दिसपूर : आसाम राज्याची नवोदित हंगामी राजधानी. लोकसंख्या १,७२५ (१९७१). भरेली नदीच्या पूरमैदानात वसलेले हे वैशिष्ट्यपूर्ण खेडे गौहाती–शिलाँग या महामार्गावरील स्थानक आहे. १९७२ च्या राज्यपुनर्रचनेनुसार आसामातून मेघालय राज्याची निर्मिती झाल्यानंतर १९७३ पर्यंत शिलाँग हीच दोन्ही राज्यांची राजधानी होती. नवीन राजधानी गौहातीपासून सु. ६ किमी. वर गौहातीच्या दिसपूर उपनगरात २६ जानेवारी १९७४ रोजी स्थापन झाली. येथील मूळचे शेती व लाकूडतोड हे मुख्य व्यवसाय आहे. सध्या येथे नवनवीन उद्योगधंद्यांची वाढ होत असून व्यापारही वाढत आहे. स्थानिक लोक शेतीमध्ये गुंतलेले आहेत तर कायम वस्तीसाठी नव्याने आलेले लोक उद्योगधंद्यात आहेत. याच्या आसमंतात भात, चहा, ऊस, ताग, तेलबिया, कडधान्ये इ. पिके होतात. राजधानीचे ठिकाण झाल्यामुळे दिसपूरचे महत्त्व वाढत आहे.

कांबळे, य. रा.