दात : मुखातील कठीण व सामान्यतः अन्नाच्या चर्वणास उपयोगी पडणाऱ्या भागास दात म्हणतात. अन्न किंवा भक्ष्य पकडणे, पकडलेले सुटू न देणे अन्न चावणे, कापणे, त्याचे पेषण करणे (खलून बारीक करणे) इ. अन्नविषयक मूलभूत कार्ये दात करीत असले, तरी त्यांचे काही दुय्यम उपयोगही आढळतात. उदा., स्वसंरक्षणासाठी आक्रमण किंवा बचावाचे साधन म्हणून, तर माणसात दंत्य (त वर्णाच्या) अक्षरांच्या उच्चारास मदत म्हणून, तसेच पिलास अंडे फोडून बाहेर येण्यास मदत म्हणून असे दातांचे विविध उपयोग संभवतात.

काही प्रगत अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांत) आणि बहुतेक सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत दात जरी आढळत असले, तरी दोहोंत खूपच फरक असतो म्हणूनच रचना आणि कार्यानुसार विविधता वगैरे गोष्टींमुळे दात ही संज्ञा प्रामुख्याने पृष्ठवंशीयांत वापरली जाते. दातांचे विशेष महत्त्व प्रगत सस्तन प्राण्यांत आढळून येते.

आ. १. अपृष्ठवंशीयांतील दात : (अ) जळूचा जबडा (आ) झुरळाचा जंभ (इ) ॲरिस्टॉटल कंदिलाचा एक भाग : (१) दात.

अपृष्ठवंशीयांतील दात : हे कायटिनी [उदा., जळू, झुरळ (आ. १ अ, आ), शंखाची गोगलगाय] किंवा कॅल्शियमी [उदा., सी अर्चिनाच्या ॲरिस्टॉटल कंदिलाचे–दातांना आधार देणाऱ्या स्नायू व अस्थिका यांनी बनलेल्या रचनेचे–दात (आ. १ इ )] असतात. त्यांचा उपयोग अन्नाच्या चर्वणासाठी व पेषणासाठी केला जातो.

पृष्ठवंशीयांतील दात : हे अतिशय कठीण, कॅल्शियमी किंवा शृंगमय (शिंगात आढळणाऱ्या पदार्थाने युक्त) असून उपास्थी किंवा अस्थींच्या सांगाड्यास जोडलेले असतात. सर्वसाधारणपणे हन्वस्थींपैकी (जबड्याच्या हाडांपैकी) जंभिका व जंभ ह्या हाडांस दात जोडलेले असले तरी प्रजंभिका, हलास्थी इ. हाडांसही काही प्राण्यांत (उदा., बेडूक) दात जोडलेले असतात. काही माशांत तर क्लोम–चापावरही (घशातील कल्ल्यांच्या कमानीवरही) दात असतात.

रचना व विकास : दाताचे दंतवल्क (एनॅमल), दंतिन (डेंटीन), संधानक (सिमेंट) व दंतगर हे प्रमुख विभाग होत. भ्रूणवैज्ञानिक उत्पत्ती पाहता ह्या भागांपैकी फक्त दंतवल्क बाह्यस्तरापासून व बाकीचे मध्यस्तरापासून निर्माण होतात (दाताचे विभाग, त्यांतील घटकद्रव्ये, रचना व उत्पत्ती यांसंबंधी मानवी दाताच्या संदर्भात विस्तारपूर्वक वर्णन पुढे दिलेले आहे).

दाताच्या विकासाच्या काही पायऱ्या असून त्या गुंतागुंतीच्या आहेत. सारांशाने असे म्हणता येईल की, मुखपथ बाह्यस्तरापासून (मुखउपकलेपासून) निर्माण होणारे दंतवल्क इंद्रिय व मध्यस्तरापासून निर्माण होणारे दंत अंकुरक ह्यांच्यातील अन्योन्य क्रियेतून दंतकलिका तयार होते. तिचा विकास होऊन हिरडी कापून शेवटी दंतस्फुटन (दात बाहेर येण्याची क्रिया) होते. अशा रीतीने विकास पावलेल्या दाताचे तीन भाग पडतात. मुखात हिरडीवर दिसणाऱ्या भागास शिखर किंवा माथा म्हणतात. दंतमूलाभोवती असलेल्या तंतुमय परिदंतकलेने दात हन्वस्थीशी जोडलेला असतो. दोहोंच्या मध्ये हिरडीने वेढलेल्या भागास ग्रीवा किंवा मान म्हणतात.

स्तनी प्राणी व सुसर–मगर वगळता इतर पृष्ठवंशीय प्राण्यांत दंतविकासात काही महत्वाचे फरक आढळतात. उदा., अशा प्राण्यांत (अ–स्तनी प्राण्यांत) दात अस्थिकूपिकेत (हाडांच्या खोबणीत) नसून दंतमूल व परिदंतकलेचा प्रभाव असतो, तसेच त्यात दंतवल्कनापासून तयार झालेला कठीण असा भाग (व्हिट्रोडेंटीन) असतो.


 आ. २. बुडाशी जोडलेल्या पद्धतीनुसार दातांचे प्रकार : (अ) ॲक्रोडोंट (आ) प्ल्यूरोडोंट (इ) थीकोडोंट.प्रकार : दात बुडाशी कसे जोडले गेले आहेत ह्यावरून त्यांचे तीन प्रकार पडतात. ॲक्रोडोंट (आ. २ अ) : ह्यात दात तळाच्या हाडास फक्त बुडानेच जोडलेला असतो. बरेच मासे आणि बेडूक इ. उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गात हा प्रकार आढळतो. प्ल्यूरोडोंट (आ. २ आ) : ह्यात दात बुडाखेरीज हाडाच्या आतील बाजूंसही जोडलेला असतो. उभयचर प्राण्यांपैकी काही (उदा., नेक्ट्यूरस) व बहुतेक सरड्यांत (नेहमीच्या बागेतील सरड्यात ॲक्रोडोंट प्रकार आढळतो) आणि घोरपडीत हा प्रकार आढळतो. ह्या दोन्ही प्रकारांत दातास मूळ नसल्याने रक्तवाहिन्या, तंत्रिका (मज्जा) दंतगरात विशिष्ट छिद्रातून न जाता बुडातून किंवा बाजूने शिरतात. थीकोडोंट (आ. २ इ) : हा सर्वात प्रगत असा प्रकार असून ह्यात दाताचे मूळ (दंतमूल) अस्थिकूपिकेत मजबूत रीतीने बसविलेले असते. मुळाच्या टोकाशी असलेल्या छिद्रातून वाहिन्या, तंत्रिका आत शिरतात. काही सरीसृपांत सरपटणाऱ्या प्राण्यांत –(उदा., सुसर, मगर) हा प्रकार आढळत असला, तरी तो स्तनी प्राण्यांचेच वैशिष्ट्य होय.

