देविंदर सत्यार्थी : (२८ मे १९०८– ). पंजाबीतील एक अष्टपैलू लेखक व पत्रकार. त्यांचा जन्म संग्रूर जिल्ह्यातील भादोर या गावी झाला. लहानपणापासूनच त्यांना लोकगीतांचे वेड होते. १९२७ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सोडून देऊन ते लोकगीतांच्या शोधार्थ भारतभर भटकले आणि त्यांनी अनेक लोकगीते संकलित केली. १९४७ नंतर ते दिल्लीत स्थायिक झाले आणि भारत सरकारच्या आजकल ह्या नियतकालिकाचे संपादन करू लागले. केवळ पंजाबीतच नव्हे, तर हिंदी, उर्दू व इंग्रजी भाषांत त्याचप्रमाणे काव्य, कथा, कादंबरी, लोकगीते, निबंध, आत्मचरित्र इ. प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे.
त्यांची उल्लेखनीय साहित्यनिर्मिती पुढीलप्रमाणे : पंजाबी : काव्य : गिद्धा (लोकगीते–९३६), दीवा बले सारी रात (लोकगीते – १९३९), धर्ती दीआँ वाजाँ (१९४१), मुडका ते कनक (१९५०), बुड्ढी नहीं धर्ती (१९५३) कथा : कुंगपोश (१९४१), सोना गाची, (१९५०), देवता डिग पिआ (१९५२) कादंबरी : घोडा बादशाह. हिंदी : धर्ती गाती है (निबंध–१९४८), बाजत आवे ढोल (लोकगीते–१९५२), चांद सूरज के बिरन (आत्मचरित्र–१९५३), ब्रह्मपुत्रा (कादंबरी–१९५६), दुधगछ (कादंबरी–१९५८). उर्दू : गाये जा हिंदुस्तान (लोकगीते–१९४६). इंग्रजी : मीट माय पीपल (लोकगीते–१९४६).
के. जगजीत सिंह (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)