मन ह्यांचा संयोग होऊन जड द्रव्यांपेक्षा भिन्न असे जीवद्रव्य निर्माण झाले. जीव ज्या स्वरूपात दृश्य होतो त्या दृष्ट द्रव्याला शरीर असे म्हणतात. त्या शरीराचे जे घटक बनतात ते वरील पांचभौतिक द्रव्यांपेक्षा निराळे बनतात, त्यांना पंचमहाभूत विकार असे म्हणतात. म्हणून जीवशरीरात पंचमहाभूत विकार बाहुल्याने असतात. ते पंचमहाभूत विकारात्मक असे असते, हा पंचमहाभूत विकारांचा समुदाय आत्म्यांचे अधिष्ठान असतो. जेव्हा जेव्हा जीवाचा विचार करावयाचा असतो तेव्हा तेव्हा पंचमहाभूते व तज्जन्य विकार ह्यांचा विचार करावयाचा असतो, विशेषतः ह्या विकारांचाच विचार अधिक करावा लागतो.


जीवप्रकार : सृष्टीचे दोन प्रकार– (१) जड व (२) सचेतन.पंचमहाभूते,काल व दिशा ही द्रव्ये जड होत व जीव सचेतन द्रव्य होय.सचेतन द्रव्यांमध्ये वनस्पती व प्राणी अशी दोन द्रव्ये प्राधान्याने असतात.ती स्थूल स्वरूपात आढळतात तशीच ती सूक्ष्म आणि अती सूक्ष्म स्वरूपातही आढळतात.ती ग्रह भूते,त्यांचे परिचारक (जंतू) अती सूक्ष्म स्वरूपात असतात.अती सूक्ष्म जीवांची म्हणजे जंतूंची चिकित्सा करावी लागते,साथीच्या विकारांना हेच कारण होतात.

 पुरुष व पुरुष शरीर विकार: ह्या वैद्यक क्षेत्राचा केंद्रबिंदू मानव आहे.मानव हा चिकित्सेचे अधिष्ठान आहे व त्याच्या दृष्टीने सर्व सृष्ट द्रव्यांचा म्हणजे उपकरणांचा विचार करावा लागतो.

पुरुष शरीरात रस,रक्त,मांस इ. पंचमहाभूत विकार आहेत तसेच मन,बुद्धी (धी), धृती, स्मृती इ. आध्यात्मिक विकारही आहेत. हे पुरुष शरीर विकार होत.

पुरुष शरीरात जे घटक आणि सृष्टीमधील अनादिरूपाने शरीरात गेलेली पंचमहाभूते व पंचमहाभूत विकार ह्यांचा एकमेकांशी संपर्क होतो, तेव्हा ते एकमेकांवर आक्रमण करीत असतात, तो त्यांचा स्वभाव आहे. जे बलवान ठरतील ते विजयी होतात व अबल ठरतील ते नष्ट होतात, पुरुषाला रोग होणे ह्याचा अर्थ भोवतालच्या पंचमहाभूतांचे किंवा त्यांच्या विकारांचे शरीरावर आक्रमण झाले आहे आणि त्यांत पुरुष हा अबल ठरला आहे, असा होतो. त्याचे मरण ह्याचा अर्थ त्याचा पूर्ण पराभव असा होतो.

पुरुषाचा स्वसंरक्षणचा प्रयत्न: आप, तेज, वायू ह्या बलवान महाभूतांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून त्यांचे प्रतिस्पर्धी जे पृथ्वीमहाभूत त्याचे साहाय्य घेतो, घरे बांधून त्यांत तो राहतो. संपर्काने होणारे त्यांचे अतिक्रमण थांबवितो. बलवान महाभूतांचे अशा रीतीने अतिक्रमण थांबविण्याकरिता जसा हा प्रयत्न असतो तसा अबल महाभूतांचा आपल्या आरोग्य रक्षण व वृद्धीकरिताही तो उपयोग करून घेतो. आपल्याला मानवेल तेवढी हवा, तेवढी उष्णता व प्रकाश आणि तेवढे पाणी तो आपल्या संपर्कात येऊ देतो आणि तो त्याचा उपयोग करून घेतो. कोणत्याही आक्रमकाच्या प्रतिकाराकरिता त्याच्या विपरीत गुणकर्माच्या महाभूताचा उपयोग तो करून घेतो.

