थौका : (ब्रह्मी नाव–थक्का इं. फ्लेम ॲम्हर्स्टिया, स्प्लेंडिड ॲम्हर्स्टिया लॅ. ॲम्हर्स्टिया नोबिलीस कुल–लेग्युमिनोजी उपकुल–सीसॅल्पिनिऑइडी). सु. ९–१५ मी. पर्यंत उंच वाढणारा हा अतिशय सुंदर वृक्ष मूळचा तेनासरीम (द. ब्रह्मदेश) येथील असून जंगली अवस्थेत मोजक्या वेळीच आढळलेला आहे. ब्रह्मदेश, द. भारत, बंगाल, श्रीलंका व उष्ण कटिबंधातील इतर अनेक प्रदेशांत रस्त्याच्या दुतर्फा व लहानमोठ्या बागांतून शोभेकरिता आणि सावलीकरिता लावलेला आढळतो. भारतीय वनस्पतिविज्ञानाच्या प्रगतीसाठी झटलेल्या कौंटेस ॲम्हर्स्ट व त्यांची कन्या लेडी ॲम्हर्स्ट यांच्या नावे हा ओळखला जातो. तो भारतीय लाल अशोकाच्या [⟶ अशोक–१] उपकुलातील (लेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुल) असल्याने शारीरिक लक्षणांत दोन्हींत साम्य आढळते [⟶ लेग्युमिनोजी]. याला ‘ब्रह्मकुमारी’ असे अलीकडे म्हटलेले आढळते. त्याची साल राखी करडी व पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त, मोठी, पिच्छाकृती (पिसासारखी), सोपपर्ण (उपपर्णयुक्त) व दले १२–१६ (समदली), कोवळेपणी पिंगट, निळसर, लांबट भाल्यासारखी, टोकदार व मऊ असून सैलपणे खाली लोंबतात (उदा., आंबा, माधवलता इ.) जून पाने वरच्या बाजूस गर्द हिरवी आणि खालच्या बाजूस फिकट व लवदार असतात. पानांच्या बगलेतून लाल पिवळसर फुलांच्या सु. ०·९ मी. लांब व लोंबत्या मंजऱ्या कोरड्या ऋतूत विशेषतः जानेवारी ते मार्चमध्ये येतात त्या वेळी हा वृक्ष फारच सुंदर दिसतो व त्यामुळे सर्वच वनश्री मनोहर दिसते प्रत्येक मंजरीवर २०–२५ फुले येतात. त्यांचे देठ व देठाच्या मध्यावर असलेली छदकांची जोडी लालबुंद असते संवर्त खाली नलिकाकृती व वर चार लालसर पसरट संदलांचा असून पुष्पमुकुटात पाच पाकळ्या असतात त्यांपैकी तीन मोठ्या व दोन फार बारीक असतात. मोठ्या तिन्हींपैकी मधली सर्वांत जास्त मोठी व लाल असून तीवर पांढरा शिडकावा व टोकास पिवळा ठिपका असतो बाजूच्या दोन लहानसर पाकळ्या साधारण तशाच असून अरुद, तळाशी निमुळत्या, टोकास पसरट व पिवळ्या असतात. दहा केसरदलांपैकी नऊ खाली एकत्र जुळलेली व दहावे सुटे परागकोश हिरवे किंजपुट ऊर्ध्वस्थ, चपटा व किंजल केसरदलाइतका लांब असतो [⟶ फूल]. शिंबा (शेंग) सपाट, १०–१८ सेंमी. लांब, २·५–४ सेंमी. रुद व गर्द पिंगट परंतु फुलांच्या मानाने त्यांची संख्या फार कमी असते बिया पिंगट चपट्या व एक ते तीन असतात.
ह्या वृक्षाची लागवड काहीशी कठीण असते कारण साधारणतः फलनक्षम बियांची कमतरता जास्तीत जास्त अभिवृद्धी (संवर्धन) उन्हाळ्यात दाबाची किंवा गुटीची कलमे करून ती पावसाळ्यात लागण केल्याने होते. कडक ऊन व जोरदार वारा यांपासून सदैव संरक्षण करावे लागते. खोल, निचऱ्याची, सकस जमीन व दमट समशीतोष्ण हवामान असल्यास वाढ चांगली होते.
संदर्भ : Blatter, E. Milliard, W. S. Some Beautiful Indian Trees, Bombay, 1954.
परांडेकर, शं. आ.
“