त्रिवेंद्रम : पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानची व हल्लीच्या केरळ राज्याची राजधानी. लोकसंख्या ४,०९,६२७ (१९७१). मलबार किनाऱ्यावर मुंबईच्या आग्नेयीस १,२५५ किमी., कोचीन आणि कन्याकुमारीपासून अनुक्रमे २२० व ८५ किमी. अंतरावर, समुद्रकिनाऱ्यापासून ३ किमी. आत समुद्रसपाटीपासून ७६ मी. उंचीवर हे वसले आहे. शहराचा परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे.
याचे मूळ नाव तिरुअनंतपुरम्. तिरुअनंतपुरम् म्हणजे अनंताचे पवित्र नगर होय. जुन्या आख्यायिकेनुसार या सर्व भागात घनदाट अरण्य होते. या जंगलातच विष्णूची मूर्ती मिळाली व तिची स्थापना करण्यात येऊन प्रसिद्ध पद्मनाभस्वामीचे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर फार जुने असून त्यातील लाकडावरील कोरीव काम आणि गोपुरे प्रसिद्ध आहेत. यांशिवाय दगडावरील कोरीव कामात रामायण आणि महाभारत यांतील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत.
शहराचे हवामान उष्ण आणि दमट असून वार्षिक सरासरी पर्जन्य १८० सेंमी. आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यांचा काळ आल्हाददायक असतो. त्रिवेंद्रम हे लोहमार्गाचे केंद्र असून शेनकोट्टा खिंडीतून पश्चिम किनाऱ्यावर येणाऱ्या दक्षिण रेल्वेच्या फाट्याचे दक्षिणेकडील टोक आहे. याशिवाय हे पक्क्या सडकांनी जोडले असून हवाई वाहतुकीचे केंद्र आहे. विमानतळ शंकूमुघोम येथे आहे. काथ्याच्या वस्तू, टिटॅनियम , खोबरे, साबण, रबरी वस्तू, कागद, सुती व रेशमी कापड, मातीची भांडी, धातू इत्यादींचे उद्योग येथे चालतात.
शहरात केरळ विद्यापीठ, महाराजा विधी महाविद्यालय, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत. येथून शंभरहून अधिक नियतकालिके प्रकाशित होतात व त्यांत केरळ कौमुदी हे दैनिक प्रसिद्ध आहे. यांशिवाय शहरात वेधशाळा आणि अद्ययावत दवाखाने आहेत.
पूर्वी हे संस्थानची राजधानी असल्याने येथील जुना राजवाडा हे एक आकर्षण आहे. याशिवाय वस्तुसंग्रहालय, उद्याने, व्हिक्टोरिया जूबिली हॉल, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, शंकूमुघोम पुळण इ. प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.
“