देसाई, रमणलाल वसंतलाल : (१२ मे १८९२–२० सप्टेंबर १९५४). प्रख्यात गुजराती कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संशोधक. जन्म बडोदा जिल्ह्यातील सिनोर येथे. शिक्षण मुंबई विद्यापीठात. हृदयनाथ (तिसरी आवृ. १९३८), जयंत (तिसरी आवृ. १९३५), ग्रामलक्ष्मी (४ खंड, १९३४–४४), दिव्यचक्षु (चौथी आवृ. १९४७), कोकिला (दुसरी आवृ. १९३३), शिरीष (तिसरी आवृ. १९३६), भारेलो अग्नि (दुसरी आवृ. १९३७), झंझावात (२ खंड, १९४८–४९), प्रलय (दुसरी आवृ. १९५३) इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. सामाजिक कादंबरीकार म्हणून ते अतिशय लोकप्रिय होते. म. गांधींच्या राजकीय आणि सांस्कृतिक आंदोलनाखाली बदलत असलेल्या समाजाचे व जीवनमूल्यांचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या ह्या कादंबऱ्यांतून असहकार, सत्याग्रह, अस्पृश्यतानिवारण, ग्रामसेवा, पतितोद्धार इ. विषय आढळतात. स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांच्या कादंबऱ्यांमधून सत्तालोभ, काळाबाजार, दंभ, चोरी, अधर्म, अनीती आदी सामाजिक दोषांचे यथार्थ विश्लेषण त्यांनी केले. विज्ञानप्रगती आणि तीमधून संभवणारे मानवविनाशाचे भवितव्य सुचविणारी व स्थळकाळाच्या विस्तृत पटावर पसरलेली त्यांची प्रलय ही कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून सात्त्विक मनोरंजनाबरोबरच उदात्त मानवतामूल्याचेही दर्शन घडते. तथापि जीवनमूल्यांचे विश्लेषण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे कथाप्रवाहास बाध येऊन कादंबरीरचनेत शैथिल्य येते. त्यांच्या रसगर्भ, मनोहर शैलीमुळे मात्र हा दोषही काहीसा झाकला जातो. कादंबऱ्यांव्यतिरिक्त संयुक्ता (१९२०),शंकित हृदय (१९२५) व अंजनी (१९३८) ही नाटके परी अने राजकुमार (१९३८), तप अने रूप (१९५०) आदी एकांकिकासंग्रह झांकळ (दुसरी आवृ. १९३६) व कांचन अने गेरूं (१९५०) हे लघुकथासंग्रह निहारिका (१९३५) हा काव्यसंग्रह अप्सरा (५ भाग, १९४९) हा वेश्याजीवनावरचा अभ्यासपूर्ण प्रबंध जीवन अने साहित्य (२ खंड, १९३६, ३८), ऊर्मी अने विचार (१९४६), साहित्य अने चिंतन (१९५१) हे समीक्षाग्रंथ रशिया अने मानवशांती हे प्रवासवर्णन गई काल (१९५०) हे आत्मवृत्त असे विविध प्रकारचे लिखाण त्यांनी केले आहे. तथापि कादंबरीकार म्हणूनच ते विशेष प्रसिद्ध असून एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्यांना गुजराती साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. 

पेंडसे, सु. न.