महाभूतांचा प्रतिकार व जीवन: पुरुष महाभूताचा प्रतिकार करीत असतो. त्यात त्याचे शरीर व मन ह्यांची जी हालचाल होते तीत शरीर घटकांची झीज होते, ते संख्येने कमी होतात, पुरुषाच्या जन्मापासून हा प्रयत्न त्याला करावा लागतो. ही होणारी झीज जर त्याला भरून काढता आली नाही, भरून काढण्याची युक्ती व सामर्थ्य त्यात नसेल, तर तो जन्मतःच आक्रमकाच्या आक्रमणाला बळी पडून मरेल. ही झीज भरून काढण्याची युक्ती व सामर्थ्य जीवशरीरात असते. तो भोवतालच्या ज्या पंचमहाभूतांतून किंवा त्यांच्या विकारांतून उत्पन्न झालेला असतो त्यांतूनच आपल्याला मानवतील असे त्याचे अंश घेऊन त्याची भर घालून आपल्या शरीरात तो ती झीज भरून काढतो. जीवशरीराचे शीर्ण होणे (शीर्यते इति शरीरम्) हा जसा स्वभाव आहे. तसे त्याचे भरण करण्याची प्रवृत्तीही त्याबरोबरच जीवात असते, जिवाचा सतत तसा प्रयत्न असतो.


भरण प्रवृत्ती व मर्यादा: जीवशरीराची शरीरभरण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती फार जोराची असते. जन्मल्यापासून तारुण्य संपेपर्यंत ही भरण प्रवृत्ती केवळ झीज भरून काढण्यापुरतीच परिमित नसते. तर ही झीज भरून काढून शिवाय संख्येने अधिक घटक निर्माण करण्याचीही प्रवृत्ती असते व ती वर्ग प्रमाणात वाढणारी असते. म्हणूनच मानवी शरीर सूक्ष्म बीजापासून उत्पन्न होऊन तो पंचवीस वर्षांत (सामान्यत: १६५–१८० सेंमी. उंच) सु ६० किग्रॅ. वजनापर्यंत ते वाढते. ही वजनाची भर प्रत्येक क्षणी झरणाऱ्या शरीरघटकामध्ये पडते आणि तो शक्तिसंपन्न महापुरुष त्या निसर्गाचा प्रतिकार करण्याकरिता उभा ठाकतो. ही प्रवृत्ती मध्यम वयात कमी होते व झिललेले घटक भरून काढण्याची प्रवृत्तीच फक्त राहते व वार्धक्यात तिलाही ओहोटी लागते. झिजलेल्या घटकांची भर त्या जीवाला करता येत नाही व पुढे शरीर क्षीण होत जाऊन शंभरीच्या काळात तो मरतो म्हणजे पंचमहाभूतांच्या आक्रमणाचा बळी होतो.

जीवन प्रयत्न क्र. २– पचन: द्रव्ये शरीरात घेतल्यानंतर तशीच्या तशी झिजलेल्या घटकाच्या जागेवर नेऊन बसविली जात नाहीत कारण मानवी शरीरघटक, इतर जीव शरीरघटक, वनस्पती शरीरघटक आणि पंचमहाभूते घटक परस्परांपासून अतिशय भिन्न असतात. यांचे गुणधर्म भिन्न असतात म्हणून स्वशरीराच्या घटकांशी अनुरूप बनवून घेणे जरूर असते. अनुरूप बनवून घेण्याकरिता ती द्रव्ये शरीरात घेतल्यानंतर अनुरूप बनविण्याची प्रक्रिया जीव सुरू करतो. स्वतःच्या शरीरातील काही द्रव्ये त्या द्रव्यांत मिसळून त्याच्याद्वारा त्यांचे पृथक्करण करून अनुरूप सार द्रव्ये ग्रहण करणे व निरुपयोगी (किट्ट) द्रव्ये शरीराच्या बाहेर टाकून देणे असे स्वरूप ह्या प्रक्रियेचे असते. ही प्रक्रिया घन व द्रव्य द्रव्यांबद्दल पोटात, वायूरूप पदार्थांबद्दल फुफ्फुसांत प्राधान्याने चालते. घेतलेल्या द्रव्यातून अनुरूप द्रव्ये निवडण्याकरिता जे द्रव्य त्यांच्यात मिसळण्यात येते त्यास पित्त किंवा अग्नी असे म्हणतात व त्या कार्यास पचन असे म्हणतात. हे फुफ्फुस व पोट ह्यांचा कोष्ठ या अवयवामध्ये समावेश होतो. ह्या पचनाला कोष्ठ पचन म्हणावे, पोटातल्या पचन करणाऱ्या अग्नीला पाचकाग्नी म्हणतात.

