दीपगृह : बऱ्याच लांब अंतरावरून दिसणारा तेजस्वी दिवा ठेवण्यासाठी मुद्दाम बांधलेला मनोरा किंवा उंचावरची आच्छादित जागा. समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी निरनिराळ्या आकारांची दीपगृहे बांधतात आणि त्यांच्या बाहेरच्या भिंतींवर एका विशिष्ट पद्धतीने रंगीत पट्टे काढतात त्यामुळे दिवसाही दीपगृहे लांब अंतरावरूनही स्पष्ट दिसतात. दीपगृहाचा आकार आणि रंगीत पट्टे पाहिल्यावर दीपगृहाच्या सर्वांत वरच्या मजल्यावर बसविलेल्या दिव्याचा प्रकाश काही ठराविक सेकंदच दिसतो व नंतर काही ठराविक सेकंद दिसेनासा होतो, अशी उघडझाक सारखी चालू राहते. प्रत्येक दीपगृहाच्या उघडझाकेचा अवधी मोजून अनुभवी नावाड्यांना दीपगृहाची ओळख पटते. दीपगृहाची जागा समजली म्हणजे दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजाला आपणास कोणत्या दिशेने जावयाचे आहे, ते ठरविता येते.
ज्या काळात मानव समुद्रसंचार करू लागला त्या वेळेस रात्री किनाऱ्यावरील जमीन, खडक वगैरे दिसण्याकरिता काही तरी उपाय योजणे भाग होते व म्हणूनच दीपगृहे बांधण्यात आली. प्रथमतः लाकडांच्या जाळाचा किंवा पेटलेल्या कोळशांच्या राशीचा उपयोग करीत असत व अर्थात तो एखाद्या उंच जागी करीत पण यामुळे धूर जास्त होई व असा जाळ कोणीही सहजरीत्या करू शकत असल्याने जहाजाची दिशाभूल करणे सहज शक्य असे. दीपगृहांच्या रचनेत मागाहून पुष्कळ प्रगती झालेली असली, तरी अजूनही ही पद्धत तत्त्वतः वापरली जाते. भारतात पुष्कळशा लहान बंदरांत जकात (कस्टम) कचेऱ्यांतून लाल दिवे लावण्याची पद्धत आहे, तसेच गोदीत शिरावयाच्या ठिकाणीसुद्धा उंच खांबांवर नुसते रॉकेलाचे कंदील लावले जातात.
दीपगृहांचे ढोबळमानाने पाच प्रकार पडतात : (१) समुद्रावरून संचार करताना किनारा दिसण्याकरिता : अशी दीपगृहे सर्वसाधारणत: जमिनीवर असतात व त्यांवर दिवाबत्ती बघणारा माणूस सतत पहारा करीत असतो. हे दिवे फार लांबून दिसतील अशी व्यवस्था केली जाते. (२) धोक्याचे दिवे : किनाऱ्यालगतचे धोक्याचे खडक, दांडे वगैरे दाखविणारी दीपगृहे या प्रकारात मोडतात. यावर सतत पहारेकऱ्याचीसुद्धा जरूरी लागतेच असे नाही. या कामाकरिता लहान नावेतूनही दिवा दाखविण्याची पद्धत आहे. (३) किनाऱ्यालगतच्या नौकानयनाची दीपगृहे : ही दीपगृहे किनाऱ्यालगत चालणाऱ्या व्यापारी जहाजांना एका बंदरातून दुसऱ्या बंदरात जाण्याकरिता मार्गनिर्देशक म्हणून बांधली जातात. (४) दिव्यांची रांग : यात सर्वसाधारणपणे एकामागे एक असे निरनिराळ्या उंचीवर काही अंतरावर दोन दिवे असतात. त्यामुळे सुरक्षित मार्गाची दिशा दाखविली जाते. हे दिवे सर्वसाधारणत: स्वयंचलित असतात आणि सामान्यत: नद्या, खाड्या व बंदरात येण्याच्या मार्गावर दाखविले जातात. (५) बंदरांची सीमा दाखविणारे दिवे : पकट्या किंवा गोद्यांची हद्द जेथे संपते तेथे हे दिवे दाखविले जातात आणि बहुधा ते स्वयंचलित असतात.
महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर दमणपासून मुंबईपर्यंत १५ दीपगृहे आहेत. मुंबई बंदरात ३१, अलिबागेजवळ २, चौल येथे १, जंजिऱ्याजवळ ७, दाभोळ भागात ६, जयगडजवळ ५, रत्नागिरीजवळ ५, राजापुराजवळ २, विजयदुर्गाजवळ १, देवगडाजवळ २, मालवण वेंगुर्ले भागात ५ आणि गोवा भागात १० दीपगृहे आहेत. यांपैकी जागतिक दळणवळणाच्या उपयोगासाठी १८ असून बाकीची स्थानिक व प्रादेशिक रहदारीसाठी बांधली आहेत.
आ.१ मध्ये कुलाब्याच्या दीपगृहाचा उभा छेद दाखविला आहे त्यावरून दीपगृहाच्या आतली रचना समजून येईल. आ. २ मध्ये रत्नागिरीचे दीपगृह दाखविले आहे त्यावरून दीपगृहाची बाहेरची भिंत रंगविण्याची एक पद्धत लक्षात येते.
महत्त्वाच्या दीपगृहातील दिवा २५ ते ३० किमी. अंतरावरून दिसतो. महाराष्ट्रातील राजापूर येथील दिवा चांगला तेजस्वी असून बऱ्याच उंचावर असल्याने ३० किमी अंतरावरून दिसतो. दूर अंतरावरून पाहत असताना पृथ्वीच्या गोलाचा वक्रभाग दिव्याच्या व पाणाऱ्याच्या आड येतो. पाहाणारा आणि दिवा जितका उंच असेल तितका अधिक दूरचा दिवा दिसू शकेल. समुद्रसपाटीपासून दिव्याची उंची आणि तो दिवा दिसू लागण्याचे अंतर खाली कोष्टकात दिले आहे.
समुद्रसपाटीपासून दिव्याची उंची व तो दिसू लागण्याचे अंतर
दिव्याची उंची (मी.) |
२ |
४ |
१० |
१५ |
२० |
३० |
४० |
५० |
७५ |
१०० |
हवा स्वच्छ असताना |
||||||||||
दिवा दिसू लागण्याचे अंतर (किमी. ) |
५ |
७·३ |
११·७ |
१४·५ |
१७ |
२० |
२४ |
२६ |
३३ |
३७ |
उदा., दिव्याची उंची ५० मी. असेल व पाहणारा १० मी. उंचीवर असेल, तर २६ +११·७ = ३७·७ किमी. अंतरावरून तो दिवा दिसेल.
प्रकाशन पद्धती : दीपगृहात वापरीत असलेल्या दिव्यांच्या प्रकाशनाचे पाच प्रकार करता येतात. (१) स्थिर प्रकाश : शहरातून वापरीत असलेले बहुतेक सर्व दिवे स्थिर प्रकाश देणारे असल्याने त्यांच्यापासून दीपगृहाचे दिवे वेगळे ओळखता येणे कठीण असते, म्हणून स्थिर प्रकाश देणारे दिवे आता दीपगृहावर फारसे वापरीत नाहीत. (२) चमकणारा प्रकाश : ज्या ठिकाणी दिव्याचा प्रकाश दिसण्याचा अवधी प्रकाश न दिसण्याच्या अवधीपेक्षा लहान असतो तेव्हा त्याला चमकणारा प्रकाश म्हणतात. (३) चमक–समूह थोडा अवधी सोडून एकापाठोपाठ एका अशा प्रकारे काही विवक्षित वेळी चमका दिसल्यावर सापेक्षतः दीर्घ पण निश्चित काळ प्रकाश मुळीच न दिसणे, यास चमक–समूह प्रकाश म्हणतात. (४) आच्छादित प्रकाश : हा प्रकाश खंडित असतो आणि तो दिसण्याच्या अवधीच्या मानाने तो न दिसण्याचा अवधी अल्प असतो. असे प्रकाशन चमकणाऱ्या प्रकाशनाच्या उलट असते. (५) आच्छादित–समूह प्रकाश : एकापाठोपाठ थोड्या थोड्या नियमित अवधीनंतर दिवा आच्छादित होऊन प्रकाश दिसण्याची विवक्षित संख्या झाली म्हणजे सापेक्षतः बराच विवक्षित काळ बंद राहणारा प्रकाश. वरील पाच प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचा दिवा एखाद्या दीपगृहात आहे, हे विशिष्ट खुणा वापरून सागरी (नाविक) नकाशात दाखविलेले असते.
