दिवाळखोरी : ऋणकोची कर्ज फेडण्याची असमर्थता. स्वतःवर बंधनकारक असलेली कर्जे फेडण्यास असमर्थ असणारी व्यक्ती दिवाळखोर ठरण्यास पात्र होते. प्राचीन रोममध्ये ऋणकोच्या शरीराचे तुकडे करुन धनकोंनी ते वाटून घेणे विधिसंमत होते. पुढे त्याच्या संपत्तीचा लिलाव करुन त्याला विमुक्त करीत. प्राचीन इंग्लंडमध्ये रोमन विधी अनुसरीत. पुढे त्याला कारागृहात ठेऊ लागले पण त्याला स्वतःच्या उदरनिर्वाहाची सोय करावी लागे किंवा धर्मादायावर अवलंबून राहावे लागे. कालांतराने पार्लमेंटला अधिनियम करून ऋणकोला या हालअपेष्टांतून व सावकारांना लबाड ऋणकोपासून बचाव करण्यासाठी उपबंध करावे लागले. भारतात स्मृत्यादींनी कर्जवसुलीचे अनेक उपाय घालून दिले, तरी कर्ज पुत्रपुत्रादींवर बंधनकारक असल्याने दिवाळखोरी विधीची आवश्यकता भासली नव्हती.
ब्रिटिश अमदानीत १८२८ मध्ये दिवाळखोरी अधिनियम करणे सुरू झाले. १८४८ मधील अधिनियम इलाखा शहरांपुरताच होता. व्यापारी दिवाळखोर झाल्यास दुर्दैवामुळे व इतर झाल्यास गैरवर्तणुकीमुळे असे समजत. पुढे हा दृष्टिकोन नाहीसा झाला. सांप्रत इलाखा-शहरांसाठी १९०९ चा आणि प्रांतांकरिता १९१० चा असे अधूनमधून विशोधित झालेले अधिनियम चालू आहेत. इंग्लिश विधी हा त्यांचा पाया होय.
प्रामाणिक पण दुर्दैवी ऋणकोचा सावकारांपासून बचाव करून त्याची मुक्तता करणे, ऋणकोची जप्तीला पात्र असलेली सर्व संपत्ती धनकोंना उपलब्ध करून देऊन त्याचे संरक्षण करणे व लबाडीचे पूर्वमान व हस्तांतरणे रद्द करवून देऊन ऋणकोच्या उपलभ्य संपत्तीचे शीघ्र व समन्यायी वाटप करणे, हे दिवाळखोरी अधिनियमांखालील प्रमुख उद्देश होय.
अविकल मनाच्या सज्ञान व्यक्तीला, पण निगमाला नव्हे, दिवाळखोर म्हणून अभिनिर्णित करता येते. तिला दिवाळखोर म्हणून अभिनिर्णित करण्यासाठी ती स्वतः अथवा धनको अर्ज करु शकतो. पंचशताधिक कर्ज असल्यास, कर्जवसुलीच्या प्रकरणी ऋणकोला कारागृहात ठेवला असल्यास किंवा त्याची संपत्ती जप्त झाली असल्यास त्याला आणि उपरोक्त रकमेहून अधिक कर्ज असल्यास किंवा अर्जापूर्वी तीन महिन्यांत ऋणकोने दिवाळखोरींचे कृत्य केले असल्यास धनकोला अर्ज करता येतो. ऋणकोने आपली सर्व किंवा बव्हंशी संपत्ती धनकोमध्ये वाटण्यासाठी किंवा धनकोंना वंचित करण्यासाठी किंवा कपटाने हस्तांतरीत केल्यास, त्याचप्रमाणे ऋणकोने राज्यप्रदेश सोडून बाहेर गेल्यास पैशांच्या हुकूमनाम्याच्या फेडीप्रीत्यर्थ त्याची संपत्ती जप्त झाल्यास, त्याला कारावासात ठेवला असल्यास, वा कर्जफेड स्थगित करण्याचा आपला मनोदय त्याने नोटीशीने कळविल्यास त्याने दिवाळखोरीचे कृत्य केले असे म्हणतात.
अभिनिर्णितीचा अर्ज आल्यावर न्यायालय संबंधित पक्षांना नोटीस काढून, त्यांचे म्हणणे ऐकून व पुराव्याचा विचार करून अर्ज नामंजूर तरी करते किंवा ऋणको दिवाळखोर असल्याबद्दल अभिनिर्णयादेश तरी करते व तसे नसल्यास नव्याने नियुक्ती करते. इलाखा–शहरांत अशा अधिकाऱ्याला शासकीय अभिहस्तांकिती म्हणतात. अभिनिर्णयादेश अर्जाच्या तारखेपासून पूर्वलक्षी होतो. त्यामुळे दिवाळखोरीची संपत्ती न्यायालयात वा प्रापकांत निहित व सावकारामध्ये विभाजनीय होते. दिवाळखोरी कार्यवाही निलंबित असताना दिवाळखोरी विधिसाठी सिद्ध करण्यालायक ऋणाबाबत सावकारांना दिवाळखोरीविरुद्ध कारवाई करता येत नाही. चालू कार्यवाहीतसुद्धा प्रापकादींना पक्षकार करावे लागते. ऋणविमुक्तीचा आदेश होईपावेतो ऋणकोने संपादिलेली संपत्ती न्यायालयांत वा प्राणकांत निहित होते. मात्र प्रतिभूत सावकारांना भारित करून दिलेली संपत्ती तशीच राहते. अभिनिर्णयापासून तीस दिवसांच्या आत दिवाळखोराला आपल्या संपत्तीची सूची न्यालयाकडे द्यावी लागते. तसे केल्यावर तो न्यायालयाकडून ‘संरक्षणादेशʼ मिळवू शकतो.
