दक्षिणायन : क्रांतिवृत्त (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग) खगोलीय विषुववृत्ताला छेदत असल्याने सूर्य विषुववृत्ताच्या कधी उत्तरेस तर कधी दक्षिणेस असतो. सूर्याचे उत्तरेकडे सरकणे २२ जूनला संपते. या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून उत्तरेस जास्तीत जास्त दूर म्हणजे उत्तर संस्तंभी (विष्टंभी) असतो. या क्षणी सूर्याची क्रांती [⟶क्राति-१] विषुववृत्तापासून जास्तीत जास्त (सु. २३·१/२°) असते. यानंतर सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे सुरू होते. सूर्याच्या या दक्षिणेकडे सरकण्याला दक्षिणायन म्हणतात. हे सरकणे २२ डिसेंबरपर्यंत म्हणजे सूर्य दक्षिण संस्तंभी (अवष्टंभी) येईपर्यंत चालू असते म्हणून सायन कर्कसंक्रांतीपासून ते सायन मकरसंक्रांतीपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा होय. दक्षिणायनामध्ये एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्याच्या अधिक दक्षिणेला तो त्यानंतरच्या दिवशी उगवतो. दक्षिण गोलार्धात या काळात दिवस मोठामोठा व रात्र लहानलहान होत जाते, तर उत्तर गोलार्धात दिवस लहानलहान व रात्र मोठीमोठी होत जाते. संपातबिंदूंना वर्षाला सु. ५० विकला उलट गती असल्याने दक्षिणायनाचा काळही मागेमागे सरकत असतो [⟶ संपातचलन]. हल्ली आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीस दक्षिणायन सुरू होते. हिंदूंमध्ये दक्षिणायनाला धार्मिक दृष्ट्या कमी लेखलेले आहे. यात देव झोपलेले असतात. उत्तरायणात मृत्यू यावा म्हणून ते लागेपर्यंत भीष्म शरपंजरी पडले होते, अशी कथा आहे. सध्या साधारणपणे आषाढ ते पौष हा काळ दक्षिणायनाचा असतो.
पहा : अयने उत्तरायण.
ठाकूर, अ. ना.