दिमापूर : नागालॅंड राज्याच्या कोहिमा जिल्ह्यातील एक शहर आणि पूर्वीच्या काचार राज्याची राजधानी. लोकसंख्या १२,४२६ (१९७१). कोहीमाच्या वायव्येस सु. ४५ किमी. असलेले हे शहर नागा टेकड्यांच्या पश्चिम उताराकडील पायथ्याशी धनसिरी नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. १५३६ मध्ये आहोम राजांनी हे शहर लुटले. किल्ला, तट, तलाव, कमानी, दरवाजा, व्ही आकाराचे स्तंभ यांचे प्राचीन अवशेष अजूनही दृष्टीत पडतात. व्ही आकाराचे स्तंभ नागा लोक मेजवानीच्या प्रसंगी उभारतात. याच्या आसमंतात पिकणाऱ्या तांदूळ, कापूस, नारिंगे, बटाटे यांच्या व्यापाराचे हे केंद्र आहे. हे गोलाघाट–इंफाळ या राष्ट्रीय हमरस्त्यावरील स्थानक असून मणिपूर रोड हे याचे जवळचे लोहमार्ग स्थानक आहे.
सावंत, प्र. रा.