दीक्षा : एखाद्या धार्मिक कार्यास प्रारंभ करताना स्वीकारावयाचे व्रत, मंत्रोपदेश घेण्यापूर्वी केला जाणारा संस्कार किंवा एखाद्या जनसमूहाचा घटक म्हणून व्यक्तीला द्यावयाची मान्यता, असे दीक्षाविधीचे निरनिराळे अर्थ होतात.

धार्मिक कार्यारंभी घ्यावयाच्या दीक्षेचे उल्लेख वैदिक वाङ्‌मयात आढळतात. वेदांत मुख्यतः यज्ञधर्म सांगितला आहे. म्हणून कोणताही यज्ञ करण्यापूर्वी यजमानास दीक्षा घ्यावी लागते. वेदातील यज्ञामध्ये ⇨ सोमयाग  हा एक महत्त्वाचा व मूलभूत याग आहे. यजमान व यजमानपत्नी हे दोघेही दीक्षेचा स्वीकार करतात. ‘दीक्षणीयेष्टि’ नावाचा यज्ञ झाल्यावर यजमानास दीक्षा देतात. दीक्षा संपेपर्यंत त्याने ज्या वस्तू वापरायच्या असतात, त्या त्याला देतात. ही दीक्षा घेतल्यावर यजमानाने व यजमानपत्नीने केवळ गाईचे दूधच प्यावयाचे असते. यज्ञ संपेपर्यंत त्याला अनेक नियम पाळावे लागतात. दीक्षित यजमान गर्भावस्थेत राहतो व अभृथस्नानानंतर त्याची दीक्षा संपते व त्याचा पुनर्जन्म होतो, असे म्हटले आहे. मातापित्यांपासून प्राप्त होणारा पहिला जन्म, उपनयन संस्कारामुळे प्राप्त होणारा दुसरा जन्म आणि यज्ञदीक्षेने प्राप्त होणारा तिसरा जन्म होय.

दीक्षेचा विधी अशा प्रकारे सांगितला असला, तरी सत्य हीच खरी दीक्षा होय. दीक्षेमध्ये तपाची म्हणजे उष्णतेची कल्पना असल्यामुळे या शब्दाची व्युत्पत्ती ‘दह्’ (तप्त होणे) या संस्कृत धातूपासून केलेली आहे.

मंत्रोपदेश घेण्यापूर्वीचा संस्कार या अर्थाने ⇨ उपनयन  संस्कार ही पण एक दीक्षाच आहे. यावेळी बटूला सावित्रीमंत्राचा उपदेश देतात. त्याचा यावेळी पुनर्जन्मच होतो. म्हणून त्याला ‘द्वीज’ हे नाव प्राप्त होते. धार्मिक वाङ्‌मयात मात्र उपनयनाला दीक्षा असे म्हटलेले आहे.

संन्यास हाही दीक्षापूर्वक घ्यावा लागतो. याचे विधानही पुष्कळ मोठे आहे. यावेळी मनुष्याला आध्यात्मिक किंवा मोक्षमार्गात नवा जन्म प्राप्त होतो. मोक्षप्राप्ती हा दीक्षेचा उद्देश असल्यामुळे वैष्णव, शैव, शाक्त तंत्रे यांत दीक्षेला महत्त्वाचे स्थान आहे. वैष्णव दीक्षेत, तप्तमुद्रा, पुंड्र, नामकरण मंत्र देणे इ. प्रधान घटक आहेत. दीक्षा धारण करणारा क्रमशः मोक्षाचा अधिकारी होतो. ही दीक्षा एकदा घेतल्यावर तिचा त्याग करता येत नाही. दीक्षा ही वर्णनिरपेक्ष आहे. आगमोक्त दीक्षेचे कलादीक्षा, तत्त्वदीक्षा, पददीक्षा वगैरे बारा प्रकार सांगितले आहेत. तांत्रिक दीक्षेत मंत्रोच्चाराला अधिक महत्त्व आहे. अशा प्रकारच्या दीक्षेसाठी विशिष्ट तिथी, वार, नक्षत्र, मास. इ. मुहूर्त सांगितले आहेत, तसेच ही दीक्षा तीर्थक्षेत्री श्रेष्ठ गुरूकडून घ्यावयाची असते. दीक्षा देणाऱ्या गुरूचा अधिकार मोठा असावा लागतो. दीक्षेमध्ये शक्तिपाताचे तत्त्व अंतर्भूत आहे. म्हणजे गुरूचे सामर्थ्य दीक्षा घेणाऱ्यामध्ये आपोआप निर्माण होते.

दीक्षेचा हा अर्थ लक्षात घेऊन या शब्दाची व्युत्पत्ती ‘दा’ (देणे) आणि ‘क्षि’ (नाश करणे) या दोन धातूंपासून मानली आहे. कोणी ‘क्षि’ ऐवजी ‘क्षल्’ (धुवून टाकणे) हा दुसरा धातू मानतात.

बौद्ध तंत्रामध्येही दीक्षा आहे. त्या ‘पब्बज्जा’ (प्रव्रज्या) आणि ‘उपसंपदा’ हे दोन संस्कार असतात. पारशी धर्मातील ⇨ नवज्योज हा एक दीक्षासंस्कारच आहे. इस्मामी धर्मात ‘सुंता’ आणि ख्रिस्ती धर्मात ‘बाप्तिस्मा’ हा एक दीक्षालिधीच आहे. ख्रिस्ती धर्मात व्यक्तीप्रमाणे वस्तूलाही पवित्र करण्याची विधी आहे.

एखाद्या जनसमूहात घटक म्हणून एखाद्या व्यक्तीस मान्यता देणे यासंबंधीचा विधी अनेक आदिम समाजांमध्ये रूढ होता. वयात आलेल्या मुलाच्या शारीरिक बळाची चाचणी घेतली जात असते. आत्मक्लेश सहन करण्याची त्याची शक्ती अजमावली जात असे. यांसबंधीचे विधी एकांतात केले जात. यावेळी त्या मुलाचा पहिला जन्म संपून दुसरा जन्म झाला, असे समजण्यात येई. काही समाजगटांत देवक वा कुलचिन्ह विशेषतः पशुसमान असे. अशा समाजांत तो मुलगा मानवी रूप सोडून पशूचे रूप धारण करतो, अशा प्रकारे त्याचा पशुयोनीशी संबंध जोडला जाई. हाही एक दीक्षेसारखाच विधी दिसतो.

काशीकर, चिं. ग.