थोरो, हेन्री डेव्हिड : (१२ जुलै १८१७–६ मे १८६२). अमेरिकन लेखक आणि तत्त्वचिंतक. जन्म कंकाॅर्ड, मॅसॅचूसेट्स येथे. कंकाॅर्ड येथे आरंभीचे काही शिक्षण झाल्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठातून १८३७ मध्ये तो पदवीधर झाला. त्यानंतर थोडे दिवस शिक्षकाची नोकरी केल्यानंतर शिसपेन्सिली तयार करण्याच्या वडिलांच्या व्यवसायात तो साहाय्य करू लागला. १८३८ मध्ये आपला भाऊ जॉन ह्याच्या सहकार्याने एक शाळा सुरू करून ती त्यांनी तीन वर्षे चालविली. १८३९ मध्ये जॉनबरोबर कंकाॅर्ड आणि मेरिमॅक ह्या नद्यांतून त्याने नौकाभ्रमण केले. आपला पिंड शिक्षकाचा नसून कवीचा आहे, ह्याची जाणीव ह्या नौकाभ्रमणाच्या अनुभवातून त्याला झाली आणि तो कविता करू लागला. १८३७ च्या सुमारास विख्यात अमेरिकन निबंधकार आणि विचारवंत ⇨एमर्सन ह्याच्याशी त्याचे घनिष्ठ स्नेहसंबंध जुळले त्याच्या विचारांचा प्रभाव थोरोवर पडला होता. त्यातूनच गीता आणि हिंदू तत्त्वज्ञान ह्यांचा अभ्यास त्याने केला. थोरोच्या काळी जर्मन ⇨अतिशायितावादाचा (ट्रॅन्सेंडेंटॅलिझम) प्रभाव अमेरिकेत –विशेषतः न्यू इंग्लंडमध्ये–होता. अठराव्या शतकातील विवेकवादाविरुद्धची प्रतिक्रिया त्यातून व्यक्त झाली होती. इंद्रियगोचर विश्वापलीकडचे असे अस्तित्व आहे आणि तार्किक अनुमानाहून अन्य मार्गांनी ह्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला होऊ शकते, ही अतिशायितावादाची सारभूत भूमिका. एमर्सन आणि थोरो हे अतिशायितावादाचे प्रमुख अमेरिकन प्रतिनिधी. त्यांच्यातील नाते गुरू-शिष्यांचे. आत्मनिष्ठा, विवेकापेक्षा भावनेचे मोल मोठे मानणे, उत्कट निसर्गप्रेम ही अमेरिकन अतिशायितावादी साहित्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये होत. सुधारणांसाठी संस्था–संघटनांच्या द्वारा चळवळी करण्यापेक्षा समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे व्यक्तिगत जीवन सुधारणे श्रेयस्कर होय, अशी अमेरिकन अतिशायितावाद्यांची भूमिका होती. उदा., निग्रो गुलामगिरीविरूद्ध लढणाऱ्यांनी (अबॉलिशनिस्ट्स) आधी स्वतःला मुक्त करून घ्यावे, असे थोरो आरंभी म्हणे. अमेरिकन अतिशायितावाद्यांच्या क्लबचा (ट्रॅन्सेंडेंटल क्लब) थोरो हा एक निष्ठावंत सदस्य होता. ह्या मंडळींनी डायल नावाचे एक मासिकही सुरू केले (जुलै १८४०). ह्याच मासिकातून थोरोच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. तथापि जुलै १८४२ च्या डायलमधून प्रसिद्ध झालेल्या ‘नॅचरल हिस्टरी ऑफ मॅसॅचूसेट्स’ मध्ये त्याच्या श्रेष्ठ निसर्गवर्णनक्षमतेचा प्रत्यय आला.