दीपगृहाच्या दिव्याचा दुसरा गुण म्हणजे त्याची प्रखरता. अठराव्या शतकापर्यंत दीपगृहासाठी लाकडाची किंवा कोळशाची रास पेटवून प्रकाश उत्पन्न करीत असत. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी तेल जाळून लख्ख (उत्तम) प्रकाश उत्पन्न करणारा ज्वालक स्विस अभियंते एमे अरगँड यांनी तयार केला. या ज्वालकात अनेक समकेंद्री, पातळ आणि गोल वाती होत्या. त्यांच्यामधून पुरेशा हवेचा पुरवठा होण्याची व्यवस्था असे. दिव्याची वात नुसती मोठी करून भागत नसे कारण ज्योतीच्या मध्यावर हवा पोहोचू शकत नसल्याने तेथे अर्धवट ज्वलन होऊन धूर व काजळी उत्पन्न होई. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आर्थर किटसन यांनी तयार केलेल्या ज्वालकाचा उपयोग करणारे दिवे वापरात येऊ लागले. या ज्वालकात वातीच्या साहाय्याने ज्वाला मिळविण्याऐवजी एका पात्रात तेलाचे बाष्पीभवन करून ते बाष्प व हवा यांचे मिश्रण प्रदीप्त (उच्च तापमानामुळे प्रकाश देणाऱ्या) वायुजाळीच्या साहाय्याने जाळून प्रखर प्रकाश मिळविण्यात येतो [→ दिवे]. या दिव्यापासून अरगँड दिव्यापेक्षा तिप्पट प्रखर प्रकाश मिळू लागला. याच तत्त्वावर चालणारा पण अधिक साध्या रचनेचा एक ज्वालक डेव्हिड हुड यांनी १९२१ मध्ये तयार केला. जेथे विद्युत्शक्ती वापरणे शक्य नाही अशा दीपगृहांसाठी सुधारित वायुजाळीबरोबर हुड यांचा पेट्रोलियम बाष्प ज्वालक अद्यापिही वापरण्यात येतो.
यानंतर ॲसिटिलीन वायूचे दिवे व मागाहून विजेचे दिवे प्रचारात आले. विजेचा पुरवठा करता येत नाही अशा काही दीपगृहांत अद्यापिही सिलिंडरात दाबाखाली ठेवलेला ॲसिटिलीन वायू जाळणारे दिवे व त्यांच्या समवेत निल्स गस्टाव्ह डालेन यांनी शोधून काढलेल्या प्रकारची चमक यंत्रणा वापरतात. ॲसिटिलिनाचे दिवे सहज पेटविता येतात व सहज विझविताही येतात.
विजेच्या प्रदीप्त दिव्यांचा शोध लागून त्यांत पुष्कळ सुधारणाही झाली. त्यानंतर अधिक कार्यक्षम अशा प्रज्योत दिव्यांचा (कार्बनाच्या दोन विद्युत् अग्रांमधील फटीतून विद्युत् प्रवाह जात असताना प्रखर ज्योत उत्पन्न करणाऱ्या दिव्यांचा) शोध लागला. सुरुवातीला विजेची प्रज्योत साध्या वातावरणातच कार्बनाच्या दोन कांड्यांच्या अग्रांमध्ये उत्पन्न करीत असत. नंतर आर्गॉन अथवा झेनॉन या अक्रिय (सहजासहजी रासायनिक विक्रिया न होणाऱ्या) वायूंच्या वातावरणात किंवा पाऱ्याच्या बाष्पात प्रज्योत उत्पन्न करून अधिक कार्यक्षम दिवे तयार होऊ लागले. असे दिवे आता कित्येक दीपगृहांत वापरात आले आहेत. ६० सेंमी. व्यासाच्या झेनॉनाच्या दिव्यातून दीड कोटी कँडेलाइतका प्रखर प्रकाश मिळू शकतो आणि त्यासाठी २·५ किवॉ. विद्युत् शक्ती लागते. दिव्यापासून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकाशाचे इष्ट दिशेत एकत्रीकरण करण्यासाठी आ. ३ मध्ये दाखविलेला परावर्तक (प्रकाश किरण परत पाठविणारा कॅटॉप्ट्रिक), आ. ४ मध्ये दाखविलेले प्रणमनी (प्रकाश किरणाची दिशा बदलणारे) भिंग (डायॉप्ट्रिक) किंवा आ. ५ मध्ये दाखविलेला ऑग्यूस्तीन फ्रेनेल यांनी शोधून काढलेला अनेक परावर्तक व प्रणमनी लोलक आणि प्रणमनी भिंगे बसविलेला पिंजरा (कॅटॉडायॉप्ट्रिक) असे तीन प्रकार वापरता येतात.
