त्रिशूल सर्प : ज्यांना कॅट–स्नेक्स (मार्जार–सर्प) म्हणतात अशा सापांच्या समूहापैकी हा एक साप आहे. मार्जार–सर्प कोल्युब्रिडी कुलातील कोल्युब्रिनी उपकुलातील आहेत. या मार्जार–सर्पांच्या अनेक जाती भारतात आढळतात. हे सर्प वृक्षवासी असून मुख्यतः रात्रिंचर आहेत. यांची लांबी सु. १-२ मी. असते. डोके चपटे आणि तिकोनी असते मान बारीक असते डोळे मोठे व त्यांतल्या बाहुल्या मांजराच्या बाहुल्यांप्रमाणेच उभ्या असतात. स्वभावाने ते फार उग्र असतात.
त्रिशूल सर्प बोइगा वंशातील आहे. या वंशाच्या १२-१३ जाती असून त्या भारतातील वेगवेगळ्या भागांत आढळतात. भारतात सगळीकडे आढळणारी त्रिशूल सर्प ही सामान्य जाती असून तिचे शास्त्रीय नाव बोइगा ट्रायगोनेटा आहे.
त्रिशूल सर्प डाझुडपांवर असतो. गुजरातेत निवडुंगाच्या कुंपणावर तो नेहमी दिसतो, असे सांगतात. तो उंच झाडांवरही चढू शकतो. याची लांबी सरासरी ९०–१०० सेंमी. असते. अंग सडपातळ पण मधला भाग जाड असतो. पाठीचा रंग पिवळसर तपकिरी किंवा भुरकट असून तिच्यावर इंग्रजी V अक्षराच्या आकाराच्या काळ्या खुणांची ओळ असते. या खुणा स्पष्ट असतात पण शेपटीकडे त्या पुसट होत जाऊन अखेरीस नाहीशा होतात. V च्या दोन्ही बाहूंमधील जागा पांढुरकी असते. पोटाकडचा भाग पांढरा असून दोन्ही बाजूंना तपकिरी ठिपके असतात. डोक्यावर एक मोठा तपकिरी ठिपका असून त्याच्या कडा काळ्या असतात. डोळ्यापासून जबड्याच्या शेवटापर्यंत पसरलेला पिवळसर तपकिरी पट्टा असतो. डोळे मोठे, बाहुली उभी आणि कनीनिका (बाहुलीचा रंगीत पडदा) पिवळी असते. शेपटी लांब व अगदी निमुळती असते. हा साप फार चपळ असून बुजरा किंवा भित्रा नाही. तो इतका उग्र दिसतो की, त्याची भीती वाटते. स्वभावाने तो दुष्ट आहे. त्याला थोडेसे जरी डिवचले, तरी तो चवताळतो व आ वासून पुनःपुन्हा तडाखे मारतो किंवा चावतो. तडाखा मारताना त्याचा आविर्भाव नागासारखा असतो. हा बेडूक, लहान पक्षी, सरडे, कधीकधी लहान सस्तन प्राणी खातो. आपल्या भक्ष्याकडे तो टक लावून पाहत असतो व संधी मिळाल्याबरोबर त्याला पकडून किंवा त्याभोवती विळखे घालून त्याला मारून गिळतो. मादी एका खेपेला ३–११ अंडी घालते. हा साप विषारी नाही