दार्दिक भाषासमूह : इराणी भाषा व संस्कृतोद्भव भारतीय भाषा यांच्या दरम्यान पामीरच्या पठाराला लागून काही संक्रमक स्वरूपाच्या भाषा आहेत. त्या इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत, की इतर संस्कृतोद्भव बोलींच्या वर्गात त्यांचा समावेश करणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. त्यांनाच ‘दार्दिक भाषा’ हे नाव आहे.
इंडो–यूरोपियन भाषाकुटुंबाच्या आर्यन गटाच्या तीन शाखा पाडण्यात येतात. पश्चिमेकडील इराणी शाखा, पूर्वेच्या बाजूला उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात इराणी बोलींचा प्रदेश जिथे संपतो तिथून काश्मीरपर्यंत पसरलेली दार्दिक किंवा पैशाची शाखा व भारताच्या उरलेल्या भागात आढळणाऱ्या इंडो-आर्यन भाषा.
वर्गीकरण : दार्दिक बोलींचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात येते : (१) काफीर गट: यात दोन उपगट आहेत. पहिल्यात बशगली, वाइआला, वासिवेरू अथवा वेरोन व अशकुंद यांचा समावेश होतो. दुसऱ्या उपगटाला ‘कालाशाप शाइ’ हे नाव असून त्यात कालाशा, गवार बाशी अथवा नर्साती, पशाइ अथवा लागमनी अथवा देहगनी, पूर्वेकडील बोली, पश्चिमेकडील बोली, दिरी व तिराही या बोली येतात. (२) खोवार गट : यात खोवार चित्राली अथवा अर्निया येतात. (३) दार्द गट : यात तीन उपगट आहेत. पहिल्यात शिना, अस्तोरी, चिलासी, गुरेझी, द्रास बोली, दाह हनूची ब्रोक्पा व वायव्येकडील बोली येतात. दुसऱ्या उपगटात दार्दिकमधील एकमेव साहित्यिक भाषा प्रमाण काश्मीरी, काश्तवारी आणि ज्यांचे स्वरूप अजून स्पष्ट झालेले नाही अशा काही मिश्र बोली आहेत. तिसऱ्या उपगटात कोहिस्तानी, गार्वी अथवा बाशघरीक आणि तोर्वाली अथवा तोर्वालाक मय्या या येतात.
भाषिक स्थान : या बोलींवरील इराणीचा व काश्मीर प्रदेशात दिसून येणारा संस्कृतचा प्रभाव लक्षात घेऊनही आजपर्यंत झालेल्या अभ्यासाच्या आधारे दार्दिक बोली या भारतीयच आहेत, असे निश्चितपणे म्हणता येते. फक्त त्यांच्या उत्क्रांतीत प्राकृत ही अवस्था आलेली दिसत नाही. अनेक संयुक्त व्यंजने व स्वरमध्यस्थ स्फोटक या बोलीत टिकून राहिलेले आढळतात. महाप्राण स्फोटकांच्या जागी या बोलीत घर्षक ध्वनी दिसून येतात.
या भाषासमूहातील फक्त काफीर हा गटच वादग्रस्त आहे, कारण त्यातील कंठ्य व्यंजनांच्या उत्क्रांतीचे इराणीशी अतिशय साम्य आहे.
संदर्भ : 1. Bloch, Jules, L’indo–aryen du veda aux temps moderns, Paris, 1934.
2. Government of India, Census of India, 1961, Vol. I, Part II-C (ii) Language Tables, Delhi, 1964.
कालेलकर, ना. गो.