ताली (स्ट्राँगिल्यूरा स्ट्राँगिल्यूरस)

ताली : बेलोनिडी मत्स्यकुलातील बहुतेक माशांना ताली हे नाव दिलेले आहे. पण विशेषतः स्ट्राँगिल्यूरा वंशाच्या माशांना ताली म्हणतात. भारताच्या सबंध समुद्रकिनाऱ्यावर आणि ब्रम्हदेश व मलाया द्वीपकल्पात हे मासे आढळतात. सगळीकडे आढळणाऱ्या तालीच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव स्ट्राँगिल्यूरा स्ट्राँगिल्यूरस असे आहे.

हे मासे सडपातळ असून त्यांची लांबी ६१ सेमी. पर्यंत असते. शरीर लवचिक असते. डोक्यावर मध्यभागी एक लांब खोबण असते कनीनिका (मध्यभागी रंध्र असलेले डोळ्यातील रंगयुक्त पटल) रुपेरी असते जबडे लांब चोचीसारखे असून दात सरळ व अणकुचीदार असतात शरीरावर चक्राभ (जवळजवळ वाटोळे) खवले असतात पार्श्वरेखा (शरीरावर दोन्ही बाजूंना असणारी व संवेदी पेशींची जागा दाखविणारी उभी रेषा) दुहेरी असते.

डोक्याचा वरचा भाग आणि पाठ पिवळसर हिरव्या रंगाची असून त्यांवर बारीक काळे ठिपके असतात शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी असतात खालची बाजू (उदर) पांढरी गाल आणि प्रच्छद (कल्ल्यांवर असलेले झाकण) रुपेरी पृष्ठपक्ष (हालचालीस उपयुक्त अशी त्वचेची पाठीवरील स्नायुमय घडी म्हणजे पर) चकचकीत पिवळ्या रंगाचा असून त्याचा वरचा काठ काहीसा नारिंगी रंगाचा असतो पुच्छपक्ष पिवळसर अथवा हिरवट असून त्यावर बारीक काळे ठिपके असतात त्याच्या जवळजवळ मध्यभागी निळसर काळा ठिपका असतो.

या माशांचे लहान थवे असून ते समुद्रपृष्ठाजवळ भटकत असतात. हे सर्वभक्षक आहेत. पुष्कळदा इतर लहान माशांच्या थव्यांचा ते पाठलाग करतात व आपल्या तीक्ष्ण जबड्यांनी त्यांना भोसकून खातात. झिंगे व खेकडेदेखील ते खातात.

सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांत अंडी घालण्याकरिता हे मासे नदीमुखात शिरतात व तेथे अंडी घालतात. तंतू असलेली ही अंडी शैवलांना घट्ट चिकटून बसतात. अंड्यांचे निषेचन (फलन) पाण्यात होते.

हे खाद्यमत्स्य असल्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर पुष्कळ ठिकाणी समुद्रात जाळी टाकून यांना पकडतात.

दातार, म. चिं.