दातांचे पुनःस्थापनेनुसार (जुन्या दातांच्या ठिकाणी नवीन येणे किंवा क्रम यानुसार) काही प्रकार पडतात. मुशी (शार्क) वगैरे उपास्थिमिनांत (ज्यांचा सांगाडा कूर्चांचा बनलेला आहे अशा माशांत) दात सारखे पुनःस्थापित होत असतात. ह्याला पॉलिफिओडोंट प्रकार म्हणतात व त्यात काही तरंगक्रम आढळतो. हा प्रकार स्तनी प्राण्यांखेरीज बहुतेक पृष्ठवंशीयांत आढळतो. अशा बहुतेक प्राण्यांत वाढ एकसारखी होत असल्याने दात सारखे पुनःस्थापित होणे आवश्यक ठरते. यावरून दातांचे पुनःस्थापन हे त्यांच्या झीजेपेक्षा प्राण्यांत होणाऱ्या वाढीचा परिणाम मानले जाते. बहुतेक स्तनी प्राण्यांत डायफिओडोंट प्रकार आढळतो. ह्यात दातांचा दोनदा उद्‌भव होतो. पहिल्या संचास दुधाचे दात म्हणतात. कालांतराने ते पडतात व त्या जागी दुसरा, अखेरीचा व कायम दातांचा संच येतो. चर्वणपद्धती, चर्वणास उपयोगी पडणारे स्नायू, जबड्यातील बदल इ. अनेक कारणांमुळे डायफिओडोंट प्रकार जैव क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने प्रगत प्रकार ठरतो. काही स्तनी प्राण्यांत (उदा., शिशुधान–मादीच्या उदरावर पिलू ठेवण्यासाठी पिशवी असलेले–प्राणी, मोलसारखे कीटकभक्षी गणातील प्राणी, काही कृंतक–कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या–गणातील प्राणी) दात एकदाच येतात, ह्याला मोनोफिओडोंट प्रकार म्हणतात (उदा., उंदीर). काहीत (उदा., माणूस) सर्व दातांचे पुनःस्थापन होतेच असे नाही. माणसात खालच्या आणि वरच्या जबड्याच्या प्रत्येक बाजूच्या शेवटचे तीन दात (दाढा) पहिल्यांदा (दुधाच्या) आले की, कायम राहतात. तर ह्या प्रत्येक तीन दाढांतील शेवटची दुधाची दाढ (किंवा अक्कलदाढ) वयाच्या १७-२० वर्षांपर्यंत हिरडी कापून बाहेरच पडत नाही.

आकारानुसार दातांचे दोन प्रमुख गट पडतात. समदंत व विषम किंवा असमदंत. स्तनी प्राणी सोडून बहुतेक सर्व पृष्ठवंशीय समदंती असतात. कित्येक अप्रगत जलचर प्राण्यांत हीच अवस्था असते. असे दात सामान्यतः शंक्वाकृती व अणकुचिदार असतात आणि कित्येकदा थोडे वक्राकार असतात. अशा प्राण्यांत (विशेषतः जलचरांत) अन्नाचे चर्वण न होता ते बहुधा आहे त्या स्थितीत गिळले जाते म्हणून हे दात अन्न (भक्ष्य) चावण्यापेक्षा ते पकडून ठेवण्यासाठी व निसटून जाऊ नये ह्यासाठीच वापरले जातात.

असमदंती अवस्था ही सामान्यतः स्तनी प्राण्यांत आढळते. ह्या प्रगत अवस्थेत दातांचे विविध संच (गट) व कार्यानुसार आकार आढळतात. ह्याचे चार प्रकार पडतात. कृंतक दात : हे खुडणे, पकडून ठेवणे व छिलणे ह्यांसाठी वापरले जातात. सुळे : हे टोचणे, भोसकणे ह्यांसाठी वापरले जातात. उपदाढा : पकडणे, तुकडा पाडणे, काप पाडणे व दाढांस मदत करणे हे उपदाढांचे कार्य होय. दाढा : तोडणे, चर्वण करणे, पेषण हे दाढांचे प्रमुख कार्य होय. ह्या कार्यांच्या दृष्टीने दातांच्या माथ्यात फरक झालेला आढळतो. कृंतकाचा माथा पसरट, पटाशीसारखा, सुळ्याचा टोकदार तर उपदाढा व दाढांचा मोठा व पसरट असतो आणि त्याचा मधला भाग खोलगट असून बाजूस ३ ते ५ उंचवटे (दंताग्रे) असतात. दाढांना व उपदाढांना दोनतीन मुळे असतात. स्तनी प्राण्यात असमदंत अवस्था व दातांची निश्चित संख्या असल्याने त्यांची माहिती सूत्ररूपाने देण्याची पद्धत आहे, ह्यास दंत्यसूत्र म्हणतात. सूत्रात दंतप्रकाराचे आद्याक्षर आणि त्यानंतर वरील व खालील जबड्याच्या अर्धभागातील त्याची संख्या देऊन शेवटी एकूण सर्व दातांची संख्या दिली जाते. एखाद्या दंतप्रकाराचा जिथे अभाव असेल तिथे शून्य लिहिले जाते. उदा.,

उंदीर   कृं १/१,   सु ०/०,   उदा ०/०,   दा ३/३   =   १६

मांजर   कृं ३/३,   सु १/१,   उदा ३/२,   दा १/१   =   ३०

माणूस   कृं २/२,   सु १/१,   उदा २/२,   दा ३/३  =   ३२


 आ. ३. पेट्रोमायझॉन : (१) दात

दातांच्या अभ्यासाचे महत्त्व : प्राण्यांच्या अभ्यासात दातांची माहिती क्रमविकास, जातिविकास आणि वर्गीकरण या संदर्भात फार उपयोगी ठरते. तसेच दंतवल्क हा अतिशय कठीण भाग असल्याने जीवाश्मांत (अश्मीभूत अवशेषांत) दात उत्तम रीतीने टिकून राहतात व त्याने तत्कालीन प्राण्याची अन्नपद्धती, वर्गीकरणातील आणि जातिविकासातील त्याचे स्थान समजण्यास खूप मदत होते. दातांची उत्पत्ती पुरातन जंभहीन माशासारख्या दिसणाऱ्या पृष्ठवंशीयांत अंगाच्या बाह्यबाजूस संरक्षणासाठी निर्माण झालेल्या अस्थि–गुलिकांपासून (गाठींपासून) झाली, असे मानले जाते आणि मुशीसारख्या माशातील दात व प्लॅकॉइड खवले ह्यांच्या वाढीच्या अभ्यासात त्यास बराच दुजोरा मिळतो. असे असले तरी आणि दात जबड्याच्या हाडांशी जोडलेले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची उत्पत्ती पचन तंत्राच्या (पचनसंस्थेच्या) मुखपथाचा भाग म्हणूनच होते, असे बहुतेक प्राण्यांच्या अभ्यासावरून दिसून येते.

आ. ४. सरड्याच्या मिटलेल्या जबड्यातील दातांची रचना : (१) दात.

