दास, नीलकंठ : (५ ऑगस्ट १८८४–? १९६७). प्रसिद्ध ओडिया कवी, देशभक्त, समाजसेवक व शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म पुरी जिल्ह्यातील श्रीरामचंद्रपूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील आनंद दास. १९०५ मध्ये राधामणी देवींशी विवाह. पुरी येथून ते मॅट्रिक झाले. कटक येथील रेव्हेन्शॉ महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर ते एम्. ए. व बी. एल्. साठी कलकत्त्यास गेले. १९११ मध्ये ते एम्. ए. झाले आणि गोपबंधू दासांनी सुरू केलेल्या सखीगोपाल येथील सत्यवादी विद्यालयात अध्यापक म्हणून काम करू लागले. गोपबंधू दास, गोदावरीश मिश्र, आचार्य हरिहर दास व पंडित कृपासिंधू मिश्र यांसारखे प्रसिद्ध विद्वान सहकारी त्यांना लाभले. नंतर ते गांधीजींच्या निकट सहवासात आले. सत्यवादी विद्यालयात अध्यापन करीत असताना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार साकार होण्यास चांगला वाव मिळाला. ते राष्ट्रीय शिक्षणाचे कडवे पुरस्कर्ते होते. त्यांचा धर्मशास्त्राचा व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास होता. ते हिंदू धर्माचे कडवे अभिमानी असले, तरी त्यांचा धार्मिक दृष्टिकोन उदार होता व परधर्माबाबत ते सहिष्णू होते. त्यांना भारताचे प्रबोधन घडवून आणण्यासाठी पाश्चात्य शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक वाटत होता. तथापि त्यांना भारतीय परिस्थितीला अनुरूप असे राष्ट्रीय स्वरूपाचेच शिक्षण हवे होते व त्याचा पुरस्कार करणे त्यांना सत्यवादी विद्यालयात सहज शक्य झाले. ते एक थोर समाजसेवक होते. आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन ते आसपासच्या खेडोपाडी जात व समाजसेवा करीत. कॉलऱ्याच्या वारंवार येणाऱ्या साथीत ते रोग्यांची शुश्रूषा करीत. कलकत्ता विद्यापीठात ते १९१८ मध्ये पदव्युत्तर वर्गांना ओडिया साहित्य व तुलनात्मक भाषाशास्त्र शिकविण्यासाठी गेले.
असहकारिता चळवळ सुरू होताच ते ओरिसात परत आले आणि गोपबंधू दासांसोबत त्यांनी चळवळीत सक्रिय भाग घेऊन लोकमत पेटवले. १९२३ मध्ये गांधीजीच्या समेवत त्यांनी ओरिसाचा दौरा केला. त्यांना तीन वेळा (१९२३, ३२ व ३३) तुरुंगवास भोगावा लागला. नंतर ते स्वराज्य पक्षात गेले. सु. वीस वर्षे ते केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य होते. काही काळ त्यांनी केंद्रीय विधिमंडळातील स्वराज्य पक्षाचे सरचिटणीसपदही भूषविले. गोपबंधूंच्या मृत्युनंतर दोन वेळा ते ओरिसा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. भारत स्वतंत्र झाल्यावर ते ओरिसा विधिमंडळातील इंडिपेंडंट पीपल्स पार्टीचे नेते होते. १९५७ मध्ये ते विधिमंडळाचे अध्यक्ष निवडले गेले.
नीलकंठ दास एक अष्टपैलू विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी विपुल गद्य व पद्यलेखन केले असून त्यांचे आत्मजीवनी (आत्मचरित्र), भक्तिगाथा (काव्य, १९३५), प्रणयिनी (टेनिसनच्या द प्रिन्सेसचा काव्यानुवाद, १९१९), कोणारके (काव्य, १९१९), खारवेल (काव्य, १९२१), दास नायक (टेनिसनच्या ईनक आर्डनचा काव्यानुवाद, १९२४), पिलांक गीता, पिलांक रामायण (१९२३), पिलांक महाभारत (१९२४), पिलांक भागवत, संस्कृत ओ संस्कृति (व्याख्याने, १९५१), ओरिया व्याकरण, ओडिया साहित्यर कर्मपरिणाम (साहित्येतिहास, १९४८) इ. ग्रंथ विशेष महत्त्वाचे होत. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, पुरातत्त्वविद्या, भाषाशास्त्र इ. विविध विषयांचा त्यांचा सखोल व्यासंग होता. स्वातंत्र्योत्तर काळात ते ओरिसा साहित्य अकादेमीचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी लिहिलेल्या आत्मजीवनी ह्या आत्मचरित्रास १९६४ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कारही लाभला. भगवद्गीतेवर त्यांनी लिहिलेले ओडिया भाष्य हे प्राचीन भारतीय संस्कृतीवरील त्यांच्या सखोल व्यासंगाचे परिपक्व फल मानले जाते. ते एक पट्टीचे पत्रकार होते. त्यांनी नवभारत नावाचे साहित्यास वाहिलेले मासिक १९३३ ते ४५ पर्यंत चालविले. याच नावाच्या दैनिकाचेही ते संपादक होते. काही काळ ते समाज आणि सेवा ह्या नियतकालिकांचेही संपादक होते. उत्कल विद्यापीठ मंडळाचेही ते सदस्य होते व त्यांच्या शिफारशींवरून उत्कल विद्यापीठाची स्थापना झाली. १९५५ मध्ये ते विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू झाले. उत्कल विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. १९६० मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब मिळाला. आधुनिक ओरिसाचे एक शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं) सुर्वे, भा. ग. (म.)