दीपमाळ–१ : एक महाराष्ट्रीय शिल्पप्रकार. देवाच्या मूर्तीसमोर दिवा तेवत ठेवण्याची प्रथा अत्यंत प्राचीन आहे. त्यासाठी मंदिराला दिलेल्या दानांची नोंद शिलालेखांत व ताम्रपटात पहावयास मिळते. उत्सव प्रसंगी शहरात दीपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायणासारख्या ग्रंथात आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दीपलक्ष्मी व दिव्यांची झाडे असतात, तसेच देवालयांसमोर दीपदंड किंवा दीपस्तंभही असतात. पण दीपमाळ हे महाराष्ट्रीय मंदिरशिल्पाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. विटांचा वा दगडांचा वर निमुळता होत जाणारा स्तंभ उभारून त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. त्या हातांवर व स्तंभाच्या माथ्यावर पणत्या ठेवण्यात येतात. उत्सवप्रसंगी, दिवाळीच्या वेळी, त्रिपुरी पौर्णिमेला या माळा उजळण्यात येतात. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रूढ होती. विशेषतः जेजुरीला खंडोबाच्या मंदिराच्या टेकडीवर शेकडो दीपमाळा यासाठी उभारलेल्या आहेत.
माटे, म. श्री.
“