आ. ३ मध्ये दाखविलेला परावर्तक अन्वस्ती [अन्वस्त या वक्राच्या आकाराचा काटछेद असलेला, पॅराबोलिक → अन्वस्त] असेल आणि दिवा त्याच्या केंद्रस्थानावर ठेवलेला असेल, तर परावर्तकावर पडणारा सर्व प्रकाश समांतर दिशेने परावर्तित होऊन बाकीच्या प्रकाशात मिसळतो व त्याची प्रखरता वाढवितो. आ. ४ मध्ये दाखविलेल्या प्रणमनी भिंगाच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या दिव्यातील भिंगाकडे येणाऱ्या सर्व प्रकाशाचे समांतर शलाकेत एकत्रीकरण होते व दिव्याभोवती बहिर्गोल काच बसविली, तर त्या काचेतून जाणाऱ्या सर्व प्रकाशाचे आडव्या दिशेत एकत्रीकरण होते. इष्ट दिशेशी फार तिरप्या दिशेने येणाऱ्या प्रकाशाचे केंद्रीकरण करण्यासाठी त्रिकोणी लोलकाच्या काटछेदाची वलये (कडी) भिंगावर बसवितात. (आ.५) (प्रथमतः फ्रेनेल यांनी याकरिता चांदीचा मुलामा दिलेले आरसे वापरले होते.) ही वलये दिव्यासमोर उभी धरली, तर तिरप्या दिशेने येणाऱ्या किरणांचे आडव्या पातळीत एकत्रीकरण होते आणि ही वलये आडवी बसविली, तर तिरप्या किरणांचे एकत्रीकरण समतल (एकाच पातळीत) होते. वरील तीनही प्रकारच्या उपकरणांचा योग्य प्रमाणात उपयोग केला, तर दिव्याच्या प्रकाशाचे एकत्रीकरण पाहिजे त्या दिशेने करता येते.
दीपगृहाच्या दिव्यावर सागरी मोठे पक्षी झडप घालतात. त्यामुळे दिव्याची काच फुटू नये म्हणून दिव्याभोवती मजबूत जाळी बसवितात.
निरनिराळ्या प्रकारचा प्रकाश पाडण्यासाठी दीपगृहावर निरनिराळ्या प्रकारची यंत्रणा बसवावी लागते. एका प्रकारात प्रकाशाच्या एकत्रीकरणाची यंत्रणा स्थिर ठेवतात व दिव्याची ज्योत ठराविक अवधीनंतर विझविण्याची व पुन्हा पेटविण्याची यांत्रिक व्यवस्था करतात. दुसऱ्या प्रकारात ज्योत स्थिर ठेवतात व एकत्रीकरणाची यंत्रणा तिच्याभोवती फिरवितात. ही यंत्रणा फिरविण्यासाठी स्प्रिंगेचा किंवा वजनाचा उपयोग करतात. ज्या ठिकाणी ॲसिटिलिनाचा दिवा वापरतात तेथे ही यंत्रणा फिरविण्यासाठी दाबाखालील ॲसिटिलिनामधील ऊर्जेचा उपयोग करतात. यंत्रणेची गती स्थिर ठेवण्यासाठी अपमध्य जातीचा (परिभ्रमी वेगाच्या प्रमाणात आसापासून दूर जाणाऱ्या वजनाचा उपयोग करणारा) नियंत्रक वापरतात.