अव्याहत पचन: हे बाह्य द्रव्य पुरुष शरीरात आत्मसात करून घेण्याच्या दृष्टीने पहिले महत्त्वाचे पचन होय. ह्या पचन कार्यातून शरीराला अनुरूप अशी (परिपोषक) निवडलेली द्रव्ये यकृत, हृदय इ. अवयवांकडे व मांस, स्नायू इ. अवयवांकडे पोषणाकरिता पाठविली जातात. ह्यांना सार द्रव्ये म्हणतात. पाचकाग्नी ह्या बाह्य घटकांत मिसळल्यानंतर त्यांचे जे पचन सुरू होते, ते तो घटक शरीरात असेपर्यंत अव्याहत चालू असते.

कोष्ठामध्ये पहिले पचन झाल्यानंतर व ते अवयवांकडे पचनाकरिता येण्यासाठी कोष्ठातून शोषले जाते. नंतरही त्या घटकांचे स्वतःच्याच अग्नीने सतत पाचन होत असते व त्यांतून सारकिट्ट बनत असतात. सारकिट्ट घटकांतून शरीराला उत्तमोत्तम घटक मिळत असतात व ते आपापल्या योग्यतेप्रमाणे शरीराचे पोषण करीत असतात.

परिणत व परिणाममापद्यमान घटक : शरीरामध्ये सर्व अंगप्रत्यंगांचे जे कार्यकारी घटक असतात ते परिणत घटक असतात. ते घटक शरीर कार्यात झिजत असतात. त्यांची झीज भरून काढावयाची असते, त्यांचे पोषण करावयाचे असते म्हणून त्यांना पोष्य घटक असे म्हणतात आणि त्यांच्या पोषणाकरिता बाह्य द्रव्यांतून घेतलेल्या घटकांना पोषक घटक म्हणतात. त्या घटकांना परिणाममापद्यमान घटक असेही म्हणतात. शरीरात आलेले घटक त्यांच्या योग्यतेप्रमाणे ते ज्या शरीरघटकांशी एकरूप होऊ शकतील, ज्या घटकांत आत्मसात होऊ शकतील, त्या घटकांकडून ते ग्रहण केले जातात. पुन्हा तेथे पचन होते. त्या पचनात त्याज्य म्हणजे किट्ट बाहेर फेकले जाते व सार स्वतःच्या शरीराचा घटक बनविला जातो. अशा रीतीने हे तिसरे पचन होऊन बाह्य सृष्टीतला घटक शरीराचा घटक बनतो. शरीर त्याला आत्मसात करते व बाह्य सृष्टीशी झगडा करण्याला समर्थ बनते. सारांश पुरुष आक्रमक द्रव्यांना यशस्वीपणे तोंड देण्याला समर्थ होतो.

भूक-मागणी: झिजलेल्या शरीराची भर करण्याकरिता पुरुष भोवतालच्या सृष्टीतील जे अंश घेतो ते कोणते तरी अंश घेत नाही. शरीरातील घटक ठराविक प्रमाणात झिजल्यानंतर बाहेरचे घटक घेण्याची त्याला इच्छा उत्पन्न होते. ही जी इच्छा संवेदना तिला भूक असे म्हणतात. भूक लागली की ती द्रव्ये घेतली पाहिजेत अशी जाणीव त्याला निर्माण होते आणि ती द्रव्ये तो घेण्याला प्रवृत्त होतो व घेतो. भूक ही बाह्य घटकांची मागणी आहे.


