देवुलपल्ली वेंकटकृष्णशास्त्री: (१ नोव्हेंबर १८९७ – ). तेलुगू भावकवितेचे जनक. देवुलपल्ली वेंकटकृष्णशास्त्री यांचा जन्म पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापुरम् येथे झाला. त्यांचे वडील तेलुगू आणि संस्कृत पंडित होते. घरी नेहमी विद्वान आणि साहित्यिक यांची ये–जा असल्यामुळे वेंकटकृष्णशास्त्री यांच्या प्रतिभेला वयाच्या नवव्या वर्षीच अंकुर फुटले.

ब्राह्मसमाजी विद्वान प्राचार्य रघुपती वेंकटरत्नम् नायडू यांच्या देखरेखीखाली त्यांचे साकिनाडा येथे शिक्षण झाले. इंग्रजी, फ्रेंच आणि सूफी साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अध्यापक म्हणून तसेच चित्रपट व्यवसाय आणि आकाशवाणी यांत त्यांनी नोकरी केली तथापि त्यांचा पिंड कवीचाच होता. साहित्यशिवाय समाजसुधारणा हेही त्यांचे आवडते क्षेत्र होते.

कृष्णपक्षमु (१९२५), ऊर्वशी (१९२९), प्रवासमु कन्नीरु (१९२२), महती (१९४९), आकलि, कार्तिकी  इ. त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. याशिवाय त्यांनी चित्रपटासाठी अनेक गीते लिहिली आणि आकाशवाणीसाठी काही संगीतिकाही लिहिल्या.

देवुलपल्लि वेंकटकृष्णशास्त्री

प्रारंभीची त्यांची कविता निसर्गवर्णनपर आहे पण नंतरची त्यांची कविता भावपर आणि आत्मनिष्ठ आहे. वैयक्तिक सुखदुःखे, आशाआकांक्षा, प्रणय आणि विरह यांचा उत्कृष्ट आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतो. शेवटी वेदना ही त्यांनी स्वतःची सहचरी मानली. यातूनच ते ईशशरण झाले. स्वतःचा व पहिल्या पत्नीचा आजार, तिचा मृत्यू, विरहयातना आणि त्यांतून उदभवलेली मुक्त बेदरकार वृत्ती या सर्वांची स्पष्ट छाया त्यांच्या काव्यात दिसून येते. त्यांच्या भावपर कवितांनी प्रथम बरीच खळबळ उडविली पण नंतर त्यांमुळेच ‘आंध्रशेली’ हे त्यांना सार्थ अभिधान प्राप्त झाले. मृदुतरल व केवळ आवश्यक तितक्याच शब्दांची योजना हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य होय. कोणत्याही प्रसंगाचे किंवा व्यक्तिचे शब्दचित्र ते यथार्थतेने रेखाटतात. तेलुगू काव्यात प्रतिकात्मक रचना त्यांनीच यशस्वीपणे हाताळून तिला सर्वमान्यता मिळवून दिली. कलमानानुरूप प्रगतिशील विचारांचा स्वीकारही त्यांनी केला. तेलुगूत स्वच्छंदतावादी परंपरेतील भावकविता लिहिण्याची सुरुवात रायप्रोलू सुब्बराव यांनी केली असली, तरी तिचा परमोत्कर्ष वेंकटकृष्णशास्त्री यांच्याच रचनेत दिसतो. ह्या कवितेस मार्दव, प्रगल्भता, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता प्राप्त करून देण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. त्यांच्या कवितेसारखी कोमलकांतपदावली तेलुगूत क्वचितच आढळते. ते नमोनाट्यलेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. शर्मिष्ठा, विद्यापति, धनुर्दास, दक्षयज्ञ, गुहा, जमदग्नि  इ. त्यांच्या संगीतिका फारच गाजल्या.

नव्यसाहित्य परिषदेचे १९४२ मध्ये ते अध्यक्ष होते. १९४७ मध्ये ‘आंध्र अभ्युदय रचयितुल संघा’ च्या (प्रगतिशील लेखक संघाच्या) तृतीय अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तेलुगू काव्यात त्यांना मानाचे स्थान आहे.

टिळक, व्यं. द.