देवुडु नरसिंहशास्त्री : (२७ डिसेंबर १८९६–२४ ऑक्टोबर १९६२). प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार, कथाकार, बालवाङ्मयकार आणि संस्कृत पंडित. जन्म म्हैसूर येथे. राजपंडितांच्या घराण्यात जन्मलेल्या नरसिंहशास्त्रींनी संस्कृतचा सखोल अभ्यास केला. त्यातल्यात्यात वेदान्त, मीमांसा, उपनिषदे यांत ते विशेष पारंगत झाले. नंतरच्या काळात पूर्वमीमांसेवर मीमांसादर्पण (१९३८) नावाचा एक कन्नड ग्रंथही त्यांनी रचला.
नाटक, चित्रपट, संगीत यांकडे त्यांचा कल होता. याचा परिणाम म्हणजे त्यांनी काही काळ रंगभूमि नावाचे मासिक चालवले. मार्केंडेय या चित्रपटात त्यांनी कामही केले आहे.
लहान मुलांसाठी नम्म पुस्तक नावाचे मासिक त्यांनी बरीच वर्षे चालविले. कुमार कालिदास, रामायण संग्रह (१९५१), संग्रह भारत, बुद्धिय कथगळु (२ भाग, ३ री आवृ. १९२७, ३२), पंचतंत्रातील कथा, कथा सरित्सागर इ. लहान मुलांना आवडतील असे ग्रंथ त्यांनी लिहिले.
अंतरंग (१९३१), मयूर (१९३२), वडेद मुत्तु (१९५०), महाब्राह्मण (१९५१), महाक्षत्रिय, महादर्शन, मल्ली (१९५२), एरंडनेय जन्म (१९५३), डॉ. वीणा (१९५६) इ. कादंबऱ्यांही त्यांनी लिहिल्या. महाब्राह्मण, महाक्षत्रिय व महादर्शन या त्यांच्या मौलिक कादंबऱ्या आहेत. महाब्राह्मणमध्ये विश्वामित्राची कथा, महाक्षत्रियमध्ये नहुषाची कथा व महादर्शनमध्ये याज्ञवल्क्याची कथा त्यांनी रंगविली आहे. १९३६ मध्ये त्यांची अंतरंग ही कादंबरी मद्रास विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून लागली. त्यांची मयूर ही कादंबरी फार गाजली. १९३३ साली त्यांनी म्हैसूर विद्यापीठात ‘कर्नाटक संस्कृतिदर्शन’ या विषयावर जी व्याख्याने दिली ती ग्रंथरूपाने उपलब्ध आहेत.
कळ्ळर कुट (१९२६), सोलाऽ गेलुवोऽ (१९३५), देशांतरद कथेगळु (१९४१), मुंदेनु (१९५३) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. योगवासिष्ठावरही यांनी एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. विवेकानंदांची भाषणे (दिव्यवाणी–१९३८) व जॉन मेसफील्डलिखित द ट्रायल ऑफ जीझस यांचा त्यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला आहे. त्यांनी तेलुगू भाषेचाही उत्तम अभ्यास केलेला होता.
प्राचीन साहित्य व वेदान्त यांच्या सखोल अभ्यासामुळे त्यांची जीवनदृष्टी सुसंस्कृत व अभिजात झालेली होती. त्यामुळे त्यांनी रेखाटलेल्या सर्व पात्रांत पांडित्य व संस्कारसंपन्नता आढळते, असे कीर्तिनाथ कुर्तकोटींनी त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. इंग्रजी व संस्कृत या भाषांवर देवुडूंचे प्रभुत्व होते. संज्ञाप्रवाह–तंत्राचा अवलंब त्यांनी आपल्या अंतरंग या कादंबरीत केला. ते उत्तम वक्ते व कुशल संवादपटू म्हणून प्रख्यात होते. ते निधन पावल्यानंतर, त्याच वर्षी (१९६२) त्यांच्या महाक्षत्रिय कादंबरीस साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला.
बेंद्रे, वा. द.
“