दुधना नदी : मराठवाड्यातून वाहणाऱ्या पूर्णेची प्रमुख उपनदी. लांबी सु. १७७ किमी. पैकी ९६ किमी. औरंगाबाद जिल्ह्यातून तर बाकीचा प्रवाह परभणी जिल्ह्यातून वाहतो. औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्दाबाद–म्हैसमाळ–सारोळा या अर्धवर्तुळाकार डोंगरागांमध्ये उगम पावून पूर्वेकडे परभणी जिल्ह्यात वाहत जाते आणि परभणी शहराच्या ईशान्येस सु. १५ किमी. वर पूर्णा नदीला मिळते. उगमापासून ६० किमी.च्या पुढील नदीचे पात्र रुंद होत जाते आणि ती बारमाही वाहते. दुधनेच्या उत्तरेकडील जिंतूर डोंगररांगांमुळे पूर्णेचे पाणलोट क्षेत्र अलग झाले आहे. ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्ये (तूर, मूग, उडीद, वाटाणा, हरभरा), भुईमूग, कापूस ही या नदीखोऱ्यातील मुख्य पिके होत. जालना, रांजणी, परतुर, सैलू, मानवथ, परभणी ही या नदीखोऱ्यातील शहरे व बाजारपेठा आहेत. नदीवर काही मध्यम प्रतीचे पाटबंधारे बांधलेले आहेत.
पाठक, सु. पुं. चौधरी, वसंत