सम गुणांची मागणी: शरीराला श्रम झाले असता ज्या गुणांचे घटक झिजतात त्या गुणांचे घटक घेण्याची त्याला इच्छा उत्पन्न होते. शरीरातील मांस धातूचे घटक जास्त झिजले तर मांसाची झीज भरून काढणाऱ्या परिपोषक बाह्य सृष्टीतील इतर प्राण्यांचे मांस किंवा मांसाच्या गुणकर्माशी समान गुणधर्म असणारी वनस्पतीतील द्रव्ये उदा., आंबा इ. खाण्याची इच्छा होते. शरीरातले गोड रसाचे घटक झिजले तर गोड पदार्थ निर्माण करणाऱ्या घटकांचीच मागणी होते. उष्ण घटक घटले तर उष्णाची, शीत घटक घटले तर शीताची मागणी होते. अशा तऱ्हेने शरीरातील ज्या गुणकर्माचे घटक झिजले असतील त्याच सम गुणकर्माचे घटक शरीराने–जीवाने–आत घेतले, तर त्यांची पूर्ती होऊ शकते, अर्थात भोवतालच्या सृष्टीतून ह्या ज्ञानी जीवाला तसेच पदार्थ निवडून घ्यावे लागतात.

प्रमाण: भूक ही बाह्य घटक आत घेण्याची एक इच्छाच आहे पण ती ढोबळ आहे. त्या भूकेत गोड घेण्याची किंवा थंड घेण्याची अशा इच्छांच्या छटा असतात, आणि जीवाची ही स्वाभाविक स्थूल व सूक्ष्म छटांनी इच्छा जशी असेल व जितकी असते, तितके पदार्थ शरीरात घेतले गेले, म्हणजे जीव झालेली झीज भरून काढून पूर्ववत सामर्थ्यवान बनतो. शरीराला साम्यता आणतो व सामर्थ्यवान बनतो.

प्राकृत शरीरात हे सर्व गुण शरीराच्या गरजेप्रमाणे असल्यामुळे म्हणजे समप्रमाणात असल्यामुळे सर्व तऱ्हेचा आहार त्याला चालू शकतो. भुकेच्या वेळी त्याला अमक्याच विशिष्ट गुणांचा आहार हवा असे नसते.

राखीव पचनशक्ती : जीवामध्ये वर जिला पचनशक्ती असे म्हटले आहे, ती अगदी परिमित झिजलेल्या घटकांची पूर्ती करण्याइतके घटक घेऊन पचवून आत्मसात करण्याइतकीच परिमित असते असे नाही. जीवामध्ये काही प्रमाणात अधिक राखीव पचनशक्ती असते. ही पचनशक्ती व्यवस्थित रीतीने उपयोगात आणली म्हणजे शरीराची वाढ होते, त्याचे सामर्थ वाढते. जीवाच्या बालपणी हीच पचनशक्ती बालकाचे शरीर वाढवते.

राखीव कर्मशक्ती : शरीरात परिमित प्रमाणात हालचाल केली म्हणजे नेमकी शरीराची झीज होते आणि त्याची पूर्ती करून जीव जगतो व वाढतो असे नाही. जीवामध्ये वाढती पचनशक्ती जशी असते तसेच शरीरकर्म करण्याची वाढती शक्तीही असते. वाढत्या शक्तीमुळे वाढती हालचाल आणि वाढती झीज होत असते. वाडत्या झिजेमुळे वाढती घटकद्रव्ये घेण्याची प्रवृत्ती व त्यापेक्षाही अधिक घटक घेण्याची इच्छा–प्रवृत्ती निर्माण होते आणि ती पचन करण्याच्या शक्तीपेक्षाही अधिक पचवण्याची शक्ती शरीराची अधिक जोमाने वाढ होण्याच्या दृष्टीने स्वाभाविक व इष्ट आहे. बालक ह्या वरील प्रकारच्या राखीव पचनशक्तीचा व अधिक कर्मशक्तीचा उपयोग करून घेऊन आपली वाढ करीत असते. ही कर्मशक्ती पण बालकाच्या ठिकाणी जास्त असते व बालकाची जी सारखी हालचाल दिसते ती ह्या शक्तीचे व प्रवृत्तीचेच दर्शक आहे.

