थिमान, केनेथ व्हिव्हिअन : (५ ऑगस्ट १९०४–  ). अमेरिकी वनस्पतिवैज्ञानिक. ⇨ हॉर्मोने  अथवा संप्रेरके यांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांची विशेष प्रसिद्धी आहे. यांचा जन्म ॲशफर्ड, केंट (इंग्‍लंड) येथे झाला आणि शिक्षण इंपीरियल कॉलेज, लंडन येथे झाले. १९२४ मध्ये त्यांनी बी. एस्‌सी. (रसायनशास्त्र) व १९२८ मध्ये जीवरसायनशास्त्रातील पीएच्. डी. या पदव्या संपादन केल्या त्यानंतर त्यांनी ग्रात्स (ऑस्ट्रिया) येथे सूक्ष्मरसायनशास्त्राचा अभ्यास केला व लंडनमध्येच अध्यापन केले. पुढे १९३० मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे व १९३५ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात त्यांनी काम केले. त्यानंतर दुसऱ्या जागतिक युद्धात व नंतर १९४२–४५ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या आरमारात काम करून ते परत हार्व्हर्ड विद्यापीठात प्रथम साहाय्यक व नंतर पूर्ण वेळ प्राध्यापक (१९४८) झाले. पुढे नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर त्यांची निवड होऊन १९६५ पासून ते कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्‍न असलेल्या सांताक्रूझ येथील महाविद्यालयात शासकीय प्रमुख बनले.

थिमान यांनी वनस्पतींच्या वाढीशी संबंधित अशा संप्रेरकाचे (ऑक्सिनाचे) विलगन (पृथक्करण) व शुद्धीकरण केले, तसेच ऑक्सिनांच्या कार्यासंबंधी संशोधन केले. जेम्स बॉनर यांच्याबरोबर कोशिकालंबनाचे (पेशी लांब होण्याचे) नियंत्रण, फ्रिट्स वेंट यांच्याबरोबर मुळांच्या निर्मितीचे नियंत्रण व एफ्. स्कूग यांच्याबरोबर कळ्यांच्या वाढीचे नियंत्रण इ. विषयांवर संशोधन केले. कळ्यांच्या बाबतीत स्कूग व त्यांच्या सहकाऱ्यांनी अलग केलेले कायनेटीन व ऑक्सिन यांच्या समतोलाचा संबंध येतो, असे थिमान यांनी दाखविले. वनस्पतींतील अँथोसायनिनांच्या (लाल आणि जांभळे रंग) निर्मितीवर एका प्रकली (न्यूक्लिइक) अम्‍लाचे नियंत्रण असते, हेही त्यांनी सिद्ध केले. फायटो हॉर्मोन्स (एफ्. डब्ल्यू. वेंट यांच्याबरोबर १९३७), ले ऑक्सिन्स (१९५५) व द लाइफ ऑफ बॅक्टिरिया (१९५५) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

पहा: वृद्धि, वनस्पतींची.

जमदाडे, ज. वि.