दीपगृहाचे स्थापत्य : जमिनीवरील दीपगृह बांधण्यासाठी शक्य असेल तेथे एखादी उंच टेकडी किंवा तुटलेल्या उंच कड्याच्या माथ्यावरची जागा निवडतात. वादळी वारे सहन करण्यासाठी दीपगृहाची इमारत गोल किंवा अष्टकोनी आणि वर निमुळती होणारी असावी लागते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर दिवा बसवितात व त्यावर छत्रीसारखे छप्पर घालतात व दिव्याभोवती कठडा बसवितात. दीपगृहामध्ये अनेक मजले करता येतात. दीपगृह सांभाळणारा कर्मचारी दीपगृहातील एखाद्या मजल्यामध्ये राहणारा असेल, तर दीपगृहाचा व्यास मोठा करावा लागतो. दीपगृह जर समुद्रातील खडकावर बांधावयाचे असेल, तर ते बरेच कौशल्याचे काम असते. अशा दीपगृहात कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय व सामान साठविण्याची सोय आतच करावी लागत असल्यामुळे त्याचे आकारमान मोठेच असावे लागते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील कित्येक दीपगृहे वादळी वाऱ्यांत व समुदांच्या लाटांना बळी पडल्याची उदाहरणे आहेत. तथापि त्या काळात बांधलेले स्थापत्याचे काही उत्कृष्ट नमुने आजही दिसून येतात. मुंबईची कुलाब्याची दांडी ही त्यांपैकीच एक आहे. बांधकामाच्या दगडाचे जोड थोडेही खिळखिळे झाले, तर बांधकाम टिकाव धरू शकत नाही म्हणून पूर्वीची दीपगृहे चुन्याने जोडलेले घडीव दगड रचून बांधीत असत व एका दगडाचा काही भाग शेजारच्या दगडात अडकून राहील अशी घडण करीत असत. सिमेंट काँक्रीटचा वापर सुरू झाल्यापासून प्रबलित (लोखंडी सळ्या घालून विशेष मजबूत केलेले) सिमेंट काँक्रीटचे मोठे ठोकळे रचून बांधकाम करण्यात येते. काही प्रकारांत प्रबलित सिमेंट काँक्रीटाची ४ मी. व्यासाची, १५ सेंमी. जाडीची व २ मी. उंचीची तयार कडी एकावर एक रचून सर्व बांधकाम पूर्ण करतात व सर्व कड्यांतून उत्तम पोलादाच्या अनेक सळया ओवून त्यांना नट व बोल्टाप्रमाणे आवळून बसवितात. त्यामुळे ही रचना चांगली मजबूत होते व स्वस्तही पडते. दुसरीकडे तयार करून आणलेल्या कड्यांच्या परिघाचा काही भाग शेजारच्या कड्यात बसावा अशी योजना केली म्हणजे सर्व कडी अगदी बरोबर जागी बसतात व एकंदर रचनाही सुबक व मजबूत होते. दिव्याच्या खालच्या खोलीत धुक्याच्या वेळी ध्वनी संकेत किंवा रेडिओ संकेत पाठविण्याची यंत्रणा बसवितात व त्याच्या खालच्या जागेत दीपगृहावर देखरेख करणाऱ्याची जागा, कोठार व गोडे पाणी ठेवण्याची जागा असते. दीपगृहाच्या खालच्या मजल्यापासून अगदी वरपर्यंत जाण्यासाठी आतल्या बाजूने एक मजबूत व मळसूत्री पद्धतीचा जिना बांधलेला असतो. विद्युत् शक्ती उत्पन्न करण्याचे यंत्र आणि डीझेल एंजिन बहुतेक स्वतंत्र बांधलेल्या जवळच्या घरात ठेवतात व दिव्यापर्यंत विद्युत् प्रवाह आणण्यासाठी केबलीचा उपयोग करतात. सर्व दीपगृहांच्या सर्वात वरच्या टोकावर तडित् निवारक साहित्य बसविलेले असते. दीपगृहाच्या खुणेसाठी जो रंग द्यावयाचा असतो तो काँक्रीट मिसळण्यापूर्वीच त्यात घालतात म्हणून तो कायमचा पक्का होतो.
