देवार (ड्यूअर), जेम्स : (२० सप्टेंबर १८४२–२७ मार्च १९२३). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकीविज्ञ. नीच तापमानाविषयी त्यांनी विशेष संशोधन कार्य केले. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील किनकार्डिन–ऑन–फोर्थ येथे झाला. एडिंबरो विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर ते रॉयल व्हेटरनरी कॉलेजात रसायनशास्त्राचे व्याख्याते (१८६९) आणि हायलँड अँड ॲग्रिकल्चरल सोसायटीमध्ये साहाय्यक रसायनशास्त्रज्ञ (१८७३) होते. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक (१८७५) व लंडन येथील रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१८७७) म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्यांनी या दोन्ही पदांवर मृत्यूपावेतो काम केले.
त्यांचे सुरुवातीचे कार्य क्लोरोसल्फ्यूरिक अम्ल, पिकोलिनाच्या ऑक्सिडीकरणामुळे [→ ऑक्सिडीभवन] तयार होणारे पदार्थ, विद्युत् ठिणग्या व सूर्याचे तापमान यांसंबंधी होते. १८६७ मध्ये त्यांनी बेंझिनाची संरचना सूत्रे (रेणूमधील अणूंचे प्रकार व त्यांची मांडणी दर्शविणारी सूत्रे) मांडली. सु. २५ वर्षे त्यांनी वर्णपटविज्ञानासंबंधी संशोधन केले. विशिष्ट उष्णतेसंबंधी (१ ग्रॅम पदार्थाचे तापमान १° से. वाढविण्यासाठी त्याला द्याव्या लागणाऱ्या उष्णतेसंबंधी) संशोधन करताना कॅलरीमापकाचे (उष्णतामापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पात्राचे) उष्णता निरोधन करण्यासाठी त्यांनी एक पात्र (ड्यूअर फ्लास्क) तयार केले. याच पात्रावरुन पुढे आजचा व्यवहारातील ‘थर्मास फ्लास्क’ तयार करण्यात आलेला आहे [→ थर्मास]. त्यानंतर त्यांनी नीच तापमानासंबंधी संशोधन करून १८९१ साली द्रवीभूत ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात यश मिळविले. १८९८ मध्ये त्यांनी प्रथमच हायड्रोजनाचे द्रवीकरण केले व १८९९ मध्ये त्याचे घनीभवनही केले. त्याच वर्षी त्यांनी एफ्. ए. आबेल यांच्या समवेत कॉर्डाइट या बिनधुराच्या स्फोटक द्रव्याचा शोध लावला. थंड केलेल्या लोणारी कोळशाच्या साहाय्याने उच्च निर्वातावस्था निर्माण करता येते हा १९०५ मध्ये त्यांनी लावलेला शोध पुढे आणवीय भौतिकीत फार उपयुक्त ठरला.
त्यांना १९०४ मध्ये ‘नाईट’ हा किताब देण्यात आला. रॉयल सोसायटीने १८९४ साली त्यांची सदस्य म्हणून निवड करून त्यांना रम्फर्ड पदकाचा बहुमान दिला. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचेही ते सदस्य होते. ते लंडन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.