तिरुनावुक्करसर : (सातवे शतक). तमिळनाडूत ⇨ नायन्मार नावाने ओळखल्या जाणाऱ्या ६३ शैव संतांतील एक श्रेष्ठ संत. अप्पर (पिता), तिरुनावुक्करशू (पवित्र वाणीचा सम्राट), नावुक्करसर अशीही त्याची नावे प्रचलित आहेत. तिरुज्ञानसंबंधर, तिरुनावुक्करसर, सुंदरर व ⇨ माणिक्कवाचगर हे नायन्मारांतील चार श्रेष्ठ अध्वर्यू असून यांतील पहिल्या तिघांची शिवभक्तिपर स्तोत्ररचना ⇨ तेवारम् नावाने प्रसिद्ध आहे. तिरुनावुक्करसरचा जन्म दक्षिण अकार्ट जिल्ह्यातील तिरुवामूर गावी एका वेळ्ळाल (एक ब्राम्हणेतर शेतकरी जात) कुटुंबात झाला. त्याचे मूळ नाव मरुलनीक्कियार. तमिळ व संस्कृतचा तो गाढा पंडित होता. लहानपणीच त्याचे आईवडील वारल्यामुळे त्याची वडील बहीण तिलकावतीने त्याचे पालनपोषण केले. ती विरक्त अशी शिवभक्त होती. सुरुवातीस त्याने जैन धर्माची दीक्षा घेऊन जैन धर्मात एक श्रेष्ठ यती आणि आचार्य म्हणून लौकिक मिळविला. जैन धर्मात त्याला ‘धर्मसेनार’ असा मानाचा किताब होता. त्याच्या जीवनाबाबत अनेक आख्यायिका रूढ आहेत. त्याने अनेक चमत्कार केल्याच्या कथाही प्रचलित आहेत. जैन धर्माचा तो अनुयायी असताना त्याला असाध्य असा पोटशूळ जडला. त्याच्या बहिणीने त्याला शिवाची विभूती देऊन तो बरा केला. तेव्हा त्याने जैन धर्माचा त्याग करून बहिणीकडून शैव मताची दीक्षा घेतली, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. तो ८० वर्षांवर जगला तसेच त्याने पल्लव राजा महेंद्रवर्मन् यास जैन धर्माचा त्याग करावयास लावून शैव मताची दीक्षा तिली असेही सांगितले जाते. पेरियपुराणाम् या ग्रंथात ६३ नायन्मारांची चरित्रे वर्णिली असून त्यात महेंद्रवर्मन् राजाने जैनांची मंदिरे उद्ध्वस्त करून त्या सामग्रीने ‘गुणधर विचुरम्‘ नावाने प्रख्यात शिवमंदिर बांधल्याचे म्हटले आहे. तिरुनावुक्करसरने शैव मताचा दक्षिणेत प्रभावी प्रचार–प्रसार केला.
तो एक श्रेष्ठ असा गूढवादी शैव संत आणि प्रतिभासंपन्न कवी होता. शिवस्तुतिपर त्याने सु. तीन हजारांवर स्ताेत्रे रचली असून ती तेवारम्मध्ये संगृहीत आहेत. तेवारम्मध्ये आलेल्या सात ‘तिरुमुरैं’ पैकी चार, पाच व सहा ही तीन तिरुमुरै याची आहेत. भावनेची खोली व गूढानुभूती यांचा प्रत्यय त्याच्या रचनेत येतो. शिवभक्तीचा त्याने आपल्या ह्या स्तोत्रांतून पुरस्कार केला. मनुष्यातील आठ प्रमुख सद्गुण हीच आठ प्रमुख फुले असून त्यांनी शिवोपासना करावी असे तो म्हणतो. ‘तेवारम्’ म्हणजे परमेश्वरचरणी अर्पण केलेली गीतमाला. याच्या स्तोत्रांवरूनच संग्रहास तेवारम् हे नाव प्राप्त झाले. त्याने रचलेली काही स्तोत्रे संगीतरचनांत बांधलेली असून ती तेथील शिवमंदिरांतून पारंपरिक चालींवर मोठ्या भक्तिभावे म्हटली जातात. कर्नाटक संगीताचा मूलाधार तेवारम् मधील संगीतबद्ध स्तोत्रे असल्याचे तज्ञ मानतात. सखोल भावना, समृद्ध अनुभव, संपन्न लय आणि ओज हे तिरुनावुक्करसरच्या स्तोत्रांचे विशेष होत. अबालवृद्धांना समजेल व रुचेल असा शिवभक्तीचा दिव्य संदेश त्याने त्यांतून दिला आहे.
तो सुरुवातीस जैनमतानुयायी असल्यामुळे जैन धर्मात सदाचरणावर व नैतिकतेवर दिलेला भर नंतरही त्याच्या विचारात टिकून असल्याचे दिसते. त्यामुळे त्याने जीवनाबाबतचा शैवांचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून तो नीतिसन्मुख केला. महान नीतितत्त्वे व शिवदेवता एकरूपच असल्याचे तो मानतो. ‘तया मूल तण्ममेण्णुम् तत्तुवम्’ ह्या त्याच्या प्रसिद्ध उक्तीत त्याच्या ईश्वरविषयक कल्पनेचे सार आले आहे. ईश्वर हा प्रेमाचे वा करुणेचे मूलतत्त्व आहे, असा त्याचा अर्थ. ⇨ तिरुमूलरने म्हटल्याप्रमाणे ‘प्रेम म्हणजेच ईश्वर’ ह्या कल्पनेशी तिरुनावुक्करसरची ईश्वरविषयक कल्पना मिळतीजुळती आहे.
उत्तरायुष्यात त्याने दक्षिण भारतातील तसेच उत्तर भारतातीलही अनेक शिवक्षेत्रांची यात्रा केली. दक्षिणेत तीर्थाटन करीत असतानाच त्याची व तिरुज्ञानसंबंधर ह्या श्रेष्ठ शैव संताची गाठ पडली. संबंधरने त्याची योग्यता ओळखून त्याला अप्पर (पिता) म्हटले. पुढे त्याचे ‘अप्पर’ हेच नाव रूढ झाले. देवालयाच्या आवारातील गवत काढण्यासाठी तो नेहमी खांद्यावर फावडे बाळगी. त्याच्या दक्षिण भारतातील मूर्तींत त्याच्या खांद्यावर फावडे दाखविलेले असते. तमिळमध्ये अनेकांनी तिरुनावुक्करसरची चरित्रे लिहिली असून त्याच्या स्तोत्रांवरही अभ्यासग्रंथ लिहिले आहेत.
सुर्वे, भा. ग.