पुढे ४ जुलै १८४५ ते ६ सप्टेंबर १८४७ ह्या कालखंडात थोरो कंकाॅर्डजवळच्या वॉल्डन तळ्याच्या काठी स्वतःच एक झोपडी बांधून एकांतवासात राहिला. निसर्गसान्नीध्याचा आणि स्वकष्ठावर चालविलेल्या साध्यासुध्या पण विमुक्त जीवनक्रमातील आनंद त्याने मनमुराद लुटला. ह्या काळात त्याने निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण केले एकांतातून चेतणाऱ्या चिंतनशीलतेचा अनुभव घेतला अर्थपूर्ण जगण्याच्या आड संस्कृति–सुधारणाचे संकेत कसे येतात ह्याचीही प्रचीती घेतली. वॉल्डनकाठी केलेल्या ह्या वास्तव्याचे वेधक चित्र त्याने वॉल्डन ऑर लाइफ इन द वूड्स (१८५४) ह्या आपल्या पुस्तकात रंगविले आहे. तेथील अनुभव सांगता सांगता जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्याने व्यक्त केले आहेत. अनेक भाषांत या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. ह्या पुस्तकाचे मराठी भाषांतर वॉल्डनकाठी विचार–विहार ह्या नावाने दुर्गा भागवत ह्यांनी केले आहे (१९६५).
वॉल्डनकाठी थोरो सामान्यतः एकांतवासात राहिला. तथापि त्याने मनुष्यसंपर्क अजिबात टाळला असे नाही. त्याला भेटावयास लोक येत असत तोही अधूनमधून काँकर्डला जात असे. ह्या काळातच एक सरकारी कर देण्यास नकार दिल्यामुळे थोरोला एक रात्र कोठडीत काढावी लागली होती. साम्राज्यवादी वृत्तीने मेक्सिकोविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या, रेड इंडियनांवर अन्याय करणाऱ्या आणि गुलामगिरीसारख्या प्रथा पोसणाऱ्या तत्कालीन सरकारला करसुद्धा देऊ नयेत, असे त्याचे मत होते. आपल्या विचारांच्या समर्थनार्थ कंकाॅर्ड येथे त्याने दिलेले व्याख्यान ‘सिव्हिल डिस्ओबिडिअन्स’ ह्या नावाने प्रसिद्ध झाले (१८४९). ‘दॅट गव्हर्नमेंट इज बेस्ट व्हिच गव्हर्न्स नॉट ॲट ऑल’ हे त्यातील सुभाषित प्रसिद्ध आहे. थोरोच्या असहकारितेच्या तत्त्वाचा प्रभाव महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावरही पडलेला आहे.
वॉल्डनकाठचे वास्तव्य संपल्यावर थोरोने आपल्या घरच्या पेन्सिलींच्या धंद्यात लक्ष घातले. अतिशायितावादाचा त्याच्यावरील प्रभावही कमी होत गेला. सामाजिक चळवळींसंबंधीची आपली पहिली भूमिका बदलून गुलामगिरीविरुद्ध त्याने प्रखर प्रचार केला.
मानवी स्वातंत्र्याची आणि श्रमाची प्रतिष्ठा मानणारा थोरो हा क्रियाशील तत्त्वचिंतक होता. त्याच्या निसर्गोपासनेमागे मानव आणि निसर्ग ह्यांच्यातील मूलभूत आणि निकटच्या नात्याची जाण होती त्यामुळे आदिमतेची काही अंगे त्याला विलोभनीय वाटत. तथापि मनुष्यनिर्मित संस्कृति–सुधारणांच्या कक्षेपार–एखाद्या रानात–सर्वांनी जाऊन राहावे, असे त्याला वाटत नव्हते. तो स्वतःही वॉल्डनकाठी अल्पकाळच राहिला. तथापि तेथे असताना आणि तेथून परतल्यानंतरही अमेरिकन समाजापुढे साध्यासुध्या जीवनाचा आदर्श त्याने उभा केला, हे विशेष महत्त्वाचे आहे.
क्षयाच्या विकाराने थोरो कंकाॅर्ड येथेच निधन पावला. कविता, प्रवासवर्णने, टिपणवह्या असे त्याचे काही साहित्य त्याच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. त्याच्या समग्र लेखनाच्या अनेक संपादित आवृत्त्या निघाल्या. त्यांपैकी २० खंडांत प्रसिद्ध केलेली वॉल्डन आवृत्ती विशेष प्रसिद्ध आहे.
संदर्भ : 1. Canby, H. S. Thoreau, New York, 1939.
2. Channing, W. E. Thoreau, the Poet–Naturalist, Boston, 1902.
3. Krutch, J. W. Henry David Thoreau, New York, 1948.
4. Sanborn, F. B. The Life of Henry David Thoreau, Boston, 1917.
5. Van Doren, Mark, Henry David Thoreau : A Critical Study, Boston, 1916.
कुलकर्णी, अ. र.
“