देहगुहा : प्राण्यांची देहभिती आणि आहारनाल (अन्नमार्ग) यांच्यामध्ये जी जागा असते तिला देहगुहा म्हणतात. तिच्यात बहुतेक आंतरिक अंगे असतात. सगळ्याच प्राण्यांमध्ये देहगुहा असते असे नाही. उदा., जेलीफिश आणि चापट कृमी यांच्या शरीरांत ती नसते. जिला खरी देहगुहा म्हणता येईल ती भ्रूणमध्यस्तराच्या (गर्भाच्या मधल्या स्तराच्या) दोन स्तरांच्या–बाहेरचा कायिक स्तर आणि आतला आंतरांग स्तर–मध्ये उत्पन्न होते आणि तिला मध्यस्तर–उपकलेचे अस्तर असते. गोलकृमी आणि इतर काही प्राणी यांच्यात आढळणाऱ्या देहगुहेला मध्यस्तराचे अस्तर नसते म्हणून तिला आभासी देहगुहा म्हणतात. वरच्या दर्जाच्या प्राणिसमूहांचे वर्गीकरण करताना देहगुहेच्या उत्पत्तीची तऱ्हा हे एक लक्षण विचारात घेतले जाते.

ॲनेलिडा (वलयी), आर्थ्रोपोडा (संधिपाद) आणि मॉलस्का (मृदुकाय) या प्राण्यांमध्ये देहगुहा असते आणि ती भरीव मध्यस्तरपट्टांपासून उत्पन्न होते.

ॲनेलिडा : ॲनेलिडांच्या ट्रोकोफोर डिंभाच्या (स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेच्या) शरीरात एका ध्रुवकोशिकेच्या (पेशीच्या) प्रगुणनाने मध्यस्तराचे दोन पट्ट तयार होतात व ते अधर (खालच्या) मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना एकेक याप्रमाणे असतात. या पट्टांचे आडवे तुकडे पडून त्यांचे भरीव द्विपार्श्विक (एकाच प्रतलाने दोन एकसारखे भाग होणारे) ठोकळे अथवा खंड बनतात. नंतर प्रत्येक खंडाला आतून फट पडते व ती मोठी होऊन एक पोकळ आशयक (पिशवीसारखी रचना) तयार होतो यांची पोकळी हीच देहगुहा होय. दोन्ही बाजूंचे आशयक इतके फैलावतात की, आंत्राच्या (आतड्याच्या) खाली आणि वर त्यांची पृष्ठे जवळजवळ एकमेकांना चिकटतात व अशा तऱ्हेने आंत्राला आधार देणारे आंत्रबंध तयार होतात. खंडांच्या मधील एकमेकांना स्पर्श करणाऱ्या अग्रपश्च (पुढच्या मागच्या) पृष्ठांचे शरीराच्या खंडांच्या मध्ये असणारे पडदे बनतात.

आर्थ्रोपोडा : आर्थ्रोपोडामध्ये भ्रूणमध्यस्तरपट्टांच्या जोड्या एका पश्च (मागच्या) वृद्धि–केंद्रापासून प्रगुणनाने अधर पृष्ठावर तयार होतात. या पट्टांच्या विभाजनाने खंडांची एक रेखीय (ओळीत असणारी) श्रेणी तयार होते. या खंडांत नंतर पोकळ्या उत्पन्न होतात आणि त्या देहगुहेच्या निदर्शक असतात. प्रौढ आर्थ्रोपोड प्राण्यांत देहगुहा खंडयुक्त उत्सर्जक (शरीरक्रियेत निरुपयोगी असणारी द्रव्ये बाहेर टाकणारी) अंगे अथवा ग्रंथी, जनन ग्रंथी आणि युग्मकवाहिन्या (जनन ग्रंथींपासून जनन द्रव्ये बाहेर वाहून नेणाऱ्या वाहिन्या) यांच्या आतील गुहिकांच्या स्वरूपातच केवळ टिकून राहते.

