थरचे वाळवंट : भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे वाळवंट. क्षेत्र सु. २,५९,००० चौ. किमी. असून हे कच्छच्या रणापासून उत्तर वायव्येकडे ८०५ किमी. आणि अरवली पर्वतापासून वायव्येस ४८३ किमी. सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले आहे. भारत–पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा या वाळवंटातून जाते. पूर्वी या वाळवंटाला ‘मरुस्थली’ म्हणत. यालाच ‘भारताचे मोठे वाळवंट’ म्हणतात.
याने राजस्थान राज्याचा बराच भाग व्यापला असून पंजाब राज्याचा दक्षिण भाग, पाकिस्तानातील सिंध, खैरपूर आणि बहावलपूर या प्रांतांचाही काही भाग व्यापलेला आहे. हा भारतातील अती उष्ण भाग आहे. संपूर्ण वाळवंट वालुकामय असून बऱ्याच ठिकाणी, त्यात प्राचीनकाळी नद्यांनी आणून टाकलेला गाळ व माती आणि खडक झिजून तयार झालेली वाळू यांचा समावेश आहे. पूर्वेस अरवली पर्वताच्या बाजूस खडकाळ टेकड्या आणि पश्चिमेस सिंधच्या बाजूस वाळूच्या टेकड्या आढळतात. वाळूच्या टेकड्यांचा आकार लाटांप्रमाणे असून त्या ईशान्य व नैर्ऋत्येकडे पसरलेल्या आहेत. या वाळूच्या टेकड्यांची उंची पूर्वेकडून पश्चिमेस वाढत जाते. वाळवंटाच्या काही भागात खुरटी–काटेरी झुडुपे व निवडुंग आढळतात. वाळवंटात लूनी ही एकच महत्त्वाची नदी व अनेक खारी सरोवरे आहेत. दैनिक तपमान कक्षेत खूपच तफावर असते. दुपारचे तपमान ४९° से. पर्यंत वाढते. जोधपूर, बिकानेर, बारमेर, जैसलमीर येथे दैनिक कमाल तपमान ५०° से. पर्यंत असते. दिवसा अतितीव्र उष्णता व रात्री कडक थंडी यांमुळे भूकवचावरील खडक लवकर झिजतात. नोव्हेंबरच्या सुरुवातीस व फेब्रुवारीच्या अखेरीस हवा सुखदायक असते, त्यानंतर मात्र वाळूची उष्ण वादळे वाहू लागतात. मार्च ते जून हवा अती उष्ण व कोरडी असते. जून ते सप्टेंबरपर्यंत जैसलमीर, बिकानेर, गंगानगरमध्ये सरासरी पर्जन्यमान १२ ते २५ सेंमी. असते.
या वाळवंटी प्रदेशात मुस्लिम आणि हिंदू धर्मांचे लोक असून भटक्या जमातीही पुष्कळ आहेत. येथे शेळ्यामेंढ्या व उंट हे प्राणी असून हस्तव्यवसायांसारखे व्यवसाय मुख्य आहेत. एकूण लोकसंख्येच्या सु. ८०% लोकसंख्या ग्रामीण भागात असून जैसलमीर जिल्ह्यात १ चौ. किमी. मध्ये ४, तर चुरू जिल्ह्यात १ चौ. किमी. मध्ये ४२ अशी लोकसंख्येची घनता आहे. वाळवंटाचा पुष्कळसा भाग जास्त तपमान व अतिशय कमी पाऊस यांमुळे निर्जल, ओसाड–निर्जन बनला आहे.
खनिज संपत्तिदृष्ट्या हा प्रदेश महत्त्वाचा असून पालन येथे लिग्नाइट कोळशाची खाण, काम्ली ताल येथे नैसर्गिक वायू, तर जिप्समच्या खाणी नागौर, जैसलमीर, बिकानेर व बारमेर या ठिकाणी आहेत. तसेच खाऱ्या सरोवरांतून मीठ काढण्यात येते. विहिरी आणि तळी यांशिवाय कालवे ही वाळवंटातील पाणीपुरवठ्याची महत्त्वाची साधने आहेत. पाकिस्तानमधील सक्कर धरणामुळे थरचा दक्षिणेकडील भाग जलसिंचित केला गेला आहे, तर उत्तरेकडील भाग गंगा कालव्याने सतलज नदीतील पाणी आणून जलसिंचित केला आहे. १९८० मध्ये राजस्थान कालवा पूर्ण झाल्यानंतर बिकानेर आणि जैसलमीर जिल्ह्यांतील ९,९९,५७४ हे. जमिनीस पाणीपुरवठा होणार आहे. पाणी उपलब्ध असलेल्या भागात गहू, कापूस, ऊस, बाजरी, तीळ, एरंडी, मिरची इ. पिके होतात.
या मरुभूमीतील प्रखर सूर्यकिरण व जोराचा वारा यांचा विकासासाठी उपयोग करण्याचा शासनाचा प्रयत्न चालू आहे. १९६० साली सौरभट्ट्या व पवनचक्क्या यांचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
सावंत, प्र. रा.
“