दा नांग : मध्य व्हिएटनाममधील एक प्रसिद्ध बंदर. लोकसंख्या ४,५८,००० (१९७२). हे सखल प्रदेशात ह्युए शहराच्या आग्नेयीस ८० किमी. आहे. सोळाव्या शतकापासून हे चिनी, जपानी आणि यूरोपीय व्यापाऱ्यांचे व मिशनऱ्यांचे प्रवेशद्वार होते. १८५८ मध्ये हे फ्रेंचांनी जिंकले. त्यांच्या अंमलात याला तूरान म्हणत.
व्हिएटनामच्या १९५४ च्या फाळणीमुळे याचे महत्त्व अधिकच वाढले. १९६५ च्या व्हिएटनाम युद्धाच्या वेळी येथे अमेरिकेचा मुख्य नाविकतळ होता. त्यामुळे बंदराचा पुष्कळच विकास झाला. येथे मोठा विमानतळही आहे. येथे साबण, सुती व रेशमी कापड इ. उद्योग असून तांत्रिक शाळा, दवाखाना इत्यादींच्या सोयी आहेत. हे सायगावशी महामार्गाने व लोहमार्गाने जोडलेले आहे. चॅम वस्तुसंग्रहालय, चॅम हस्तकला व शहराच्या सभोवती असलेल्या गुहांतील बुद्धाचे पुतळे ही दा नांगची सांस्कृतिक आकर्षणे आहेत.
कांबळे, य. रा.