दौंड : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १९,३८७ (१९७१). हे पुण्याच्या पूर्वेस ७७ किमी. भीमा व घोड या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले असून मध्य रेल्वेच्या पुणे–सोलापूर या लोहमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. १९३६ पासून येथे नगरपालिका आहे. येथे राखीव पोलीस दल आणि परदेश दळणावळण केंद्र असून डीझेल व वाफेच्या एंजिनांच्या दुरुस्तीचा मोठा कारखाना आहे. शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, दवाखाने, ख्रिस्ती अनाथालय वगैरेंच्या सोयी आहेत. येथील बरीच वस्ती रेल्वे कामगारांची आहे. दौंड हे महादजी शिंद्यांचे वतनगाव असून त्यांनी येथील विठोबा आणि भैरवाचे देऊळ बांधले. एप्रिलमध्ये येथे भैरवाची जत्रा भरते.
पाठक, सु. पुं.