थिमान, केनेथ व्हिव्हिअन : (५ ऑगस्ट १९०४– ). अमेरिकी वनस्पतिवैज्ञानिक. ⇨ हॉर्मोने अथवा संप्रेरके यांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांची विशेष प्रसिद्धी आहे. यांचा जन्म ॲशफर्ड, केंट (इंग्लंड) येथे झाला आणि शिक्षण इंपीरियल कॉलेज, लंडन येथे झाले. १९२४ मध्ये त्यांनी बी. एस्सी. (रसायनशास्त्र) व १९२८ मध्ये जीवरसायनशास्त्रातील पीएच्. डी. या पदव्या संपादन केल्या त्यानंतर त्यांनी ग्रात्स (ऑस्ट्रिया) येथे सूक्ष्मरसायनशास्त्राचा अभ्यास केला व लंडनमध्येच अध्यापन केले. पुढे १९३० मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व १९३५ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात त्यांनी काम केले. त्यानंतर दुसऱ्या जागतिक युद्धात व नंतर १९४२–४५ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या आरमारात काम करून ते परत हार्व्हर्ड विद्यापीठात प्रथम साहाय्यक व नंतर पूर्ण वेळ प्राध्यापक (१९४८) झाले. पुढे नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर त्यांची निवड होऊन १९६५ पासून ते कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सांताक्रूझ येथील महाविद्यालयात शासकीय प्रमुख बनले.
जमदाडे, ज. वि.