तिवार : (लॅ. सोनेरॅशिया अपेटॅला कुल–लिथ्रेसी). वर्गीकरणातील आधुनिक तत्त्वप्रणालीनुसार या वनस्पतीचा समावेश भिन्न कुलात (सोनेरॅशिएसी) केला जातो तत्पूर्वी ⇨ लिथ्रेसी अगर मेंदी कुलात केला जात असे. याचा प्रसार तुरळकपणे भारतातील समुद्रकिनारी व खाड्यांच्या काठाने (मुंबई ते शिवडी, मुंब्रा, ठाणे, रत्नागिरी व बंगाल इ.) व तसेच ब्रम्हदेशात आहे. हा एक सु. १२–१८ मी. उंच, सदापर्णी वृक्ष असून साल काळी व गुळगुळीत आणि फांद्या बारीक व वाकलेल्या असतात. सालीवरील सूक्ष्मछिद्रे (वल्करंध्रे) लांबट आडवी पाने २–४ X १–१·५ सेंमी., समोरासमोर, साधी चिवट, जाड फिकट हिरवी व लंबगोल असतात. फुले मोठी, पानांच्या बगलेत (कक्षास्थ), एकेकटी किंवा तीनाच्या झुबक्यात व फांद्यांच्या टोकांस मार्च ते जून मध्ये येतात, पाकळ्या नसतात संवर्तनलिका पेल्यासारखी संदले चार व हिरवी केसरदले अनेक व काहीशी बाहेर डोकावणारी किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजल केसरदलांपेक्षा आखूड व किंजल्क टोकास छत्राकृती [→ फूल] बीजके अनेक. फळ (बोंड) लहान (१·१० सेंमी. व्यासाचे) वाटोळे पण बसके असते. फळांचा मोसम ऑगस्ट ते ऑक्टोबर. बी फळात रुजून प्राथमिक मुळाचा बाहेर आलेला भाग काही दिवस झाडावरून लोंबत राहतो (अपत्यजनन). या वृक्षाचे लाकूड बळकट, मध्यम कठीण व जळणास उत्तम असून घरबांधणी, खोकी, साधे लाकूड–सामान, पडाव, होडगी इत्यादींस उपयुक्त असते. झाडांभोवती चिखलातून वर वाढणाऱ्या मुळांच्या रांगा असतात त्यांना श्वसनमुळे [→ मूळ] म्हणतात त्यांमध्ये हवामार्ग असलेले ऊतक (समान रचना व कार्य असणारा पेशींचा समूह) असते.
चिप्पी : तिवार हेच नाव सोनेरॅशिया वंशातील दुसऱ्या जातीस
(सो. कॅसिओलॅरिस अथवा सो. ॲसिडा) दिलेले आढळते. हा सु. २० मी. उंच व १·५ मी. घेराचा वृक्ष भारताच्या किनाऱ्यावरील खाजणात आणि सुंदरबनाच्या व अंदमानाच्या किनारी प्रदेशात आढळतो. याची पाने वर दिलेल्या जातीपेक्षा अधिक लांब व रुंद (५–१० X २·५–५ सेंमी.) आणि काहीशी मांसल असतात. फुले एकेकटी, मोठी, गर्द गुलाबी पाकळ्या सहा, लांबट व टोकदार. फळ (मृदुफळ) मोठे,
३–५ सेंमी. व्यासाचे, गर्द हिरवे व कायम असलेल्या अर्धगोल संवर्ताच्या पेल्यात ठेवल्यासारखे दिसते संदले सहा व वरच्या जातीतल्यापेक्षा थोडी मोठी येथे किंजल लांब (५ सेंमी.) असून त्याचा अर्धा निमुळता भाग फळावर राहतो फुलांचा मोसम फेब्रुवारी अगर मार्च ते जुलै असून फळे ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये येतात. श्वसनमुळे सु. ६० सेंमी. उंच व ७·५ सेंमी. व्यासाची असून नरम व छिद्रयुक्त (स्पंजासारखी) असतात. त्याचा उपयोग बुचाच्या किंवा भेंडाच्या तुकड्याप्रमाणे जाळ्यांना तरंडाप्रमाणे (तरंगण्यासाठी) बांधण्यास करतात तसेच बुटांच्या आतील भागात तळाशी बसविण्यास, कीटक परिरक्षित करून ठेवण्याच्या पेट्यांत, कृत्रिम फुले बनविण्यास व वस्तुंचे नमूने बनविण्यास करतात. पक्व फळांची चव चीजसारखी असून ती कच्ची किंवा शिजवून खातात. कच्ची फळे आंबट असल्याने मलायात कढी व चटणी यांत स्वादाकरिता घालतात. व्हिनेगर (शिर्का) बनविण्यासही ती वापरतात तसेच तेथे फळांची साल कृमिनाशक म्हणून वापरतात व कच्च्या फळांचा रस खोकल्यावर देतात. सुजेवर व लचक भरल्यास फळांचे पोटीस बांधतात रक्तस्रावावर आंबलेला रस लावल्यास स्राव थांबतो.
फळांत ११ टक्के पेक्टीन असते त्यांपासून स्वच्छ जेली करता येते. या झाडांचे लाकूड करडे किंवा गर्द तपकिरी, मध्यम प्रतीचे कठीण व जड असते. त्यातील क्षारामुळे लोखंडी खिळे गंजतात तांब्याचे अथवा जस्ताचा मुलामा दिलेले खिळे वापरून ते पूल, नावा, जहाजे, दारे, तक्तपोशी, कपाटे व वाद्ये इ. विविध वस्तूंसाठी वापरतात. भारतात या वृक्षाच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. भारतीय वृक्षांपासून आर्चीन (C15H10O5) व आर्चिनीन (C15H10O4) ही रंजकद्रव्ये आणि रंगहीन, स्फटिकी, फेनॉलिक संयुग आर्चिसाइन (C17H14O12) मिळतात. खोड व फांद्यांवरच्या सालीत अनुक्रमे ९–१७ टक्के व ११ टक्के टॅनीन असून ते कातडी कमाविण्यास वापरतात ते कातड्यात त्वरित शिरते आणि त्यापासून कातडी नरम, फिकट पिवळी व लवचिक बनतात.
पहा : कांदळ काजळा वनश्री (कच्छ वनश्री).
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
नवलकर, भो. सुं., परांडेकर, शं. आ.
“