दैववाद : देवदेवता किंवा दैवी शक्तींनी व्यक्तीच्या जन्माच्या वेळीच तिचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व भविष्य ठरविलेले असते, असे मानण्याची वृत्ती म्हणजे दैववाद होय. आदित्यादी नवग्रह, नक्षत्रे, राशी (नक्षत्रांचे समुदाय), राशिस्वामी इत्यादींनाही दिव्य शक्तीने संपन्न अशा देवता मानले जाते. या देवतांची व्यक्तिनिरपेक्ष व बलिष्ठ अशी शक्ती म्हणजे दैव होय. विश्वातील सर्व घडामोडी दैवाच्या अंध व यांत्रिक सामर्थ्याने नियंत्रित केलेल्या असतात, असे दैववादी लोक मानतात. नैतिक अथवा बुद्धिगम्य व्यवस्थेतून आणि कार्यकारणाधिष्ठित नियमांच्या द्वारे जगातील घटनांचे नियंत्रण होते, असे ते मानत नाहीत. कार्यकारणभावाच्या अपरिहार्य व अपरिवर्तनीय नियमांप्रमाणे विश्वातील घटना घडतात, असे मानणाऱ्या सिद्धांताला नियतिवाद म्हणतात. कधीकधी नियतिवाद आणि दैववाद यांची गल्लत केली जात असली, तरी ते दोन्ही सिद्धांत एकमेकांपासून वेगळे आहेत.

जेव्हा अत्युत्कृष्ट असे मानवी प्रयत्नही निष्फळ ठरतात, आकस्मिक मृत्यू घडतो किंवा एखादी विलक्षण घटना अनपेक्षितपणे घडते तेव्हा तर दैववादी माणसांचा देवावरचा विश्वास अधिकच दृढ होतो. विशेषतः व्यक्तीचा जन्म, विवाह, आरोग्य, मृत्यू इ. बाबतींत घडणाऱ्या घटना दैवामुळेच घडतात, असे मानले जाते. दैवच माणसाला प्रगती अथवा अधोगतीकडे नेते एखाद्या शहराचे, समाजाचे वा राष्ट्राचेही भविष्य दैवाने निश्चित केलेले असते जे व्हावे म्हणून दैवाने ठरविले असेल ते होणारच आणि जे होऊ नये म्हणून ठरविले असेल ते कधीही होणार नाही खेळ, युद्ध अथवा इतर क्षेत्रांतील यशापयश दैवाधीन असते इ. समजुती असतात. व्यक्तीच्या जन्माच्या वेळीच ब्रह्मदेवाने तिचे भविष्य तिच्या कपाळावर लिहिलेले असते, असे हिंदू लोक मानतात. मूल जन्मल्यानंतर पाचवीपूजेच्या वेळी बाळंतिणीच्या खोलीत कागद,पेन्सिल इ. लेखनसाहित्य ठेवण्याची प्रथा त्यांच्यात आहे. त्यावेळी देवी व्यक्तीचे भविष्य लिहिते, असे मानले जाते. हिंदू धर्माप्रमाणेच जगातील इतर सर्व धर्मांत व संस्कृतींत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दैववादाला स्थान आहे. दैव बलवत्तर आहे, या अर्थाच्या म्हणी बहुधा प्रत्येक भाषेत आढळतात. साधारणतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये दैववादी प्रवृत्ती अधिक आढळते. दैववादावरील विश्वासामुळेच पूर्वी राजेलोकांच्या पदरी राजज्योतिषी असत.