पुरुष गुणकर्म: कोणतेही द्रव्य ओळखावयाचे असेल, तर त्याच्या गुणकर्मावरून ते ओळखावे लागते. पुरुष हे एक द्रव्यच आहे. पुरुषशरीरात झालेला क्षयही गुणकर्मानीच व्यक्त करतो हे वर थोडक्यात दाखविले आहे. शरीरात मधुर द्रव्ये कमी झाली, तर शरीर मधुर गुणवान द्रव्यांची मागणी करते. मानवी शरीरात एकंदर २६ गुण असतात असे मानवाचा अभ्यास करणाऱ्या आयुर्वेदीयांना दिसून आले आहे. ह्या गुणांत जो गुण कमी होईल तो गुण घेण्याची शरीर इच्छा करते. तो मिळवून शरीरात घेऊन त्याची पूर्ती करून घेतो. हा मानवी पुरुषशरीरातील नियम दिसून येतो.


पुरुष विकार: मानव शरीराच्या वरील स्वाभाविक नियमाला अनुसरून वागला, तर बहुधा रोग होणार नाही पण वरील नियमाचे पालन तो करीत नाही. बाह्य निसर्गाचे अंश शरीराच्या गरजेपुरते न घेता तो कमीजास्त घेतो. ती त्याला खोड लागते. सतत अनेक दिवस, अनेक वर्षे तो तसेच वागतो. त्यामुळे त्याच्या शरीराचा तोल जातो. समत्व ढळते. विषमत्व निर्माण होते. त्या विषमत्वामुळे शरीराला कमी पडलेले घटक आणि जास्त झालेले घटक दोन्ही त्रासदायक होतात. हे दोन्ही शल्यरूप होतात. दुःखद संवेदना निर्माण करतात. त्या संवेदना जे जटिल स्वरूप धारण करतात त्यालाच विकार वा रोग असे म्हणतात. हे बाहेरचे घटक शरीराच्या अवयवांचा नाश करतात. तो अनेक प्रकारांनी होतो. त्या वेळीसुद्धा जे घटक शरीराच्या गरजेपेक्षा जास्त झालेले आहेत त्यांचा नाश करणे व कमी असलेल्यांची भरपाई करण्याचा प्रयत्न पुरुष आटोकाट करीत असतो. त्यांचा नाश व भरण वरील नियमाप्रमाणे करीत असतो. पुरुषाचा हा प्रयत्न त्याच्या सांकेतिक भाषेने तो व्यक्त करीत असतो. त्या भाषेचा अभ्यास तज्ञ वैद्याने केलेला असतो.

गुणांचा द्वेष व विपरीत गुणांची मागणी: उष्णादी गुण कमी झाले असताना त्या गुणांची इच्छा होते, त्याच्या उलट ते गुण शरीरात जास्त झाले असताना शरीरात त्या गुणांचा द्वेष निर्माण होतो म्हणजे इंद्रियांना पुरुष ते पदार्थ आत घेऊ नका, असा आदेश देतो. इतकेच नाही तर ह्या गुणांची द्रव्ये शरीरात विशिष्ट प्रमाणांपेक्षा जास्त झाली, तर त्या द्रव्यांच्या विपरीत गुणांच्या द्रव्यांची इच्छा निर्माण होते. म्हणजे उष्ण गुणाची वृद्धी झाली असता उष्ण गुणांचा द्वेष निर्माण होतो. ही उष्ण द्रव्ये काही प्रमाणांपेक्षा आणखी अधिक झाली, तर त्या द्वेषाबरोबर उष्ण गुणाच्या विपरीत शीत गुणाची इच्छा उत्पन्न होते. ह्या इच्छांना मान देऊन त्यांचा बरोबर अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे त्या त्या द्रव्याचा उपयोग शरीरात केला, म्हणजे ती द्रव्ये त्या द्रव्यांचा कमीजास्तपणा नाहीसा होऊन म्हणजे वैषम्य नाहीसे होऊन समत्व प्राप्त होते म्हणजे आरोग्य प्राप्त होते. पुरुष नेहमी सतत ह्या दृष्टीने आपल्या आरोग्यरक्षणाचा प्रयत्न करीत असतो.

