देउश, झ्युआंउ द : (८ मार्च १८३०–११ जानेवारी १८९६). श्रेष्ठ पोर्तुगीज भावकवी. मेस्सीनिश, आल्गार्व्ही येथे जन्मला. कोईंब्रा विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी घेतली (१८५९). फ्लोरिश दू कांपु (१८६८, इं. शी. वाइल्ड फ्लॉवर्स) हा त्याचा पहिला कवितासंग्रह. ‘अ व्हीदा’ (इं. अर्थ लाइफ) ही त्याची उत्कृष्ट विलापिका त्यात अंतर्भूत होती. त्याच्या समग्र कवितांचे संकलन कांपु द फ्लोरिश (१८९६, इं. शी. फील्ड ऑफ फ्लॉवर्स) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. प्रेमकवी म्हणून देउश प्रसिद्ध होता. प्रेमभावनेचा उत्स्फूर्त आणि सरळ आविष्कार हे त्याच्या कवितेचे एक वैशिष्ट्य. देउश हा पोर्तुगीज साहित्यातील स्वच्छंदतावादी काव्यसंप्रदायातील अखेरचा महत्त्वपूर्ण कवी होय तथापि त्याच्या कवितेत स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये सौम्यसंयत स्वरूपात प्रकट झालेली आहेत. काव्यभाषा अधिक बोलकी करण्याचा प्रयत्न त्याने केला. ‘देउशच्या कविता ताज्या, टवटवीत फुलांसारख्या आहेत हजारो वर्षे लोटली, तरी त्यांची एक पाकळीही ढळणार नाही’ अशा आशयाचे प्रशंसोद्गार झ्युंकैरू ह्या पोर्तुगीज कवीने काढले आहेत. १८९५ मध्ये देउशचा त्याच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून गौरव करण्यात आला.
आणखी एका संदर्भात देउशने उल्लेखनीय कामगिरी केली. शालेय विद्यार्थ्यांना वाचन शिकविण्यासाठी उपयुक्त असे अ कार्तील्या मातॅर्नांल (१८७६, इं. शी. मॅटर्नल प्रायमर) त्याने लिहिले. त्यात वापरलेले नवे उपयुक्त अध्यापनतंत्र राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले गेले (१८८८). लिस्बन येथे तो निधन पावला.
रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)