दैवाने आधीच ठरविलेल्या भविष्यातील घटना प्रत्यक्ष घडून येण्यापूर्वीच जाणून घेण्याचे काही मार्ग आहेत, असे मानणे ही दैववादी लोकांची एक महत्त्वाची प्रवृत्ती होय. या प्रवृत्तीतूनच भविष्य वर्तविणारी शकुनविद्या, फलज्योतिष, शरीरलक्षणविद्या, हस्तसामुद्रिक इ. शास्त्रे निर्माण झाली आहेत. जन्मकाळची ग्रहस्थिती, नंतर वेळोवेळी होणारी ग्रहांची स्थित्यंतरे, ग्रहयोग, ग्रहणे, उल्कापात, धूमकेतू, चंद्राला पडलेले खळे इत्यादींना भविष्यसूचक मानले जाते. पापण्या, बाहू, मांड्या इ. अवयवांची स्फुरणे शुभाशुभसूचक मानली जातात. एखाद्या कामाला निघताना विधवा, सुवासिनी, वेश्या, बोडका मनुष्य इ. समोर येणे हे सूचक समजले जाते. शिंकणे, तळहात खाजणे, मांजर आडवे जाणे, पाल चुकचुकणे वा अंगावर पडणे, घुबड ओरडणे, कुत्रे रडणे, कावळा अंगावर बसणे किंवा ओरडणे इ. शकुन शुभाशुभसूचक मानले जातात [⟶ शकुनविचार]. हातावर असलेल्या रेषा आणि उंचवटे यांच्या स्वरूपावरून आणि कपाळ, नाक, ओठ, हनुवटी, कान, नखे, पापण्या, भुवया, कानांवरील केस इत्यादींच्या रचनेवरून वा शरीरावरील लक्षणांवरून भविष्य वर्तविले जाते. शरीरावरील पद्म, शंख, चक्र इ. चिन्हे सूचक समजली जातात. तिथी, वार, महिने इत्यादींवरून काढले जाणारे मुहूर्त भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. विशिष्ट आकड्यांना शुभ किंवा अशुभ म्हटले जाते. फासे, सोंगट्या, कौल, दिव्यदृष्टी, संमोहनविद्या, प्लँचेट इत्यादींचाही भविष्य जाणण्यासाठी उपयोग केला जातो. जन्मपत्रिका, स्फटिक किंवा विशिष्ट काच यांत पाहूनही भविष्य सांगितले जाते [⟶ फलज्योतिष भविष्यकथन हस्तसामुद्रिक].

घडण्याआधीच कळलेले भविष्य प्रतिकूल वाटत असेल, तर ते अनुकूल करून घेण्याची इच्छा बाळगणे, ही दैववादी लोकांची आणखी एक प्रवृत्ती होय. वस्तुतः दैवाने निश्चित केलेले भविष्य अपरिवर्तनीय व अनुल्लंघनीय मानले जाते परंतु काही प्रयत्नांनी ते बदलता येते, अशी ही समजूत असते. दैवाने भविष्याचा स्थूल आराखडा आखलेला असला, तरी त्यात अनुकूल वा प्रतिकूल तपशील माणसांच्या कृतींनीच भरला जातो किंवा दैवाचा संकेत बदलतो, असे काहीजण मानतात. ग्रहदेवतांची आराधना, पूजाअर्चा, साधना, तपश्चर्या, मंत्रतंत्र, जादूटोणा, दानादी धार्मिक कृत्ये, ताईत, नवस, अंगठीतील विशिष्ट खडे, ग्रहांची रत्ने इत्यादींच्या द्वारे भविष्य अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. प्रवास, युद्ध, विवाह इ. कार्यांची सुरुवात मुहूर्त पाहून केली जाते. दैवाच्या प्रभावाने मृत झालेल्या सत्यवानाला सावित्रीने जिवंत केले, ही हिंदूंची कथा श्रद्धापूर्वक केलेल्या प्रयत्नांनी भविष्य बदलता येते, या विचाराचीच द्योतक आहे. याउलट, ज्यांचा दैवाच्या अपरिवर्तनीय स्वरूपावर दृढ विश्वास असतो ती माणसे दैवामुळेच आग, पूर, साथीचे रोग, दुष्काळ अथवा वैयक्तिक जीवनातील दारिद्र्यादी संकटे येतात, असे मानतात आणि त्यांचा प्रतिकार न करता निष्क्रिय राहतात. त्यांच्या मते देवालाही दैवाची आज्ञा मोडता येत नाही, तेव्हा माणसाने भविष्य बदलण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे.


हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ज्या पूर्वकर्मामुळे हा जन्म प्राप्त होतो व ज्याच्यामुळे या जन्मातील इष्ट वा अनिष्ट घटना घडतात, ते पूर्वकर्म म्हणजे दैव होय. यास कर्मवाद म्हणतात परंतु हा कर्मवाद कार्यकारणनियमावर अधिष्ठित असल्याने हिंदूंना दैववादी म्हणण्यापेक्षा कर्मवादी म्हणणे अधिक योग्य होय. आता तत्त्वज्ञानानुसार जरी हिंदू कर्मवादी असले, तरी व्यवहारात त्यांच्यामध्येही अनेक मार्गांनी दैववाद दृग्गोचर होतो. हिंदू लोक काल, विधी, अदृष्ट, कर्म इ. शब्द जवळजवळ दैव या अर्थानेच वापरतात. घडणाऱ्या घटनांच्या पाच कारणांपैकी दैव हे पाचवे कारण होय, असे गीतेत म्हटले आहे. महाभारताच्या अनुशासनपर्वात प्रयत्न हा जमिनीसारखा व दैव हे बीजासारखे मानले आहे. हिंदूंचे वैद्यकशास्त्र व कायदा यांवरही दैववादाचा प्रभाव दिसतो. काही रोग दैवाच्या प्रभावाने जडतात, असे सुश्रुतादींनी वैद्यकशास्त्रात म्हटले आहे. एखाद्याकडे दुसऱ्याने ठेवलेली ठेव, एखाद्याची दुसरीकडे पोहोचवावयाची वस्तू, गुराख्याने राखण्यासाठी आणलेली एखाद्याची गुरे इत्यादींचा जर आग, पूर, चोरी, एखाद्या अपघात इ. दैवी कारणांनी नाश झाला, तर हिंदू कायद्यानुसार वस्तूच्या मालकाला नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता नव्हती. योगवासिष्ठात मात्र दैव हा केवळ भास आहे, असे म्हटले आहे. दुबळी माणसे दैवावर विश्वास ठेवतात, दैवावर विसंबणारा माणूस पाण्यात टाकलेल्या कच्या मडक्याप्रमाणे नष्ट होतो इ. दैवविरोधी मतेही आढळतात.

बौद्धांच्या कोणत्याच पंथात मूलभूत तत्त्व म्हणून दैवाला स्थान नव्हते. बुद्धाने व्यक्तीला मोक्षासाठी प्रयत्न करावयास सांगितले आहे. त्यामुळे दैवकल्पनेला त्याच्या उपदेशात स्थान नाही परंतु कर्मवाद या अर्थाने बौद्ध आणि जैनही दैववाद मानतातच. या अर्थाने शीख हे तर कट्टर दैववादी (कर्मवादी) मानले जातात.

ग्रीकांनी मॉरॉस या नावाची देवता कल्पिलेली होती. व्यक्तीच्या जन्माच्या वेळीच तिचे भविष्य विणण्याचे काम मॉरॉस करते, अशी त्यांची धारण होती. अनेक वेळा मॉरॉस शब्द मीरी असा अनेकवचनी वापरून त्या तीन देवता असल्याचे मानले जाई. होमरच्या इलिअड आणि ओडिसी या महाकाव्यांमध्ये दैवाचा प्रभाव सर्वत्र दिसतो. ग्रीक साहित्यातील शोकांतिकांमध्ये तर दैववाद कमालीचा असून त्यांत माणूस म्हणजे दैवाच्या हातचे खेळणे, असे मानलेले दिसते. कित्येकदा तर झ्यूससारखे श्रेष्ठ देवही दैवाधीन असल्याचे मानले आहे. रोमन लोकांनी आपल्या पार्का या देवता मीरीबरोबर एकरूप मानल्या होत्या.