मॉलस्का : मॉलस्कांमध्येही एकाच ध्रुवकोशिकेच्या प्रगुणनाने मध्यस्तराचे पट्ट तयार होतात परंतु त्यांचे खंड पडत नाहीत. उजव्या व डाव्या बाजूंना प्रत्येक पट्टाच्या आत फट पडून एक पोकळी अथवा देहगुहाकोश (पिशवी) तयार होतो परंतु या गुहिका लवकरच लहान होतात आणि भोवतालच्या मध्यस्तरीय कोशिका अलग होऊन पांगतात यांपैकी पुष्कळ कोशिकांचे स्नायू बनतात. परिहृद (हृदयाच्या भोवतालची) गुहा आणि जनन ग्रंथी व त्यांच्या वाहिन्या यांतील गुहा हेच काय ते देहगुहेचे अवशेष प्रौढ प्राण्यांमध्ये आढळतात.

एकायनोडर्माटा : एकायनोडर्म प्राण्यांमध्ये आद्य पचनगुहेपासून अथवा आद्यांत्रापासून द्विपार्श्व पिशव्यांची एक जोडी बाहेर येते आणि नंतर ती त्याच्यापासून अलग होते. प्रत्येक पिशवीचे अथवा कोष्ठाचे संकोचनाने तीन भाग पडतात. या तीन भागांतील गुहिका अथवा पोकळ्या देहगुहा होत. यांपैकी डाव्या बाजूची मधली देहगुहा विशेष महत्त्वाची असते कारण तिच्यापासून प्रौढ प्राण्याचे जलवाहिका तंत्र (ज्या वाहिन्यांमधून पाण्यासारख्या द्रव पदार्थाचे सर्व शरीरात अभिसरण होते त्या वाहिन्यांचे तंत्र किंवा संस्था) व अरांचे (त्रिज्यीय भागांचे) आद्यक (मूळ रूपे) उत्पन्न होतात. अश्मनाल (मॅड्रेपोराइटापासून निघून जवळजवळ मुखाच्या काठापर्यंत गेलेला S च्या आकाराचा नाल) आणि अक्षीय कोटर यांच्या डाव्या अग्र देहगुहेचा वाटा असतो. अगदी मागच्या पोकळ्यांच्या रूपांतराने प्रौढाची मुख्य परिआंतरांग (शरीरांच्या आतल्या इंद्रियांभोवती असणारी) देहगुहा तयार होते.

पृष्ठवंशी प्राणी : पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये युग्मनजाच्या (फलन झालेल्या अंड्याच्या) पृष्ठीय कोशिका ब्लास्टोपोरमधून (भ्रूणाची द्विस्तरीय अवस्था बाह्य भागाशी ज्या छिद्राच्या द्वारे संबंध ठेवते त्या छिद्रामधून) आत जाऊन त्यांच्यापासून एक भरीव स्तर तयार होतो, हा मध्यस्तर होय. पृष्ठरज्जूच्या (फुगलेल्या व रिक्तिकायुक्त कोशिकांपासून बनलेल्या आणि आद्यांत्राच्या मध्यपृष्ठरेषेवरील अंतःस्तरापासून उत्पन्न झालेल्या कंकालीय दंडाच्या) पार्श्व बाजूला आणि साधारणपणे कानाच्या पातळीत विभाजनाला सुरुवात होऊन मध्यस्तराचे तीन विभाग पडतात. (१) खंड, (२) वृक्कखंडक-रज्जू, हिच्यापासून उत्सर्जनांगे व त्यांच्या वाहिन्या उत्पन्न होतात आणि (३) अखंड पार्श्व पट्ट. पार्श्व पट्टला आत फट पडल्यामुळे त्याच्यात जी पोकळी उत्पन्न होते ती देहगुहा होय. खालच्या दर्जाच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ही फट वाढत जाऊन वृक्कखंडकातून (ज्याच्या वाढीने भ्रूणीय उत्सर्जनांग तयार होते त्या खंडाच्या भागातून) पुढे खंडाच्या मध्यापर्यंत पोहोचते पण असे उत्तरपृष्ठीय विस्तार लवकरच नाहीसे होतात. पार्श्व पट्ट वाढून दुसऱ्या बाजूच्या आपल्या जोडीदाराला मिळतो आणि अशा तऱ्हेने देहगुहा व आंत्राचे आंत्रबंध तयार होतात.

जोशी, मीनाक्षी