दुधळ : (उंदराचा कान, बाथर, बथूर हिं. वरन, कानफूल सं. दुग्धफेनी इं. डँडेलिऑन लॅ. टॅरॅक्सॅकम ऑफिसिनेल कुल–कंपॉझिटी). या लहान बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) व चिकाळ ⇨ ओषधिच्या वंशातील सर्व जाती पूर्व गोलार्धातील थंड आणि समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात. त्या एकूण सु. एक हजार जाती (जे. सी. विलिस यांच्या मते साठ) आहेत. त्यांपैकी सु. पंचवीस भारतात आहेत. तथापि त्यांच्या संरचनेत बरीच विभिन्नता आढळल्याने जातींच्या संख्येबद्दल मतभेद आहे. त्या सर्व क्षोडहीन (बिनखोडाच्या) दिसतात कारण खोड फार ऱ्हसितावस्थेत (ऱ्हास पावलेले) असल्यामुळे जाडजूड मुळाच्या माथ्यावर (गाजर व मुळा यांप्रमाणे) नाममात्रच असते आणि त्यापासून मूलज (मूळातून आल्यासारखा) पानांचा एक गुच्छ जमिनीतून वर येतो. दुधळ ही जाती सर्वत्र तणाप्रमाणे सामान्यपणे आढळते. भारतात समशीतोष्ण हिमालय, तिबेट व निलगिरी इ. प्रदेशांत सापडते. पाश्चात्य देशांत किरकोळ भाजी म्हणून आणि मुळांपासून औषध बनविण्याकरिता लागवडीत आहे. भारतात लागवडीचे प्रयत्न झाले आहेत. देशी मुळे लहान पण अधिक परिणामकारक असतात. औषधाकरिता लागणारी बरीच मुळे आयात करतात. मूळ जाडजूड (५–३० X ०·५–१·२ सेंमी.) व बहुवर्षायू असते. त्यावर आखूड पण ऱ्हसित (वाढ खुंटलेला) संयुतपद (अनेक नवीन उपाक्षांचे बनलेले) खोड असते. दरवर्षी एका नवीन कळीपासून पर्णयुक्त प्ररोह (कोंब) बनतो. मूळ वाढत असताना आकुंचन पावत असल्याने खोडाचा भाग जमिनीत ओढला जातो. त्यामुळे मुळाच्या माथ्यावर सुरकुत्यांची वले दिसतात. सर्व पाने बिनदेठाची आणि विविध आकारांची साधी तथापि अल्पखंडित (कमी विभागलेली), पिच्छाकृती (पिसासारखी) व दातेरी (पश्चदंती–दाते मागे वळलेली) असतात ‘डँडेलिऑल’ हे नाव पानावरील दातांशी सिंहाच्या दातांची तुलना करून दिले आहे. पानाच्या गुच्छातून सरळ व वाढणाऱ्या पोकळ व बरीक (५–२० सेंमी. लांब) दांड्यावर पाने नसून फक्त एक (३–५ सेंमी. व्यासाचा) फुलोरा (स्तबक) येतो अनेक दांडे वर्षभर येतात. स्तबकातील सर्वच पुष्पके द्विलिंगी, जिव्हिकाकृती (लहान जिभेसारखी) आणि पिवळी असून ती सूर्यप्रकाशात उमलतात. छदमंडलातील बाहेरची छदे लांब व खाली वळलेली आणि आतील छदे सरळ व अरुंद असतात. पिच्छसंदले (पाकळ्यांखालचा पिसासारखा भाग) पांढरी व नरम आणि पुष्पमुकुट जिव्हिकाकृती असतो [→ फूल]. स्वपरागण घडून येते व दोन्हीकडे निमुळते असलेले संकृत्स्न फळ (शुष्क, एकबीजी व न तडकणारे फळ) फार लहान, फिक्कट पिवळे व कंगोरेदार असते ⇨ कंपॉझिटी कुलात (सूर्यफूल कुलात) वर्णिलेल्याप्रमाणे इतर शारीरिक लक्षणे असतात.
या वनस्पतीच्या सुधारलेल्या काही जातींच्या कच्च्या पानांचा भाजीप्रमाणे उपयोग करतात आणि पाने रेशमाच किड्यांना खाऊ घालतात. मुळे दळून आणि भाजून कॉफीऐवजी किंवा कॉफीत मिसळून वापरतात. दुधळाची ताजी व सुकी मुळे आणि खोड औषधी असतात. मूळ बाहेरून उदी व आत पांढरे असून त्यातील चीक कडू असतो तो सुकल्यावर उदी दिसतो. चिकात कडू व अस्फटिकी टॅरॅक्सिन आणि स्फटिकी टॅरॅक्सॅसेरीन, इन्युलीन व बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असते. मुळे स्वेदकारी (घाम आणणारी), पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व सौम्य विरेचक (पोट साफ करणारी) असतात. यकृताच्या जुनाट तक्रारीवर ती विशेष गुणकारी असतात. अग्निमाद्य (भूक कमी होणे), कावीळ जलसंचय, जुनाट चर्मविकार इत्यादींवर देतात. मुळांचे चूर्ण (०·६५–०·९८ ग्रॅ.) यकृताला उद्दीपित करते व पित्तस्राव चांगला होतो.
रशियन डँडेलिऑन : (कोक–साधीझ लॅ. टॅ. कोक–साधीझ). याचा शोध १९३१ च्या सुमारास कझाकस्तानातील टाएनशान येथे लागला. याचे मूळ १·२ सेंमी. व्यासाचे असून त्यातील चिकाळ नलिकांत रबर आढळते म्हणून रशियात रबराच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर या झाडांची लागवड करण्यात येते. अर्जेंटिनातही त्याची लागवड होते.
परांडेकर, शं. आ.
“