दलाक्र्वा, फेर्दीनां व्हीक्तॉर अझेअन : (२८ एप्रिल १७९८–१३ ऑगस्ट १८६३). प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार. जन्म पॅरिसजवळ शारँटों येथे. सरकारच्या परराष्ट्रखात्यात त्याचे वडील मोठ्या हुद्द्यावर होते. पण तो ७ वर्षांचा असताना त्याचे वडील व १६ वर्षांचा असताना आई मरण पावली व चुलत्याच्या मदतीनेच त्याचे कलाशिक्षण झाले. सुरुवातीच्या काळात मात्र चित्रकला की साहित्यनिर्मिती या द्वंद्वात त्याचे मन हेलकावे खात होते. तेऑदॉर झेरीको या आपल्या चित्रकार मित्राच्या राफ्ट ऑफ द मीड्यूसा या चित्राने तो पहिल्यांदा विशेष प्रभावित झाला (१८१९). १८२२ मध्ये ‘पॅरिस सालाँ’ मध्ये त्याचे दान्ते अँड व्हर्जिल इन हेल हे चित्र प्रदर्शित झाले. तथापि ह्या ‘सालाँ ’मधील १८२४ सालच्या प्रदर्शनात ठेवलेल्या द मॅसॅकर ॲट कायॉस या चित्रामुळे त्याला विशेष लोकप्रियता लाभली. हे चित्र इंग्लिश चित्रकारांच्या, विशेषतः कॉन्स्टेबलच्या, धर्तीवर लखलखीत रंगांत त्याने चित्रित केले होते. तुर्कांविरुद्धच्या ग्रीक स्वातंत्र्ययुद्धातील एका प्रसंगावर आधारलेल्या त्या चित्रात क्रूर सैनिक व पीडित नागरिक यांच्यातील विरोध ठळकपणे चित्रित केलेला आढळतो. १८३० मध्ये लिबर्टी लीडिंग द पीपल हे त्याने प्रतीकात्मक चित्र त्याने रेखाटले. त्यातील स्वतंत्रतेच्या तत्त्वाच्या गौरवामुळे तत्कालीन स्वच्छंदतावादी वर्तुळात हे चित्र विशेष गाजले. ‘रोमँटिसिझम’ ही संज्ञाहीयाच वेळी पुढे आली आणि दलाक्र्वा या चळवळीचा नेता म्हणून गौरविण्यात आला. परंतु स्वतः दलाक्र्वाचा असल्या संज्ञांवर फारसा विश्वास नव्हता. तथापि १८२५ मध्ये त्याने इंग्लंडला भेट दिली. या भेटीमुळे स्वच्छंदतावादी काव्य व नाट्य यांकडे तो अपरिहार्यपणे ओढला गेला. यातूनच सार्डंनापेलस हे एका ॲसिरियन राजाच्या पराभवाचे व आत्मनाशाचे ऐतिहासिक चित्र निर्माण झाले. इंग्लिश स्वच्छंदतावादी कवी बायरन याचे त्याच नावाने नाटक असून, दलाक्र्वावरील बायरनचा प्रभाव इतरही चित्रांतून आढळून येतो. स्वतःला हॅम्लेट कल्पूनही त्याने एक चित्र तयार केले.
१८३० नंतर दलाक्र्वाने मोरोक्को, अल्जीरिया व स्पेन या देशांत प्रवास केला. उ. आफ्रिकेतील निसर्गाचे व पोषाखपद्धतीचे झगमगीत रंगसौंदर्य त्याच्या विमेन ऑफ अल्जीअर्स (१८३४) या चित्रात उमटले. याच काळात त्याची चित्रकला हळूहळू आकादमिक संकेतांतून मुक्त होत गेली.
दलाक्र्वाने पॅरिसच्या परिसरातील काही सार्वजनिक वास्तूंत भित्तिचित्रेही काढली. या भित्तिचित्रांत चैतन्य जाणवत असले, तरी अनेक मदतनीसांमार्फत पुऱ्या केलेल्या या कामात निर्जीव रंग आणि कुशल कारागिरीचा अभाव इ. वैगुण्ये आढळतात.
दृक्प्रत्ययवादी चित्रणाचा मार्ग दलाक्र्वाच्या चित्रणतंत्रामुळे मोकळा झाला. परस्परपूरक ठरणारे रंग आणि कुंचल्याचे भावोत्कट फटकारे हे त्याच्या अनेक चित्रांत दिसून येतात. द लायन हंट हे एक त्याचे उल्लेखनीय प्राणिचित्र होय. त्याच्या प्राणिचित्रांत पाशवी सामर्थ्याचा नैसर्गिक जोमदारपणा ठसठशीतपणे उमटलेला आहे.
दलाक्र्वाचे जर्नल प्रसिद्ध असून त्यात समकालीन कलावंतांवर मार्मिक अभिप्राय आढळतात. सर्वच ललित कला आणि साहित्य यांसंबंधीची त्याची प्रगल्भ अभिरुची त्यातून दिसून येते. त्याच्या पत्रांचे चार संग्रह असून अनेक लेखही त्याने प्रसिद्ध केले. या लेखांतून कलाविचार प्रमुख असला, तरी राजकारणादी इतरही अनेक विषय आढळून येतात. आदिम संस्कृतीसंबंधी त्याचा विशेष ओढा त्या लेखांतून दिसून येतो. सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि मूलतः व्यक्तिवादी मनोवृत्तीचा दलाक्रवा एकोणिसाव्या शतकातील एक श्रेष्ठ कलावंत होय.
संदर्भ : 1. Huyghe, Rene, Delacroix, New York, 1963.
2. Lindasy, Jack, Death of a Hero : French Painting From David to Delacroix, London, 1961.
3. Pach, Walter Tr. The Journal of Delacroix, New York, 1948.
4. Prideaux, Tom, The World of Delacroix, New York, 1966.
जाधव, रा. ग.
“