दुर्गादास : (२३ नोव्हेंबर १९००–१७ मे १९७४). ख्यातनाम भारतीय पत्रकार. जन्म पंजाबातील एका खेड्यात. वडिलांचे नाव ईश्वरदास व आईचे उत्तमदेवी. माध्यमिक शिक्षण जलंदर येथे व महाविद्यालयीन शिक्षण लाहोरच्या अँग्लो–वैदिक महाविद्यालयात झाले. पुढे १९१८ ते १९३७ या काळात त्यांनी असोसिएटेड प्रेस ऑफ इंडियामध्ये वार्ताहर व सांसदीय प्रतिनिधी म्हणून काम केले, त्यानंतर लखनौ येथे कलकत्त्याच्या स्टेट्समनचे पहिले भारतीस खास प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. व १९४४ साली दिल्लीच्या द हिंदुस्थान टाइम्सचे सहसंपादक म्हणून ते दाखल झाले. पुढे १९५७ पासून १९५९ पर्यंत ते त्याचे प्रमुख संपादक होते. १९५९ साली त्यांनी भारतीय वृत्त व वृत्तलेख संस्था (इंडियन न्यूज अँड फीचर अलायन्स–‘इन्फा’) स्थापन केली. या संस्थेशी ते आमरण निगडित हाते. १९५९–६० साली अखिल भारतीय वृत्तपत्रसंपादक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. दिल्लीच्या प्रेस क्लब ऑफ इंडियाचे ते १९५९ ते १९६२ पर्यंत अध्यक्ष होते. प्रेस कौन्सिलचेही ते ७ वर्षे सभासद होते.
मध्यपूर्व आणि यूरोपच्या युद्ध–आघाडीवर युद्ध–वार्ताहर म्हणून जाण्याची संधीही त्यांना लाभली हाती (१९४५). त्या वेळी भारतीय पलटणीच्या दुःस्थितीबद्दल लिहिलेले त्यांच्या लिखाणामुळे बरीच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी इंग्लंड–यूरोपचा पहिला दौरा १९३१ मध्ये केला, त्या वेळी ब्रिटिश मजूर नेते ॲटलीच्या सल्ल्याने त्यांनी स्पेक्टेटर व न्यूज क्रॉनिकल या प्रतिष्ठित ब्रिटिश वृत्तपत्रांतून भारतीय स्वातंत्र्यासंबंधी लेख लिहिले तर १९४५ साली त्यांनी इंग्लंडातील डेली हेरॉल्डमधून लेख लिहून भारतीय नेत्यांच्या भावना ब्रिटिश राज्यकर्त्यांना नीटपणे समजावून दिल्या. १९५७, १९५९ व १९६७ असा त्यांनी तीन वेळा सबंध जगाचा दौरा करून प्रमुख राष्ट्रांतील नेत्यांच्या भेटी घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली.
जगापुढे स्वतंत्र भारताचे वास्तव व ठसठशीत चित्र उभे राहावे म्हणून जगभर प्रेस ऑफिसर्सच्या स्वरूपात प्रतिनिधी नेमण्याची एक योजना त्यांनी पं. नेहरूंना आपला दुसरा जागतिक दौरा आटोपून आल्यावर सुचविली होती, ती. पं. नेहरूंनी मान्यही केली होती. ते १९५० मध्ये ओटावा येथे सातव्या इंपीरिअल प्रेस कॉन्फरन्सला भारतातर्फे उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी परिषदेच्या नावातील ‘इंपीरिअल’ शब्द काढून टाकून त्याऐवजी ‘कॉमनवेल्थ’ शब्द घालण्याचा ठराव मांडून तो संमत करून घेतला होता. ‘इन्फा’ संस्थेतर्फे लहान व प्रादेशिक वृत्तपत्रांच्या गरजा भागवून त्यांचा विकास घडवून आणण्याचे त्यांचे कार्य भरीव स्वरूपाचे आहे. त्यांनी या संस्थेमातर्फे भारतीय वृत्तव्यवसायाचा संदर्भग्रंथ म्हणून एक वार्षिक ग्रंथ प्रकाशित करण्याची प्रथा सुरू केली. शिवाय रामराज्य इन ॲक्शन (१९४७), इंडिया अँड द वर्ल्ड (१९५८), हे त्यांचे वैचारिक ग्रंथ व इंडिया फ्रॉम कर्झन टू नेहरू अँड आफ्टर (१९६९) हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. हे आत्मचरित्र म्हणजे भारतातील स्वातंत्र्यचळवळीचा व पत्रकारितेचा विसाव्या शतकातील इतिहास म्हणता येईल. सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराचे दहा खंडही त्यांनी संपादित केले. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
दुर्गादासांनी उत्कृष्ट पत्रकारितेसाठी एक पारितोषिक १९७३ पासून सुरू केले व त्याला स्वतःचे व पत्नीचे असे ‘दुर्गारतन’ हे संयुक्त नाव दिले. यातही त्यांनी स्वतःच्या मिळकतीचा आणि पत्नीने दिलेल्या देणगीचा मिळून एकूण एक लाखाचा निधी एकत्र जमविला व त्याच्या व्याजातून पाच पारितोषिके ठेवली. हे पारितोषिक अमेरिकेतील ‘पुलिट्झर प्राईज’ च्या धर्तीवर असून ते भारतीय वृत्तपत्र–व्यवसायात मानाचे चिन्ह मानण्यात येते. पत्रकारितेमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी या विश्वस्त निधीतून ही पारितोषिके देण्यात येतात. प्रत्येक पारितोषिक हे रोख एक हजार रुपये व सुवर्णपदक आणि गौरवपत्र अशा स्वरूपाचे असते.
पवार, सुधाकर
“