दीपगृह बांधण्याच्या जागी पक्का खडक नसून वाळू किंवा मातीचा गाळ साचलेला असेल, तर प्रथम खडक लागेपर्यंत सिमेंट काँक्रीटचे पुष्कळ खांब पुरतात व त्यांच्या माथ्यावर सिमेंट काँक्रीटच्या तुळ्या ठेवतात. त्यांच्यावर नेहमीप्रमाणे साधी बांधणी करतात. अमेरिकेतील बझर्ड्स उपसागरात १९६१ साली बांधलेल्या दीपगृहांसाठी ८० मी. खोलीपर्यंत पायाचे खांब ठोकून बसविले व त्यांवर पोलादी सांगाडा बसविला व त्यावर ५०० चौ.मी.चा माळा बांधला. या माळ्याच्या एका कोपऱ्यात मुख्य दीपगृह बांधले असून त्याची उंची ३० मी. आहे. माळ्याच्या दुसऱ्या भागात कोठारे व राहण्याची जागा असून त्या जागेवरच्या गच्चीवर हेलिकॉप्टर उतरण्याची सोय केलेली आहे. या दीपगृहाचा दिवा एक कोटी कँडेलाइतका प्रकाश देतो. या दीपगृहावर रेडिओ व ध्वनी संकेत पाठविण्याची उत्तम व्यवस्थाही केलेली आहे.
पाश्चात्य देशांतील सर्वांत जुने दीपगृह ईजिप्तमधील ॲलेक्झांड्रियाच्या जवळच्या द्वीपकल्पावर टॉलेमी यांनी इ. स. पू. ८० च्या सुमारास बांधले. प्राचीन काळातील सात अतिशय आश्चर्यकारक बांधकामांपैकी एक म्हणून हे दीपगृह गणले जाते. त्याच्या ‘फेअरॉस’ या नावावरून दीपगृह बांधण्याच्या विशेष उद्योगाला ‘फेअरॉलॉजी’ म्हणण्याचा प्रघात पडला. हे दीपगृह संगमरवरी दगडांचे बांधलेले होते आणि त्याची उंची १२० मी. होती. तेराव्या शतकात ते भूकंपाने कोसळले.
दीपनौका : ज्या ठिकाणी दीपगृह बांधण्यासाठी चांगली जागा नसते किंवा स्थानिक परिस्थितीमुळे दीपगृह बांधणे फार खर्चाचे होते, तेथे एखादी स्वतंत्र नाव नांगर टाकून उभी करतात व त्या नावेच्या डोलखांबावर शक्य तितक्या मोठ्या शक्तीचा दिवा ठेवतात. ही नाव डोलत असताना दिवा फारसा हलू नये म्हणून दिवा ठेवण्यासाठी विशेष प्रकारची यांत्रिक बैठक वापरतात. दिवसा ही नाव ओळखता यावी म्हणून तिच्यावर तिचे नाव ठळक अक्षरात लिहितात. अशा पद्धतीची दीपनौका मुंबईच्या बंदारातही वापरतात (आ. ६). या नौकेवर नौका चालविण्याची यंत्रसामग्री सहसा बसवीत नाहीत. ही नौका एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी त्या ओढबोटीचा उपयोग करावा लागतो.
मार्गनिर्देशनासाठी दूर समुद्रात तरंगत ठेवलेल्या बोयऱ्यांपैकी काही बोयऱ्यांवरही दिव्यांची सोय केलेली असते [→ बोयरा].
भारतातील दीपगृहांची शासनव्यवस्था : दीपगृहांचा कारभार पाहण्यासाठी त्यांचे तीन विभाग पाडलेले आहेत. जागतिक दळणवळणास उपयोगी असलेली दीपगृहे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. किनाऱ्यावरची सामान्य दीपगृहे राज्य सरकारच्या आणि स्थानिक बंदरातील दीपगृहे पोर्ट ट्रस्टांच्या नियंत्रणाखाली असतात. भारतातील ५,००० किमी. किनाऱ्यावर १९६८ साली केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली २६९ दीपगृहे व ८ दीपनौका होत्या आणि ४५ नवीन दीपगृहांचे बांधकाम चालू होते. दीपगृहांची बांधणी, वाढ व सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देणारी एक समिती असून तिच्या सूचना कार्यान्वित करण्याची जबाबदारी दीपगृहांच्या महासंचालकाकडे असते. महासंचालकाच्या हाताखाली पोर्ट ब्लेअर (अंदमान), कलकत्ता, मद्रास, पणजी, मुंबई आणि जामनगर या सहा ठिकाणी दीपगृह कार्यालये आहेत. या खात्याचा खर्च चालविण्यासाठी १९२७ च्या भारत दीपगृह अधिनियमाप्रमाणे प्रत्येक बंदरात येणाऱ्या जहाजाकडून कर वसूल केला जातो.
संदर्भ : Adamson, H.C. Keepers of the Lights, Philadelphia, १९५५
जावडेकर, व. वि. तांबे, मु. शं.
“