पृष्ठवंशीयांत कार्यानुसार व क्रमविकासानुसार दातात अनेक बदल झालेले आढळतात. पेट्रोमायझॉनसारख्या (आ. ३) जंभहीन प्राण्यात लहानलहान अनेक शंक्वाकृती आणि संपूर्णतया बाह्यस्तरापासून बनलेले शृंगमय दात असतात. बहुतेक माशांत किंचित लांब दात व मुखात आतील बाजूस वक्र झालेले व टोकदार दात ग्रसनीत (घशात) असतात. त्यांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी व ते काही झाले तरी निसटू नये म्हणून होतो. उभयचरांपैकी बेडकात वरच्या जबड्यात लहान शंक्वाकृती दात असतात पण भेकात दातच नसतात. सरीसृपात कासवांमध्ये दात नसतात पण श्रृंगमय, कठीण चोच असते. सरड्यामध्ये (आ. ४) लहानमोठे शंक्वाकृती दात असतात. जबडे मिटले असता वरचे व खालचे दात एकाआड एक बरोबर बसतात. हातांची बोटे एकमेकांत गुंतवून मुठी मिटल्या असता बोटे बाहेरच्या बाजूस जशी एकमेकांत गच्च अडकलेली दिसतात तशीच वरील रचना होते. त्यामुळे भक्ष्य सुटून जाऊ शकत तर नाहीच पण जबड्यांच्या झटकन व बरेचदा झालेल्या उघडझापीने त्याचे तुकडे होऊन गिळणे सोपे होते. सापात दोन्ही जबड्यांत काहीसे मोठे, वक्र व टोकदार दात असतात. विषारी व बिनविषारी सापांतील हे दात भरीव असून भक्ष्य पकडून ठेवण्यास मदत करतात. विषारी सापात वरच्या जबड्यात एक किंवा दोन विषदंत असतात (आ. ५). ते अत्यंत टोकदार आणि पोकळ असून विषग्रंथीतून आलेले विष त्यांमार्फत अन्य प्राण्याच्या शरीरात टोचले जाते. ⇨ ऑर्किऑप्टेरिक्ससारख्या जीवाश्मीभूत पक्ष्यात दात होते, तरी आधुनिक सर्व पक्ष्यांत दातांचा अभाव असून कठीण चोच असते. सरीसृप व पक्ष्यांत पिल्लाच्या तोंडाच्या टोकाशी लहानसा दात येतो. त्याने पिलू अंडे फोडून बाहेर येऊ शकते, त्यास अंडदंत म्हणतात.

आ. ५. मंडली सर्पाचे (व्हायपरचे) दात : (१) साधे दात, (२) विषदत.

स्तनी प्राण्यात दात नुसते असमदंती असतात असे नाही, तर त्यांत अन्नपद्धती आणि कार्यानुसार निरनिराळे परिवर्तन (रूपांतर) झालेले आढळते. उदा., घोडा, गेंडा, ससा इ. शाकाहारी प्राण्यांत दंतवल्काच्या वळ्यांमध्ये संधानक असते. त्यामुळे दातास अधिक बळकटी येते. कुत्रा, वाघ, सिंह वगैरे मांसाहारी प्राण्यांत भक्ष्याची चिरफाड करून मांस तोडून काढण्यासाठी दात बरेच टोकदार असतात.

तसेच वरच्या जबड्यातील चौथ्या क्रमांकाच्या उपदाढांची आणि खालच्या जबड्यातील पहिल्या क्रमांकाच्या दाढांची विशेष वाढ झालेली असते, त्यांस कार्नाझिअल दात म्हणतात. उंदीर, ससे इ. कृंतक गणातील प्राण्यांत कृंतक दातांच्या मुळाचे छिद्र उघडे असल्याने सतत वाढ होत असते. अन्न कुरतडून खाण्यासाठी ह्या पटाशीसारखा माथा असलेल्या दातांचे खास रूपांतरण झालेले असते. अशा प्राण्यांत (उदा., उंदीर) सुळे व उपदाढांचा अभाव असतो. त्यामुळे जबड्यात रिकामी जागा असते त्यास दंतावकाश (डायास्टेमा) असे म्हणतात (आ. ६) वाढ झालेली असते, तर वरच्या जबड्यातील कृंतक दातांची अतिशय वाढ होऊन मोठे सुळके होतात.


 आ. ६. उंदरातील दंतावकाश : (१) कृंतक दात, (२) दंतावकाश, (३) दाढा.हत्ती आणि वॉलरसमध्ये नर व मादीत सुळके असतात. वॉलरस बर्फावर सुळके रोवून आपले निसरडे अंग खेचून घेऊ शकतो पण वॉलरस मधील सुळके सुळ्यांच्या रूपांतरणाने झालेले असतात. नर रानडुकरात सुळ्यापासून सुळके तयार झालेले असतात. अशा रीतीने स्तनी प्राण्यांत रचना व कार्यानुसार दातांत विविधता आढळते.

परांजपे, स. य.

मानवी दात 

मानवात तोंडातील खालच्या आणि वरच्या जबड्यांच्या हाडांच्या खोबणीतून दात घट्ट बसविलेले असतात. मानवामध्ये सर्वसाधारणपणे २८ ते ३२ दात असतात. अन्नाचे चर्वण करून ते पचन सुलभ बनविणे हे दातांचे मुख्य कार्य असते. चेहऱ्याच्या सौंदर्यात दातांचा विशेषेकरून समोरच्या दातांचा आकार, रंग व ठेवण यांचा महत्वाचा भाग आहे. दातांमुळे स्पष्ट शब्दोच्चारास मदत होते.

आ. ७. दोन्ही जबड्यांतील अर्ध्या उजब्या बाजूचे कायमचे दात (गालाकडची बाजू) : (अ) वरचे दात (आ) खालचे दात.

मानवात दात दोनदा येतात. पहिले किंवा दुधाचे दात वयाच्या सातव्या ते आठव्या महिन्यापासून सुरुवात होऊन २·५ ते ३ वर्षापर्यंत सर्व येतात. त्यांची एकूण संख्या वीस असते. वयाच्या सातव्या ते अकराव्या वर्षांपर्यंत दुधाचे दात क्रमाने पडतात व त्या जागी जे नवे दात येतात त्यांना कायमचे दात म्हणतात. याशिवाय दुधाच्या दातांच्या मागे सहाव्या वर्षी एक आणि बाराव्या वर्षी एक अशा दोन दाढा प्रत्येक बाजूस येतात. त्या एकदाच येतात व कायम दातांपैकी असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या तोंडात बाराव्या वर्षी एकूण २८ दात असतात.आ. ८. वरच्या जबड्यातील कायम दातांची रचना

अठराव्या वर्षी किंवा त्यानंतर वरच्या आणि खालच्या जबड्यात दोन्ही बाजूंस एक एक अशा एकूण चार दाढा येतात, त्यांना अक्कलदाढा म्हणतात. या चार दाढांपैकी एखादी किंवा कधीकधी चारही अजिबात येत नाहीत म्हणून कायम दातांच्या एकूण संख्येचा उल्लेख २८ ते ३२ असा करतात. बहुतकरून ती ३२ असल्यामुळे दातांचा उल्लेख ‘बत्तीशी’ असा करतात.

