त्रिपाठी, रामनरेश : (१८८९–१९६२), हिंदी कवी, कादंबरीकार, संपादक व समीक्षक. हिंदी साहित्यात मुख्यतः श्रीधर पाठक यांनी प्रवर्तित केलेल्या स्वच्छंदतावादी काव्यप्रवृत्तीचे प्रमुख कवी म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म जौनपूर जिल्ह्यातील कोइरीपूर येथे झाला आणि शिक्षण जौनपूर येथे झाले. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून ते कविता लिहू लागले.

रामनरेश त्रिपाठींची मिलन (१९१७), पथिक (१९२०), स्वप्‍न, (१९२९) ही तीन खंडकाव्ये तसेच मानसी (१९२७) हा स्फुट कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या खंडकाव्यांची कथानके स्वतंत्र असून त्यांत उत्कट देशभक्ती, त्यागमय प्रेम आणि निसर्गसौंदर्याचे आकर्षण ही प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात. खड्या बोलीचा शुद्ध, सफाईदार व काव्यात्मक उपयोग हे त्यांच्या शब्दकळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगता येईल. द्विवेदी युगातील नीरस, रूक्ष व वर्णनप्रधान काव्यरचना आणि पुढे छायावादी युगातील अतिशय कोमल, सरस, सालंकृत काव्यभाषा यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे रामनरेश त्रिपाठी यांची काव्यभाषा होय. हिंदी काव्यातील श्रीधर पाठकप्रणीत स्वच्छंदतावादी प्रवाह विकसित व समृद्ध करणारे कवी म्हणून त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.

विरांगना (१९११), वीरबाला (१९११) व लक्ष्मी (१९२४) या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्‍या सुभद्रा (१९२४), जयंत (१९३३) व प्रेमलोक (१९३४) ही नाटके तुलसीदास और उनकी कविता, हिंदी साहित्य का संक्षिप्त इतिहास, रामचरित मानसकी टीका हे समीक्षापर व साहित्येतिहासविषयक ग्रंथ तीस दिन मालवीयजीके साथ हा आठवणी कथन करणारा ग्रंथ इ. साहित्य रचना त्यांनी केली आहे. हिंदी, उर्दू, संस्कृत व बंगाली या भाषांतील लोकप्रिय कवितांचा संग्रह करून तो १९२५ मध्ये कविता कौमुदी या नावाने आठ भागांत प्रकाशित केला. यांतील एक संग्रह ग्रामीण गीतांचा संग्रह या दिशेने केलेला पहिला प्रयत्न म्हणून महत्त्वाचा आहे. त्यांनी बालोपयोगी साहित्यही लिहिले व संपादित केले.

बांदिवडेकर, चंद्रकांत