तिरुमूलर : (सु. सहावे–सातवे शतक). प्रसिद्ध तमिळ शैव संतकवी, सिद्ध व दार्शनिक. त्रेसष्ट ⇨ नायन्मारांपैकी (शैव संत) एक सर्वश्रेष्ठ सिद्ध. त्याच्या जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. शोक्किळारच्या पेरियपुराणम् या शैव ग्रंथात तिरुमूलरसंबंधी पुढील आख्यायिकावजा माहिती आहे : त्याचा जन्म कैलास पर्वतावर झाला व प्रत्यक्ष भगवान शंकरापासून त्याला ज्ञानप्राप्ती झाली. (काही शैव संतांच्या मते भगवान नंदीपासून त्याला ज्ञानप्राप्ती झाली.) केदार, नेपाळ, काशी, विंध्याचल, श्रीशैलम् इ. क्षेत्रांची यात्रा करून तो दक्षिणेकडे अगस्त्यमुनीस भेटण्यासाठी निघाला. त्याच्या जन्माबाबतही पुढील आख्यायिका प्रचलित आहे : यात्रा करीत असता शात्तनूर या ठिकाणी त्याला मूलन नावाचा एक गुराखी मरून पडलेला दिसला. त्याच्या गाई त्याच्याभोवती जमून शोक करीत होत्या. त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन तिरुमूलरने योगबलाने मूलनच्या शरीरात प्रवेश केला. मूलन जिवंत होताच गाईवासरे आनंदाने नाचू लागली. पुढे गाई ज्याच्या त्याच्या घरी पोहोचविल्यावर तो जावयास निघाला, पण मूलनची पत्नी त्याला जाऊ देईना. तेव्हा तिरुमूलर (मूलन) याने तिला सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि गावातील एका मठाचा आश्रय घेतला. तेथे त्याने दीर्घकाल आपले आयुष्य प्रभुसेवेत व्यतीत केले व काव्यरचनाही केली. तिरुमंत्रम् (पवित्र मंत्र) हा एकच ग्रंथ त्याने रचला. त्याच्या ह्या ग्रंथरचनेबाबत अशीही एक आख्यायिका रूढ आहे, की कैलासावर तो कित्येक शतके ध्यानस्थ स्थितीत होता. तेथेच त्याने ही ग्रंथरचना केली. एका वर्षाच्या साधनेनंतर एक पद्य, अशी एखूण ३,००० पद्ये त्याने रचली.
तिरुमंत्रम्चीविभागणी एकूण नऊ तंत्रात केलेली असून तंत्रानुक्रमे येणारे विषय असे : (१) भक्ताची व्याख्या व मानवी जीवनातील धर्माचे स्थान. (२) सृष्ट्युत्पत्ती, पालन, संहार तिरोधान (आवरण) आणि अनुग्रह या देवाच्या पाच कृत्यांचे तसेच शिव–शक्ती यांच्या लीलांचे वर्णन. (३) अष्टांग योग, त्याचा अभ्यास तसेच अष्टसिद्धी यांचे विवरण. (४) हठयोग व त्याची साधने यांचे विवरण. (५) विविध शैव मतांचे विवरण तसेच चर्या, क्रिया, योग व ज्ञान या मोक्षप्राप्तीच्या चार मार्गांचे दिग्दर्शन. (६) शक्ती–उपासनेचे विविध मार्ग शिवाला गुरुस्वरूप मानून गुरुदर्शनाची महती. (७) चितेंद्रियता प्राप्त करून घेणे, समाधी अवस्थेचे वर्णन त्याचप्रमाणे शिवलिंगाची आत्मलिंग, ज्ञानलिंग इ. विविध रूपे व शिवोपासनेचे विवरण. (८) कामक्रोधादी षड्रिपूंचे स्वरूप व त्यापासून मुक्ती मिळविण्याचे मार्ग, शिवरूपी लीन होण्यासाठी शरीरत्यागाच्या विविध पद्धती. (९) पंचाक्षर (नमः शिवाय) मंत्राचा महिमा, शिवदर्शन, भगवान नटराजाचे नृत्य, ज्ञानोदय व सिद्धमार्गाचे विवरण. अशा रीतीने तंत्र, आगम, मंत्र व योग या चारही मार्गांचा अवलंब तिरुमंत्रम्मध्ये आढळतो.
सांप्रदायिक शैव भक्तिवाङ्मयात (तिरुमुरै) तिरुमंत्रम्चा दहावा क्रम असून त्याला उपनिषदांसमान आदराचे स्थान आहे. प्रसिद्ध शैव संतकवयित्री अव्वैयार हिने तिरुक्कुरळ, तेवारम्, व तिरुवाचगम् या श्रेष्ठ रचनांबरोबरच तिरुमंत्रम्लाही महत्त्वाचे स्थान दिले आहे. तिरुमूलर हा शिवोपासक असला, तरी शिव आणि शक्ती एकरूपच मानतो. अखिल मानवजातीचे कल्याण साधणाऱ्या मानवताधर्मावर त्याने भर दिला आहे. देवळातील देवाची उपासना करण्यापेक्षा हृदयस्थ परमेश्वराची पूजा करण्याचा उपदेश त्याने केला आहे. प्रेमाचा त्याने अपार महिमा गायिला असून हे प्रेम ईश्वरस्वरूपच आहे, असे तो म्हणतो. प्रेम हा ईश्वराचा गुणविशेष नसून, प्रेम हीच एकमेव केवल सत्ता आहे. शरीराला तो ‘आत्म्याचे पवित्र मंदिर’ मानतो. वेद व आगमग्रंथ हे परस्परविरोधी नसून परस्परपूरकच असल्याचे तो मानतो. शैव व वैष्णव मतांचा समन्वय साधण्याकडे त्याचा कल दिसतो. सिद्धांच्या (सिद्दर) गूढवादी व विविध मतांचा समन्वय साधणाऱ्या पंथाचा प्रणेता म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. तिरुवावडुतुरे हे तिरुमूलरचे स्थान म्हणून प्रसिद्ध असून तेथे शैव मठही आहे.
तिरुमंत्रम्ची रचना विरुत्तम् प्रकारातील ‘तिरुक्कुरंतोहै’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या छंदात आहे, तथापि भावानुसार त्याची तालरचना बदलत जाते. दार्शनिक गूढ तत्त्वांचे विवरण करताना त्याची भाषा रूपकात्मक, संदिग्ध व गूढ बनते परंतु सर्वसाधारणपणे त्याची रचना ललितमधुर, प्रासादिक व साध्यासरळ शैलीत आहे. त्याची रचना सहजसुंदर असून त्याचे प्रत्येक पद्य हे काव्याचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. गूढ रूपकांमुळे त्याच्या रचनेला उपनिषदांची सूत्रमयता व अर्थसघनता प्राप्त झाली आहे. अनेक शैव संतांना त्याच्यापासून प्रेरणा व स्फूर्ती लाभली. त्याची अनेक वचने वाक्प्रचार व म्हणींच्या स्वरूपात तमिळ लोकांच्या दैनंदिन जीवनात रूढ आहेत. तिरुमंत्रम्वर तमिळमध्ये अनेक अभ्यासग्रंथ लिहिले गेले असून त्याच्या अनेक सटीक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
वरदराजन्, मु. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)