दातांचे आकार कार्यपरत्वे निरनिराळे आहेत. त्यांच्या शिखरांच्या आकारावरून त्यांचे चार वर्ग केले आहेत. (१) कृंतक किंवा छेदक: तोंडात अगदी समोर प्रत्येक जबड्यात दोन्ही बाजूंस मिळून एकूण चार कृंतक दात असतात व दोन्ही जबड्यांत मिळून आठ असतात. त्यांची शिखरे पटाशीसारखी असून चर्वणपृष्ठभाग धारदार असतो. ते अन्नपदार्थांचे तुकडे करण्याचे कार्य करतात. (२) सुळे : दोन कृंतकांच्या लगेच मागे दोन्ही जबड्यांत मिळून एकूण चार सुळे असतात. त्यांच्या शिखरांचा आकार शंक्वाकार असून टोक अणकुचीदार असते.त्यामुळे अन्नपदार्थास भोक पडू शकते. (३) पुढच्या दाढा किंवा उपदाढा : शिखरावर दोन दंताग्रे असल्यामुळे याच दातांना अमेरिकेत द्वि–दंताग्रयुक्त दात (बायकस्पिड) म्हणतात. सुळ्यांच्या मागे प्रत्येक बाजूस दोन दोन मिळून दोन्ही जबडे मिळून एकूण आठ पुढच्या दाढा असतात. पुढच्या दाढांपैकी क्रमांक दोनच्या दाढा २% माणसांत जन्मजात अजिबात नसतात. (४) चर्वणक किंवा मुख्य दाढा: पुढच्या क्रमांक दोनच्या दाढेमागे प्रत्येक बाजूस एकामागे एक तीन दाढा असतात. त्यांचा चर्वणपृष्ठभाग चार किंवा पाच दंताग्रांचा मिळून बनलेला असतो. प्रत्येक बाजूस पुढून मागे या तीन दाढा आकाराने लहान होत जातात. त्यांना अनुक्रमे पहिली, दुसरी आणि तिसरी दाढ असेही म्हणतात. चर्वणकांची एकूण संख्या बारा असते.


 दुधाचे दात एकूण वीस असतात आणि ते वरच्या जबड्यात व खालच्या जबड्यात मिळून सारखे विभागलेले असतात. त्यांची घडण कायमच्या दातांपेक्षा नाजुक असून रचना कमानीसारखीच असते. त्यांचा आकार सर्वच बाजूंनी लहान असतो. दंतमूल आणि शिखर ज्या ठिकाणी मिळतात तो भाग म्हणजे दंतग्रीवा अधिक स्पष्ट असते. त्यांचे दंतवल्क अधिक शुभ्र असते. दाढांची दंतमूले एकमेकांपासून अधिक फाकलेली असतात. त्यामुळे त्यांच्याखालील कायम दातांच्या शिखरांना वर येण्यास जागा मिळते. दुधाच्या दातांची दंतमूले अस्थिभंजक कोशिकांकडून सतत हळूहळू अवेशोषिली जात असतात, म्हणूनच काढलेल्या दुधाच्या दाताची दंतमूले नेहमी आखूड आढळतात.

पुढील कोष्टकात प्रत्येक दात येण्याचे सर्वसाधारण वय दर्शविले आहे.

प्रत्येक दात येण्याचे सर्वसाधारण वय 

 

दुधाचे 

कायमचे 

वरचे दात 

मध्यवर्ती कृतंक किंवा छेदक 

पार्श्व कृतंक किंवा छेदक 

सुळे 

पहिली पुढची दाढ 

दुसरी पुढची दाढ 

पहिली मागची दाढ 

दुसरी मागची दाढ 

तिसरी मागची दाढ 

खालचे दात 

मध्यवर्ती कृतंक 

पार्श्व कृतंक 

सुळे 

पहिली पुढची दाढ 

दुसरी पुढची दाढ 

पहिली मागची दाढ 

दुसरी मागची दाढ 

तिसरी मागची दाढ

६ ते ८ महिने 

८ ते १० महिने 

१६ ते २० महिने 

– 

– 

१२ ते १६ महिने 

२० ते ३० महिने 

– 

 ६ महिने 

६ ते ७ महिने 

१४ते १६ महिने 

– 

– 

१० ते १२ महिने 

१६ ते २० महिने 

– 

 ६ ते ८ वर्षे 

७ ते ९ वर्षे 

९ ते १२ वर्षे 

१० ते १२ वर्षे 

१० ते १२ वर्षे 

६ ते ७ वर्षे 

१२ ते १३ वर्षे 

१७ ते २१ वर्षे 

 ६ ते ७ वर्षे 

७ ते ८ वर्षे 

९ ते १० वर्षे 

१० ते १२ वर्षे 

११ ते १२ वर्षे 

६ ते ७ वर्षे 

१२ ते १३ वर्षे 

१७ ते २१ वर्षे


आ. ९. खालच्या जबड्यातील कायम दातांची रचना

 वरचा व खालचा जबडा एकमेकांजवळ येतात तेव्हा वरच्या आणि खालच्या दंतकमानीतील दातांचे चर्वणपृष्ठभाग शक्य तेवढे जवळ येऊन अधिकांश दंताग्रांचे मीलन होण्याची व्यवस्था दंतरचनेत असते. या नैसर्गिक मीलनात खालचे कृंतक दात वरच्या कृंतक दातांच्या जिभेकडील पृष्ठभागावर टेकतात. म्हणजेच वरचे कृंतक दात खालच्या कृंतक दातांच्या शिखराचा १/3 भाग आपल्या मागे झाकतात. दात वेडेवाकडे आल्यास अथवा जबड्याच्या हाडात विकृती असल्यास चर्वणपृष्ठभागाचे नीट मीलन होत नाही व चर्वण दोष उत्पन्न होतात [⟶दंतवैद्यक]. दोन जवळच्या दातांची दंतमूले एकमेकांपासून लांब असली, तरी त्यांची शिखरे एकमेकांस स्पर्श करतात.

आ. १०. सहा वर्षांच्या मुलाच्या जबड्यातील दात कायमचे दात निराळे (त्यांवरील ठिपक्यांच्या साहाय्याने) दाखविले आहेत.

दंतशिखरांच्या या स्पर्श स्थानांना ‘स्पर्शबिंदू’ म्हणतात. दातांच्या शिखरांचा आकार व घाट आनुवंशिक आणि पूर्वनियोजित असतो. दात वाकडेतिकडे येण्याचे प्रमुख कारण जबड्यांच्या हाडांची अपूर्ण वाढ हे असते. हा दोष वरकरणी चांगल्या दिसणाऱ्या जबड्यातही असतो. हाडांची योग्य वाढ होण्याकरिता अनेक गोष्टींची मदत होते. अगदी स्तनपानापासूनच जबड्याची योग्य हालचाल, चूषणक्रियेकरिता (चोखण्याच्या क्रियेकरिता) लागणारी स्नायूंची हालचाल आणि नंतर प्रत्यक्ष चर्वणक्रिया करू लागल्यानंतर त्याकरिता लागणाऱ्या विशिष्ट स्नायूंची हालचाल जबड्याच्या हाडाच्या योग्य वाढीस मदत करतात.