सुखदु:ख: पुरुषाच्या गरजेप्रमाणे व प्रमाणात द्रव्ये शरीरात गेली, तर सुख होते आणि कमीजास्त प्रमाणात गेली, तर दुःख होते. दुःख निरनिराळ्या प्रकारांनी शरीर व्यक्त करते, त्यांना चिन्ह म्हणतात.

शरीराची भाषा: सम द्रव्याच्या इच्छा वा द्वेष व विपरीत द्रव्याची इच्छा वा द्वेष तसेच शरीरात चालू असलेल्या घडामोडींची दर्शक चिन्हे ही शरीराची भाषा होय. ह्या भाषेचे ज्ञान वैद्याला असते. पुरुषाला शरीराकरिता काय हवे, काय नको हे यावरून कळते. वैद्याला कळलेल्या या ज्ञानाला निदान म्हणतात व जे करावयाचे त्याला चिकित्सा म्हणतात.

द्रव्यांचे पंचमहाभूत विकार दृष्ट्या वर्गीकरण: सृष्टीतील ज्या द्रव्याचा मानवी शरीराला उपयोग करून घ्यावयाचा असेल ते द्रव्य मानवी शरीरातील पंचमहाभूते किंवा पंचमहाभूत विकार तसेच इंद्रिय द्रव्ये व धी, धृती, स्मृती इ. अध्यात्मिक द्रव्ये ह्यांपैकी कोणाचे परिपोषक वा वर्धक आहे अथवा वरील कोणत्या शरीर घटकात बाधक आहे हे पाहून ठेवले पाहिजे. ह्या दृष्टीने प्रत्येक द्रव्याचा अभ्यास केला पाहिजे.

जे द्रव्य ज्या घटकांची पुष्टी करते किंवा जे द्रव्य ज्या घटकांचा नाश करते,ही दोन्ही द्रव्ये तत्गामी द्रव्ये असे म्हणावे.जे द्रव्य शरीरात गेल्यानंतर डोळ्यांची पुष्टी करते,त्याला चक्षुष्य वा नेत्र्य असे म्हटले जाते.तसेच जे द्रव्य दृष्टीचा नाश करते किंवा डोळ्यात दोष उत्पन्न करते,त्या द्रव्याला अचक्षुष्य किंवा अनेत्र्य असे म्हटले जाते.चक्षुष्य द्रव्ये व अचक्षुष्य द्रव्ये शरीरात गेल्यानंतर ती शरीरातल्या इतर आंगोपांगांमध्ये स्थिर न होता डोळ्यांमध्ये जाऊन स्थिर होतातव आपल्या स्वभावाप्रमाणे इष्टानिष्ट कार्य करतात.ही दोन्ही प्रकारची द्रव्ये नेत्रगामी होत.ह्याप्रमाणे हृद्द आणी अहृद्द द्रव्ये हृदयगामी आणि कंठ्य व अकंठ्य द्रव्ये कंठगामी असतात.ह्याप्रमाणे रसरक्तादी धातुगामी द्रव्येही असतात.


पंचमहाभूते व दोष : प्राणिशरीरात दोष हे पंचमहाभूतांचे विकार आहेत. ते निर्माण होतात. पृथ्वी व आप ह्यांनी कफ, तेज व जल ह्यांनी पित्त आणि वायू व आकाश ह्यांनी वायू निर्माण होतो. कफामध्ये जल, पित्तामध्ये अग्नी व वायूमध्ये वात ही प्रधान द्रव्ये असतात. वरील पांचभौतीक द्रव्यांचे ह्याप्रमाणे मिश्रण होऊन कफस्वभावी, पित्तस्वभावी व वातस्वभावी द्रव्ये मिर्माण होतात.

कफादी धातुवृद्धी : कफस्वभावी द्रव्ये कफ, पित्तस्वभावी द्रव्ये पित्त, वातस्वभावी द्रव्ये वात वाढवितात. ह्या द्रव्यांमध्ये मानवी शरीराला सहजरीत्या आत्मसात होऊ शकतील असे ते ते घटक द्रव्यतः व गुणकर्मतः असले, तर मानवी शरीरात ते कफ, पित्त व वात हे धातू बनतात.