वरील सूची दाखल झाल्यानंतर धनकोने अर्ज केल्यास सर्व धनकोंची सभा भरवून दिवाळखोराच्या सूचीबद्दल चर्चा करण्यास संधी देतात व दिवाळखोराच्या संपत्तीचे विनियोजन कसे करावे याचा निर्णय होऊ शकतो. धनकोने अर्ज केल्यास न्यायालय दिवळखोराची प्रकट तपासणी करण्याचा आदेश देते. तिच्यात धनको एकत्र येऊन दिवाळखोराला त्याची संपत्ती इत्यादिविषयी प्रश्न विचारू शकतात. दिवाळखोराने संपत्ती दुसऱ्याकडे लपवून ठेवल्याचे आढळल्याचे त्याची अप्रकट तपासणी घेण्याचा आदेश न्यायालय देते व दिवाळखोराला दिवाणी कारागृहांत पाठवते.
प्रापकादींनी यावत् शक्य लवकर सावकारांच्या ऋणफेडीच्या उद्योगाला लागावे लागते. तत्प्रीत्यर्थ दिवाळखोराची संपत्ती ताब्यात घ्यावी व एकत्रित करावी लागते. त्रयस्थांनी स्वसंपत्ती दिवाळखोराची आहे असा लोकाचा समज होईल, अशा रीतीने दिवाळखोराकडे राहू दिल्यास तिला दिवाळखोराच्या ‘लौकिकतः स्वामित्वाचीʼ म्हणतात, तीही प्रापक दिवाळखोराची म्हणून ताब्यांत घेऊ शकतो. मात्र भांडीकुंडी वस्त्र प्रावरणे व चरितिर्थोत्पादक अवजारे–हत्यारे वगळावी लागतात. अवश्य वाटल्यास तो दिवाळखोराची स्थावर जंगम संपत्ती विकू शकतो. क्रेते किंवा भागधारक याच्या नावाने प्रामाणिकपणे व सप्रतिफल केलेल्या हस्तांतराशिवाय बाकीची अभिनिर्णिती–अर्जापूर्वीच्या दोन वर्षाखालील हस्तांतरणे शुन्यनीय असून ती दिवाळखोरी न्यायालयाकडून इलाखा-शहरात उच्च न्यायालयाकडून व इतरत्र जिल्हा न्यायालयाकडून किंवा दत्तशक्ती दुय्यम न्यायालयाकडून रद्द करून घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे अशा अर्जापूर्वी तीन महिन्यांत काही धनकोंनाच पूर्वमान देण्याच्या लबाड उद्देशाने ऋणकोने हस्तांतरण वा भरणा केल्यास उक्त हस्तांतरण वा भरणा प्रापकादींना न्यायालयांतील कारवाईने रद्द ठरवून घ्यावे लागतात. मात्र ऋणकोकडून प्रामाणिकपणे व सप्रतिफल हक्क मिळविणारांना हा उपबंध लागू नाही.
प्रापकादि, अप्रतिभूत धनकोंची यादि करतात. अशा धनकोंना आपली ऋण प्रापकापुढे सिद्ध करावी लागतात. प्रापकाला योग्य लेखा ठेवावा लागतो. दिवाळखोराच्या सर्व धनकोनी बहुमताने त्याच्या संपत्तीच्या विभागणीची योजना संमत करून तसे विनियोजन करणेही विधिसंमत आहे.
अशा रीतीने संपत्तीचे विभाजन व ऋणांची संपूर्ण वा अंशतः फेड झाल्यावर, दिवाळखोराने अर्ज केल्यास त्याचे वर्तन प्रामाणिकपणाचे असून त्याने आपली संपत्ती लबाडी न करता प्रापकाला उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान झाल्यास न्यायालय विमुक्ती आदेश देते. त्यानंतर दिवाळखोर बाकीची कर्जे फेडण्याच्या दायित्वातून मोकळा होतो. कपटाने पतकरलेली दायित्वे, शासनाचे देणे व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ४८८ व्या कलमाखाली पत्नी–आदींच्या निर्वाह–रकमा भागवण्यापासून मात्र त्याची सुटका होत नाही.
श्रीखंडे, ना. स. मांद्रेकर, शा. गो.
“