मुस्लिम लोक कट्टर दैववादी मानले जातात. ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थच ‘अल्लाला शरण जाणे’, असा आहे. कुराणात दैववाद आढळतोच. हे लोक किस्मत अथवा नशीबच सर्व काही नियंत्रित करते, असे मानतात. त्यांच्यात कादिरी आणि जब्री असे दोन पंथ होते. पहिल्या पंथातील लोक मानवी प्रयत्नांनी घटना नियंत्रित होतात असे मानत. दुसऱ्या पंथातील लोक मानवी प्रयत्नांना अजिबात स्थान नाही असे म्हणून देवाची इच्छाच सर्व काही असते, असे मानत. अब्द-अर्-रझाक याने हे दोन्ही पंथ एकेका डोळ्याने आंधळे असल्याचे म्हटले आहे.

सर्व अंधश्रद्धाळू लोकांप्रमाणेच केल्टिक लोकही दैववादी होते. खिस्ती धर्मात तत्त्वतः दैववाद नाही असे म्हणत असले, तरी त्याची काही चिन्हे आढळतात. ज्यू लोकांच्या हिब्रू भाषेत प्रारंभी दैव या अर्थाचा शब्दच नव्हता असे म्हणतात. पारशी धर्मातही प्रारंभी दैवाला स्थान नव्हते परंतु नंतर दैव हे पारशी धर्माचे एक महत्त्वाचे अंग बनले. बॅबिलोनियामध्ये दैवाचे स्वतंत्र देवता म्हणून मानवीकरण केलेले नव्हते. तेथील लोकांच्या मते एकदा ठरविलेले भविष्य वज्रलेप नव्हते, त्यात बदल होऊ शकत असे. तेथील आख्यायिकांत देवांचे व मानवांचे भविष्य ठरविणाऱ्या गोळ्यांची (टॅब्लेट्स ऑफ फेट्) चर्चा असून त्या ज्याच्याजवळ असतील तो सर्वांचे नियंत्रण करतो, असे मानले जाई. ईजिप्तमध्ये दैवाचे शाई या देवतेच्या रूपाने मानवीकरण केले होते. प्रारंभी ती हानिकारक देवता मानली जाई परंतु कालक्रमाने ती उपकारक व सर्परूपातील एक लोकप्रिय देवता म्हणून मानली जाऊ लागली. चिनी भाषेत दैवाला ‘मिंग’ म्हणतात. चिनी लोक अपरिवर्तनीय दैवावर विश्वास व्यक्त करतात आणि तरीही त्याच्यापासून निसटण्याची शक्यता बोलून दाखवतात. मृत्यू निश्चित आहे असे मानून शरणागतीच्या भावनेने ते देहान्ताची शिक्षा स्वीकारतात.

दैवानेच मृत्यू ठरविलेला असतो, या भावनेने सैनिक जिवावर उदार होऊन, निर्भयपणे लढतात. तसेच जीवनात घडलेल्या दुःखदायक घटना या दैवामुळे घडल्या असे मानून समाधानी राहण्याची प्रवृत्ती लोकांत दिसते परंतु दैववादी माणसे प्रयत्नांचे महत्त्व मानत नसल्यामुळे आळशी व निष्क्रिय बनतात, हा दैववादाचा एक दुष्परिणाम होय. शिवाय व्यक्तीच्या हातून घडणारी पापपुण्ये जर दैवानेच ठरविलेली असतील, तर त्यांची फळे व्यक्तीला का भोगावी लागतात, याचे उत्तर दैववाद देऊ शकत नसल्याने, तो धर्मशास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही. माणसाचे चांगले वा वाईट कृत्य दैवानेच ठरविलेले असेल, तर त्याचे वागणे नैतिक वा अनैतिक आहे असे म्हणता येत नाही. ही नीतिशास्त्रातील अडचणही दैववादामुळेच निर्माण होते.

आधुनिक काळात बुद्धिवादाचा वाढता प्रभाव, वैज्ञानिक प्रगती, कार्यकारण नियमांचे आकलन, मानवी प्रयत्नांनी जीवनातील घटना नियंत्रित करता येतात हा अनुभव इत्यादींमुळे दैववादाचा प्रभाव क्षीण होत चालला आहे.

साळुंखे, आ. ह.