तोरण : (हिं. चुरन, धौरा क. महिगोट्टे सं. तोदन लॅ. झिझिफस रुगोजा कुल-ऱ्हॅम्नेसी). ⇨ बोराच्या वंशातील पण आधारावर चढत जाणारे हे काटेरी झुडूप श्रीलंकेत आणि भारतात बहुतेक सर्वत्र व विशेषतः डोंगराळ भागात आढळते. सामान्य शारीरिक लक्षणे बदरी [⟶ ऱ्हॅम्नेसी] कुलात वर्णिल्याप्रमाणे. पाने साधी व मध्यम आकारमानाची, पाच ते आठ सेंमी. लांब, साधारण दातेरी व लंबगोल असून वरचा पृष्ठभाग गुळगुळीत परंतु खालचा लवदार असतो. काटे (उपपर्णे) आखूड, वाकडे व एकेकटे असतात. परिमंजऱ्या लांब, शाखित व काटेरी असून फुलांना पाकळ्या नसतात ती हिरवट लहान असून बिंब पंच–खंडी व किंजपुटात दोन कप्पे असतात [⟶ फूल]. एप्रिल ते मे मध्ये लहान, वाटोळी, पांढरी पिवळट, खाद्य, अश्वगर्भी (आठळीयुक्त) फळे येतात ती गिरिजनांना विशेष आवडतात. बी कठीण व एकच असते. ⇨ नागवेलीच्या (पानवेलीच्या पानांचे देठ व तितकीच तोरणाची फुले व निम्मा चुना यांपासून केलेल्या सु. ०·२५ ग्रॅमच्या गोळ्या दिवसातून दोन वेळा घेतल्यास मासिक अतिस्रावावर गुणकारी असल्याचे आढळले आहे. तोरणाचा पाला बारीक कुटून त्याचा पाण्यात केलेला काढा चट्टे व जखमा धुण्यास वापरतात.
जोशी, रा. ना.
“