आ. ११. चोखणीमुळे होणारे दुष्परिणाम : (१) मुलाचे वाकडेतिकडे दात (बाजूकडून), (२) वाकडेतिकडे दात (पुढून), (३) चांगले दात (वरच्या जबड्यातील), (४) वाकडेतिकडे दात (वरच्या जबड्यातील), (५) मुलाच्या वरच्या व खालच्या दातांमध्ये वाकडेतिकडेपणामुळे पडलेली फट.

मूल शांत रहावे म्हणून अनेकजण ‘चोखणी’ देतात परंतु ही सवय चांगली नसून सूक्ष्मजंतू संक्रामणासारख्या धोक्याबरोबरच जबड्यांच्या योग्य वाढीवर दुष्परिणाम होतो व शेवटी दात वाकडेतिकडे येतात.

स्थूल विभाग व सूक्ष्म रचना : प्रत्येक दाताचे दोन प्रमुख भाग असून त्यांना शिखर आणि दंतमूल म्हणतात. दोन्ही ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणाला दंतग्रीवा म्हणतात. दात प्रामुख्याने दंतिन नावाच्या कठीण पदार्थाचा बनलेला असतो. जवळजवळ हाडासारखेच असणारे हे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) ७०% अकार्बनी कॅल्शियम व फॉस्फरस (स्फटिकी हायड्रॉक्सी ॲपॅटाइट व अस्फटिकी कॅल्शियम फॉस्फेट) यांचे मिश्रण व ३०% पाणी आणि कार्बनी पदार्थ (बहुतांशी कोलॅजेन हे प्रथिन) यांपासून बनलेले असते. या ऊतकाला विपुल तंत्रिका पुरवठा असल्यामुळे ते अतिशय संवेदनशील असते.

आ. १२. दाताचे स्थूल विभाग व सूक्ष्म रचना : (१) शिखर, (२) दंतप्रीवा, (२) दतमूल, (४) दंतवल्क, (५) दंतिन, (६) दंतगर, (७) संधानक, (८) परिदंतकला, (९) जबड्याचे हाड, (१०) दंतमूलाच्या टोकातील छिद्र व त्यातून शिरणाऱ्या रक्तवाहिन्या आणि तंत्रिका.

शिखराकडील दंतिनावर शरीरातील सर्वात कठीण पदार्थाचे कवच असते. त्याला दंतवल्क म्हणतात व त्याच्या थराची जाडी १·५ मिमी. असते. त्यामध्ये तंत्रिका किंवा रक्तवाहिन्या नसतात व त्याचे पोषण दंतिनापासून होते. दंतवल्क ९६% खनिज लवणांचे (कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम फ्ल्युओराइड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम फॉस्फेट इ. लवणांचे) बनलेले असून त्याचे सूक्ष्म घटक षट्‌कोणी स्तंभाकार असून ते संधानकाने एकमेकांस घट्ट चिकटलेले असतात. दंताग्रावरील दंतवल्काच्या थराची जाडी २·५ मिमी. वाढलेली असते, तर दंतग्रीवेजवळची त्याची कड चाकूच्या धारेइतकी पातळ असते. दाताच्या मुळाकडील दंतिनावर पातळ पापुद्रेवजा असलेल्या आच्छादनाला ‘संधानक’ म्हणतात. त्याची सुरुवात दाताच्या ग्रीवेपासून होते व तेथे ते पातळ असले, तरी मुळाच्या टोकाकडे जाड होत जाते. हाडाच्या खाचेत दात घट्ट बसण्यास मदत करणाऱ्या या ऊतकात रक्तवाहिन्या नसतात. संधानकाबाहेर जो ऊतक भाग असतो त्याला परिदंतकला म्हणतात. हे ऊतक अप्रत्यास्थ (ताण दिला असता पुन्हा मूळच्या स्थितीत न येऊ शकणाऱ्या) तंतूंचे बनले असून हे तंतू संधानक व हाड यांना जोडतात. याशिवाय काही तंतू हिरड्यांशी व काही शेजारच्या मूळाशी जोडलेले असतात. परिदंतकलेमध्ये तंतूंशिवाय संयोजी (जोडणाऱ्या) ऊतक कोशिका (पेशी), अस्थिजनक कोशिका, संधानक जनक कोशिका, रक्तवाहिन्या आणि तंत्रिका तंतूही असतात. दाताचा उभा छेद घेतल्यास तो आरपार कठीण नसून आत सलग पोकळी असल्याचे दिसते. ही पोकळी मांसल व मऊ ऊतकाने भरलेली असून त्याला दंतगर आणि पोकळीला दंतगर पोकळी म्हणतात. दंतगर हा संयोजी ऊतक, जिलेटिनासारखा पदार्थ, रक्तवाहिन्या व तंत्रिका तंतू मिळून बनलेला असते. दंतगरात विपुल तंत्रिका तंतू असल्यामुळे तो अतिशय संवेदनाशील असतो. वाढत्या वयोमानाबरोबर दंतिनाच्या दुय्यम उत्पादनामुळे दंतगर पोकळी हळूहळू भरत जाते.


 रक्त व तंत्रिका पुरवठा : मानेत प्रत्येक बाजूस असणाऱ्या बाह्य ग्रीवा रोहिणीच्या शाखांपैकी उत्तर हनुरोहिणीची (वरच्या जबड्याच्या रोहिणीची) अधस्थ दंतरोहिणी खालच्या जबड्यातील दातांना रक्तपुरवठा करते. अतिसूक्ष्म दाताच्या मुळाशी असणाऱ्या छिद्रातून आत शिरून रक्त पुरवितात. उत्तर हनुरोहिणीच्या तिसऱ्या भागाच्या उपशाखा वरच्या जबड्यातील दातांना रक्तपुरवठा करतात. परिदंतबंधनामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळेच बनलेले असते. अशुद्ध रक्त नीलांद्वारे आनन (चेहऱ्याशी संबंधीत असलेल्या) नीलेत वाहून नेले जाते. दातांच्या लसीकावाहिन्यांच्या (ऊतकांतून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ नेणाऱ्या वाहिन्यांच्या) निश्चित क्षेत्रांची माहिती अजूनही खात्रीपूर्वक समजलेली नाही.

आ. १३. दंतविकारात होणाऱ्या अन्यत्र वेदना : (१) वरचे कृंतक दात, (२) वरचा सुळा आणि पहिली पुढची दाढ, (३) खालचे कृंतक दात, सुळा व पहिली पुढची दाढ, (४) तिसरी मागची दाढ, (५) खालची दुसरी पुढची आणि पहिली व दुसरी मागची दाट, (६) वरची दुसरी व तिसरी दाढ, (७) वरची दुसरी पुढची दाढ, (८) वरची दुसरी व पहिली मागची दाढ.

पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेच्या [त्रिमूल तंत्रिकेच्या ⟶तंत्रिका तंत्र] अधोहनु–तंत्रिका व उत्तरहनु–तंत्रिका अनुक्रमे खालच्या आणि वरच्या दातांना तंत्रिका पुरवठा करतात. किडक्या दातामुळे होणाऱ्या वेदना प्रत्यक्ष किडक्या दाताच्या जागी तर होतातच परंतु त्याशिवाय चेहऱ्याच्या काही भागावर व कानातही अन्यत्र वेदना होतात.

दंतशिखर व दंतमूल : प्रत्येक दंतशिखराला तीन पृष्ठभाग असतात : (१) गालाकडील (गालाशी सलग्न असणारा), (२) जिभेकडील (जीभ ज्यावरून सहज फिरते तो जिभेशी सलग्न असणारा) व (३) चर्वणशील (चर्वणोपयोगी किंवा विरुद्ध दाताशी संलग्न असणारा).

चर्वणशील पृष्ठभाग निरनिराळ्या आकारांचे असतात. कृंतक दातांचा हा भाग धारदार कडाच असते. त्यांचा आकारही पटाशीवजा असून अन्नाचे छोटे छोटे तुकडे पाडण्याकरिता या धारदार कडा उपयुक्त असतात. सुळ्यांचे शिखर जाड व शंक्वाकार असते. त्यांचा चर्वणशील कडेवर मध्यभागी बोथट टोक असते. चतुष्पाद प्राण्यांमध्ये अन्नपदार्थास भोक पाडून ते पकडण्यास सुळे उपयुक्त असतात. मानवात ते लहान होत चालले आहेत. पुढच्या दाढांना चर्वणपृष्ठभाग लांब व वर्तुळाकृती असून त्यावर उंचवटे आणि खड्डे असतात, या उंचवट्यांना दंताग्रे म्हणतात. मागच्या दाढांचा हा पृष्ठभाग साधारणपणे चौकोनी असून त्यावरही उंचवटे व खड्डे असतात. वरच्या व खालच्या दाढांच्या पृष्ठभागावरील या उंच सखल जागा एकमेकींस पूरक असल्यामुळे चर्वणास मदत होते.

आ. १४. भ्रूणातील वाढत्या दाताचे रेखाचित्र : (१) रक्तवाहिनी, (२) दंतवल्क, (३) तारकाकृती कोशिकाजाल, (४) दंतिनोत्पादक कोशिका, (५) दंतगर, (६) दंतमूलाच्छादन, (७) दंतगरावरील कोशिका, (८) दंतिन.

वरच्या जबड्यातील दाढांना तीन मुळे असतात, तर खालच्या जबड्यातील दाढांना दोन मुळे असतात. वरच्या जबड्यातील पहिल्या पुढच्या दाढेला बहुतेक दोन मुळे असतात. बाकीच्या सर्व दातांना एक एकच मूळ असते.

भ्रूणविज्ञान : (भ्रूणाची निर्मिती व त्याचा विकास यांचा अभ्यास करणारी विज्ञान शाखा). भ्रूणातील ज्या तीन थरांपासून सर्व अवयवांची वाढ होते. त्यांपैकी बाह्यस्तर व मध्यस्तर यांपासून दात तयार होतात. दंतवल्क तोंडातील उपकला कोशिकांपासून म्हणजे बाह्यस्तरापासून बनते व दाताचा बाकीचा भाग जबड्याच्या कोशिकांपासून म्हणजे मध्यस्तरापासून बनतो. गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यात तोंडातील दंतरेषेच्या स्थानातील उपकलेला घडी पडून ती जबड्याच्या अंतर्भागात शिरते, या घडीला दंतपट म्हणतात. या दंतपटावर दोन्ही जबड्यांत प्रत्येकी १० अंकुर फुटतात. त्यांचा आकार कळीसारखा असल्यामुळे त्यांना दंतकलिका म्हणतात. प्रत्येक कलिकेच्या समोरील जबड्याच्या भागातील कोशिका वाढून एक उंचवटा बनतो. हा उंचवटा वाढून दंतकलिकेवर टोपीसारखा पसरतो व दोन्ही मिळून ‘दंतबीज’ बनते. दहा दंतबीजांपासून दहा असे प्रत्येक जबड्यात दहा व दोन्ही जबड्यांत मिळून एकूण वीस दुधाचे दात तयार होतात. दुधाच्या दातांची बीजे तयार झाल्यानंतर त्यांच्याजवळच कायम दातांची बीजे, जिभेच्या बाजूकडे तयार होतात.


 कायम दातांपैकी पहिली मागची दाढ प्रथम तयार होते. तिचे बीज भ्रूणावस्थेच्या दहाव्या आठवड्यात, दुसऱ्या मागच्या दाढेचे जन्मानंतर चौथ्या महिन्यात व तिसऱ्या मागच्या दाढेचे बीज वयाच्या पाचव्या वर्षी तयार होते. मूल जन्मण्याच्या वेळी जबड्यात सर्व दुधाच्या दातांची बीजे व शिखरे तयार असतात आणि कायम पहिल्या मागच्या दाढेचे शिखर अर्धवट तयार असते. वयाच्या सहाव्या वर्षी सर्व कायम दातांची शिखरे तयार झालेली असतात. भ्रूणावस्थेत प्रत्येक दात एका पिशवीत ठेवल्यासारखा असून ही पिशवी अस्थिकूपिकेत ठेवलेली असते. ज्या कोशिकांपासून दंतवल्क बनते त्यांना दंतवल्क जनक कोशिका म्हणतात व ज्या कोशिकांपासून दंतिन बनते त्यांना दंतिनोत्पादक कोशिका म्हणतात.

आ. १५. हचिन्सन दात : कृंतक दातांच्या कडेची विशिष्ट रचना. रंग, आकार व संबंधित विकृती : दातांचा रंग व आकार अनेक प्रकारचे असू शकतात. त्यांचा रंग दंतवल्काच्या रंगावर तसेच त्याच्या पारदर्शकत्वावर अवलंबून असतो. दंतवल्कास तडे पडल्यास अन्नपदार्थातील रंग किंवा विडा खाण्याने तयार होणारे रंग अवशोषिले जाऊन दातांना रंग येतो. वरच्या दातांपेक्षा खालचे दात बहुधा फिक्कट असतात. शरीराच्या आकाराचा आणि दातांच्या आकाराचा परस्परांशी संबंध नसतो. दंतमूलांच्या लांबीवर टिकाऊपणा अवलंबून असतो. आखूड मुळे असलेले दात आघातामुळे लवकर पडतात.

आ. १६. मून दात : (अ) मून दात (आ) निरोगी दात.

