दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६,२९६ (१९७१). हे समुद्रकिनाऱ्यापासून ८ किमी. आत हर्णेच्या आग्नेयीस १३ किमी. व खेडच्या वायव्येस २७ किमी. वर वसले असून याच्या आग्नेयीस १६० किमी. वर असलेले कराड हे यास जवळचे रेल्वेस्थानक आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असूनही येथील हवा आरोग्यदायक व थंड आहे. यामुळेच ब्रिटिश लोकांनी आपले सैन्य अठराव्या शतकात येथे ठेवले होते. येथील थंड हवेमुळे रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे ओळखले जाते.१८१८–५७ पर्यंत दापोली हे दक्षिण कोकणातील लष्करी ठाणे होते. १८८० मध्ये नगरपालिकेची स्थापना केली होती परंतु ती रद्द करून सध्या विशेष समितीद्वारे शहराचा कारभार चालतो. येथे जाडेभरडे कापड विणले जाते तसेच मातीची भांडी तयार केली जातात. पूर्वी येथे ख्रिस्ती वस्ती होती. त्यांचे रोमन कॅथलिक चर्च आजही येथे पहावयास मिळते. येथे प्राथमिक, माध्यमिक शाळा, प्रशिक्षण महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, फल संशोधन केंद्र, ग्रंथालय, दवाखाने, बँका, विश्रांतीगृह इ. सोयी आहेत. १८ मे १९७२ रोजी कोंकण कृषी विद्यापीठाची येथे स्थापना झाली.
पाठक, सु. पुं.