कफादी दोषवृद्धी : ते घटकद्रव्य गुणकर्मतः मानवी शरीरात सहजगत्या आत्मसात न होणारे असले, तर ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे कफादी दोष वाढवितात. सहज आत्मसात होणारी द्रव्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेतली, तर कफादी धातू न वाढविता कफादी दोषच वाढवितात.

कफादिकांचा नाश: ही कफादी धातुवृध्दी करणारी द्रव्ये शरीरात गेल्यानंतर जसे त्या त्या धातूची वृध्दी करतात त्याचप्रमाणे त्याच्या विपरीत गुणी दोषांचा म्हणजे वात–पित्त ह्याचा ते नाश करतात. कफादी दोषवर्धक द्रव्ये शरीरात पचतील अशा रीतीने (युक्तीने) घेतली असता ती कफधातू वाढवितात व विपरीत गुणी दोषांचा नाश करतात. कफस्वभावी द्रव्ये वात–पित्तांचा नाश करतात. पित्त स्वभावी द्रव्ये वात–कफांचा नाश करतात व वातस्वभावी द्रव्ये कफ–पित्ताचा नाश करतात तसेच समान द्रव्ये वाढवितात.

वातस्वभावी रुक्षादी गुणयुक्त द्रव्ये शरीरात घेतल्यानंतर कफांचा नाश करतात व त्याच वेळी वाताची वाढ करतात. उष्णस्वभावी द्रव्ये जेव्हा कफाचा किंवा वाताचा नाश करतात तेव्हा त्याच वेळी पित्ताची वाढ करतात.

वृद्धिनाश पुरुष करतो, द्रव्ये करीत नाहीत. रुक्षादी द्रव्ये कफाचा नाश व पित्ताची वृध्दी करतात असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कर्तृत्व जरी आपण त्या गुणवान द्रव्यांकडे देण्याचे बोलत असलो, तरी ते कर्तृत्व त्याचे नसते. ती द्रव्ये साधन–करण असतात. त्या साधनाने शरीरस्थ पुरुष ते काम करीत असतो. जेव्हा शरीरात दोषांची वृद्धी होते तेव्हा ती विकृत असते. ती दोषवृद्धी न होऊ देण्याचा प्रयत्न पुरुष करीत असतो.

मानव व प्राणिज सृष्टी: मानव हा प्राण्यांचा आहार व औषधी रूपाने आपल्या जीवनाकरिता उपयोग करीत असतो. मानव शरीरातील घटक व इतर प्राण्यांमधील घटक एकमेकांशी पुष्कळच जुळते व जवळचे आहेत. मानवामध्ये जे कफपित्तादी दोष, रसरक्तादी धातू, मूत्रपुरीषादी मळ आणि इतर द्रव्ये आहेत तशीच इतर प्राण्यांमध्येही बहुधा आहेत. प्राण्यांचा रसधातू मानवी शरीरात गेल्यानंतर मानवाच्या रसधातूमध्ये, प्राण्याचा रक्तधातू मानवाच्या रक्तधातूमध्ये, प्राण्यांचा मांसधातू मानवाच्या मांसधातूमध्ये जातो. म्हणजे प्राण्यांच्या शरीरातील प्रत्येक घटक मानवाच्या शरीरातील प्रत्येक घटकामध्ये जातो. प्राण्यांच्या प्रत्येक अवयवाचा घटक मानवाच्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या घटकांत जातो. म्हणजे प्राणिशरीरातील जे जे घटक मानवी शरीरांत आहारादी रूपाने जातील ते ते घटक मानवी शरीरात त्या त्या घटकांत जाऊन आपल्या स्वभावाप्रमाणे कार्य करतात.

ते घटक मानवी शरीरातील ज्या घटकात जातात त्या घटकाशी समान गुणकर्माचे असले, तर ते घटक वाढवितात आणि विपरीत गुणकर्माचे असले, तर त्या घटकाचा नाश करतात. ह्या गुणकर्माचा उपयोग व द्रव्याच्या स्वभावाचा उपयोग गरजेप्रमाणे वैद्याने करून घ्यावयाचा असतो.

आष्टीकर, अ. वा.