मूल जन्मल्यापासून दात येण्याची क्रिया सतत चालू असते. २,००० मुलांमध्ये एखाद्याच मुलाचा दात जन्मतःच आलेला असतो. ज्यूलिअस सीझर, चौदावे लुई, नेपोलियन व तिसरे रिचर्ड यांच्या तोंडात असे दात आलेले होते. दात वाढणे प्रामुख्याने आनुवंशिकतेवर अवलंबून असते. मातेची प्रसवपूर्व परिस्थिती, पोषण आणि गंभीर आजारही परिणाम करतात. मुडदूस व जडवामनता [⟶ क्रेटिनिझम] यांसारख्या विकृतींमध्ये दात येण्याच्या क्रियेत बिघाड उत्पन्न होतो. अवटू ग्रंथिस्त्रावाच्या न्यूनतेसहित बहुतेक सर्व ⇨ अंतस्त्रावी ग्रंथींच्या विकारात दात उशीरा येणे, काही दात अजिबात न येणे, दुधाचे दात योग्य वेळी न पडणे इ. दोष उत्पन्न होतात

जन्मदात उपदंशामुळे (गरमीमुळे) होणाऱ्या दंतविकृतीला ‘हचिन्सन दात ’(जॉनाथन हचिन्सन या इंग्रज शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून) म्हणतात. वरच्या मध्यवर्ती कृंतक दातांमध्ये ही विकृती आढळते. नेहमीपेक्षा आकाराने लहान व वरून खाली म्हणजे कापावयाच्या कडेच्या बाजूस निमुळत्या होत जाणाऱ्या धारदार भागाच्या मध्यभागी खाच पडलेली आढळते. सहाव्या वर्षी येणाऱ्या पहिल्या दाढेतही फरक आढळतात. ती नेहमीपेक्षा लहान असून तिची शिखररचना बिघडलेली असते. या दाढांना ‘मून दात’ (हेन्री मून या इंग्रज शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून) म्हणतात.

दातांची रचना व व्यक्तीची ओळख : न्यायदंतवैद्यकाचा वैद्यकीय न्यायशास्त्राशी घनिष्ठ संबंध असतो. दंतवैद्याने ठेवलेल्या दंतविषयक नोंदीवरून पुष्कळ वेळा गुन्हेगाराची ओळख खात्रीपूर्वक पटवता येते. या नोंदी निरनिराळ्या पद्धतींनी ठेवल्या जातात. इंटरनॅशनल डेंटल फेडरेशनने पुढील प्रकारचा नोंदतक्ता सुचविला असून तो अनेक देशांतून उपयोगात आहे.

कायमचे दात :

१८ १७ १६ १५ १४ १३ १२ ११

२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ 

४८ ४७ ४६ ४५ ४४ ४३ ४२ ४१

३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८


 दुधाचे दात

५५ ५४ ५३ ५२ ५१   

६१ ६२ ६३ ६४ ६५   

८५ ८४ ८३ ८२ ८१ 

७१ ७२ ७३ ७४ ७५  

आ. १७. दातांच्या रचनेवरून (ठेवणीवरून) व्यक्तीची ओळख : मोठमोठ्या फटी असलेले दात.

वरील तक्त्यावर दंतवैद्य कोणता दात किडलेला आहे, भरलेला आहे, कशाने भरला आहे इ. नोंद ठेवू शकतो. अनोळखी मृतदेहाची ओळख केवळ दंतरचना नोंदीवरूनही करता येते. तीव्र सल्फ्यूरिक अम्लात बुडवून ठेवून खून केलेल्या व्यक्तीच्या देहाचा संपूर्ण नाश करण्याचा प्रयत्न केलेल्या एका गुन्ह्यात पोलिसांना फक्त कृत्रिम दातांची कवळीच सापडली होती. त्या कवळीवरून दंतवैद्याने ती आपण अमूक व्यक्ती करताच बनविल्याची साक्ष दिल्यामुळेच गुन्हेगारास खुनी ठरविण्यास मदत झाली होती. कित्येक वेळा दातांनी घेतलेल्या चाव्याच्या खुणा चावणाऱ्याची खूण पटविण्यास मदत करतात.

किनरे, ग. कृ. भालेराव, य. त्र्यं.

पशूंतील दात 

घोडा, खेचर, गाढव, गाय, म्हैस, डुक्कर व मेंढी हे पृष्ठवंशी स्तनी प्राणी असून ते असमदंती आहेत. माणसाप्रमाणे त्यांचे दात दंतवल्क, दंतिन, संधानक व दंतगर यांचे बनलेले आहेत. मुखातील त्यांच्या जागेवरून तसेच आकार व कार्यानुसार कृंतक दात, सुळे, उपदाढा व दाढा असे त्यांचे चार प्रकारही आहेत. खालच्या व वरच्या जबड्यांत सर्वांत पुढे दिसणाऱ्या दातांना कृंतक दात म्हणतात. त्यामागे सुळे, उपदाढा व दाढा अशा क्रमाने त्यांची मांडणी असते. कृंतक दातांचा उपयोग चरताना गवत खुडण्यासाठी, तुकडे करण्यासाठी, तर दाढांचा पेषण व चर्वण करण्यासाठी प्रामुख्याने होतो. कोंबड्या व पक्ष्यांना दात नसतात.

सर्व पाळीव प्राण्यांमध्ये जन्मतः किंवा त्यानंतर लगोलग येणारे सर्व कृंतक दात दुधाचे दात असतात. ठराविक वेळी दुधाचे दात पडून त्या जागी कायमचे कृंतक दात येतात. डुकराशिवाय इतर प्राण्यांत सुळे मात्र प्रथमपासूनच कायमचे येतात. सुळ्यालगतच्या काही दाढा दुधाच्या दाताप्रमाणे पडून त्या जागी कायमच्या दाढा येतात. अशा दाढांना उपदाढा म्हणतात. उपदाढांच्या मागील दाढा मात्र सुरूवातीपासूनच कायम स्वरूपाच्या येतात.

दातांची उत्पत्ती मुखाच्या उपकलेपासून होते व ही क्रिया गुंतागुंतीची आहे. दंतवल्क व दंतिन यांतील खनिज लवणे व जैव पदार्थ यांच्या घटकांचे प्रमाण इतर प्राण्यांच्या वर उल्लेखिलेल्या प्रमाणाइतकेच असते. घोडा व गायीगुरे यांच्या वरच्या जबड्यातील दाढा मोठ्या व रुंद असतात. त्यामुळे अन्नाचे पिष्ट करण्याच्या क्रियेस व्यापक क्षेत्र उपलब्ध होते. घोड्याच्या दाढांच्या माथ्याचा आकार अंतरदर्शक दगडाच्या आकारासारखा असतो. गायीगुरांतील दाढांच्या माथ्यावरील उंचवटे व खाचा अधिक स्पष्ट असतात. त्यामुळे दाढा घोड्याच्या दाढांपेक्षा धारदार असतात. त्यांच्या कृंतक दातांचा आकार फावड्यासारखा असतो. डुकरातील कृंतक दात एकमेकांकडे वळलेले, खेटून बसविलेले असतात आणि त्यांतील मधली व बाजूची जोडी असे चार दात मोठे, त्रिकोणी लोलकाच्या आकाराचे असून जबड्याच्या हाडात खोलवर बसविलेले असतात. त्यांचा उपयोग वेल व इतर खाद्य वनस्पती मुळापासून उपटण्यासाठी होतो. कुत्र्यांच्या दाढांच्या माथ्याचे आकार अन्नाचे पिष्ट करण्यापेक्षा त्याची चिरफाड करण्यास अधिक उपयुक्त होतील असेच असतात.


पाळीव पशूंतील वैशिष्ट्ये : रवंथ करणाऱ्या गायीगुरे, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांना सुळे नसतात, तसेच त्यांच्या वरच्या जबड्यात कृंतक दात नसतात. वरच्या जबड्यातील कृंतक दातांच्या जागी उपास्थीचा (कूर्चाचा) पुठ्‌ट्यासारखा कठीण भाग असतो. त्यांचे कृंतक दात जबड्याच्या हाडात घट्ट बसविलेले नसून ते हालू शकतात. घोडीला सामान्यतः सुळे नसतात. क्वचित असेलच तर ते अल्प वाढ झालेले असतात. घोड्याला सुळ्यांच्या मागे आणि उपदाढांच्या पुढे ज्याला ‘लांडग्याचे दात’ (वूल्फ टीथ) म्हणतात, असे दात एक खालच्या व एक वरच्या जबड्यात प्रत्येक बाजूस येतात. हे दात येणे न येणे बरेच अनियमित असते व या दातांचा समावेश दाढांमध्ये होत असल्यामुळे घोड्यातील एकंदर दाढांची संख्या २४ ते २८ असते. डुकराशिवाय इतर प्राण्यांतील सुळे प्रथमपासूनच कायमचे असे येतात. रानटी डुकरातील कायम येणारे सुळे वरच्या जबड्यातील ७ ते १० सेंमी. व खालच्या जबड्यातील २० सेंमी. पर्यंत लांब असतात. सुळ्यांच्या मुळाशी असलेले अस्थिकूपिकेतील छिद्र दंतिनाने बुजले जात नाही त्यामुळे सुळे आयुष्यभर वाढत राहतात.

आ. १८. घोड्याच्या कृंतक दातांचा आराखडा (खालचा जबडा) : (१) कोपऱ्यातील, (२) मधले, (३) बाजूचे.

घोडा, गाय, मेंढी व डुक्कर या पाळीव पशूंच्या कृंतक दातांची तपासणी करून त्यांच्या वयाचा अंदाज करता येतो. दुधाचे कृंतक दात व उपदाढा ठराविक वयाला पडून त्या जागी कायमचे दात येतात. या नैसर्गिक घटनेचा आधार घेऊन, तसेच कायमचे कृंतक दात वापरात आल्यावर त्यांची झीज होतेवेळी खालच्या जबड्यातील कृंतक दातांच्या माथ्यांच्या आकारावरून व त्यावर दिसणाऱ्या दंतवल्काच्या रेषांच्या आकारातील बदलावरून वयोमान ठरविता येते. घोड्यांच्या बाबतीत दातांच्या तपासणीवरून ठरविलेले वय बरेचसे खऱ्या वयाच्या जवळपास असते व ते ३० वर्षे वयापर्यंत ठरविता येते. गायीगुरे, मेंढ्या व डुकरे यांच्या वयाबाबतचे अंदाज कायमचे कृंतक दात येईपर्यंतच्या काळापर्यंत बरेचसे अचूक असतात पण त्यापुढे ते तितकेसे अचूक राहत नाहीत.

आ. १९. घोड्याच्या वरच्या जबड्यातील कोपऱ्यातील कृंतक दातावरील गॅलव्हिन खोबण वयोमानाप्रमाणे दाखविणारी आकृती : (१) दहा वर्षे, (२) सोळा वर्षे, (३) एकवीस वर्षे, (४) सव्वीस वर्षे, (५) तीस वर्षे.

घोड्यामध्ये खालच्या व वरच्या जबड्यात प्रत्येकी ६ कृंतक दात असतात. जन्माच्या वेळी मधले दुधाचे कृंतक दात आलेले असतात दोन ते चार आठवडे वयाला बाजूचे व सहा ते आठ महिने वयाला कोपऱ्यातील दुधाचे कृंतक दात येतात. २·५ वर्षे वयाला मधले, ३·५ वर्षे वयाला बाजूचे आणि ४·५ ते ५ वर्षे वयाला कोपऱ्यातील दुधाचे दात पडून त्या जागी कायमचे दात येतात. खालच्या जबड्यातील कृंतक दाताच्या माथ्याचा आकार झीजेमुळे प्रथम लांबोळा, नंतर चौकोनी व शेवटी त्रिकोणी होतो. या दरम्यानच्या विविध आकारांवरून ५ ते १०–११ वर्षे वयापर्यंतचा अंदाज करता येतो. १० ते ३० वर्षे वयाचा अंदाज गॅलव्हिन खोबण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वरच्या जबड्यातील कोपऱ्यातील कृंतक दातांच्या मध्यावर हळूहळू वरून खाली दिसू लागणाऱ्या आणि त्याच गतीने वरून खाली दिसेनाशा होणाऱ्या खोबणीच्या लांबीवरून ठरवितात.

या खाणाखुणांच्या जोडीला घोड्याच्या खालच्या व वरच्या जबड्यांतील कृंतक दातांच्या जोडणीच्या आतील कोनाच्या मोजमापाचीही मदत होते. हा कोन ५ वर्षे वयाला १८० अंशांचा असतो. तो हळूहळू कमी होत जाऊन २० वर्षे वयाला ४५ अंशांचा होतो.

दुधाचे कृंतक दात व उपदाढा येण्याचे काळ, ते पडून त्या जागी कायमचे दात येण्याचा काळ, झीजेमुळे होणारे त्यांच्या माथ्याचे व त्यावरील दंतवल्काच्या रेषांचे बदलते आकार यांवरून गायीगुरे, मेंढ्या व डुकरे यांच्या वयांचे अंदाज करण्यासाठी कोष्टके तयार करण्यात आली आहेत. ग्रेट ब्रिटनमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या पशूंची वये ठरविण्याबाबतचे स्मिथफील्ड कोष्टक व नियम ग्राह्य मानले जातात. घोडा, गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि डुक्कर या प्राण्यांचे दंत्यसूत्र खालीलप्रमाणे आहे.

कुत्र्यांच्या बाबतीत दातावरून वयाचे अचूक अंदाज करता येत नाहीत याचे कारण त्यांच्या नैसर्गिक खाण्यामध्ये व पाळीव परिस्थितीत बराच बदल झालेला आहे, हे होय.

पहा : दंतवैद.

दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Diamond, M. Dental Anatomy, New York, 1952.

           2. Miller, E. C. West, G. P., Eds. Black’s Veterinary Dictionary,  London, 1962.

           3. Parker, T. J. Haswell,W.A. A Textbook of Zoology, 2 Vols., London, 1963.

           4. Thomson, H. Elementary Veterinary Science, London, 1952.

           5. Walter, H. E. Sally, L.P. Biology of the Vertebrates,  New York, 1957.

           6. Warwick, R. Williams, P., Eds. Grey’s Anatomy, Edinburgh, 1973.

           7. Weichert, C. K. Anatomy of the Chordates, New York, 1965.