तारामीन : (स्टारफिश, सी स्टार). एकायनोडर्माटा संघाच्या ॲस्टरॉयडिया वर्गातील प्राणी (त्यांच्या नावात मीन म्हणजे मासा असा शब्द असला तरी हे मासे नव्हेत). हे समुद्रात राहणारे असून मुक्तजीवी (स्वतःचे अन्न स्वतः मिळवून जगणारे) आहेत. यांच्या विविध जाती जगाच्या बहुतके भागांतील समुद्रकिनाऱ्यांवर मुबलक आढळतात. काही जाती खोल समुद्रात राहणाऱ्या आहेत.
यांचा आकार ताऱ्यासारखा किंवा पंचभुजीय असतो. यांचा व्यास १ सेंमी. पासून ९० सेंमी. पर्यंत आढळतो. रंगात सामान्यतः पिवळा, नारिंगी, गुलाबी व तांबडा यांच्या विविध छटा असतात. तथापि करड्या, हिरव्या, निळ्या आणि जांभळटसर रंगांचे तारामीनही आढळले आहेत. शरीर चापट असून त्याच्या मध्यभागी एक चकती अथवा तबकडी असते आणि तिच्यापासून पाच निमुळते अरीय (त्रिज्यीय) बाहू निघालेले असतात. बाहूंची संख्या सामान्यतः पाच किंवा पाचाच्या पटीत असते. काही जातींत बाहूंची संख्या ४४ पर्यंत (उदा., द. अमेरिकेतील हेलिॲस्टर वंशातील) असते. उष्ण कटिबंधीय क्युलसिटामध्ये शरीर नुसतेच पंचकोनाकृती असते, तर खोल पाण्यात राहणाऱ्या व तेथील चिखलावर उपजीविका करणाऱ्या काही जातींत लांब सर्पांसारखे बाहू आढळतात. बाहूच्या अक्षाला ‘अर’ आणि दोन बाहूंच्या मधील तबकडीवरील जागेला ‘अंतरार’ म्हणतात. शरीराच्या ज्या पृष्ठावर मुख असते त्याला मुखपृष्ठ आणि विरुद्ध पृष्ठाला अपमुखपृष्ठ म्हणतात. मुखपृष्ठ नैसर्गिक स्थितीत खाली आणि अपमुखपृष्ठ वर असते. अपमुखपृष्ठावर पुष्कळ बोथट कॅल्शियमी कंटक (काटे) असतात. कंटकांच्या मधून देहगुहेपासून (शरीरातील पोकळीपासून) निघालेले लहान, पातळ व पारदर्शक भित्ती असलेले मऊ त्वचाक्लोम (श्वसनाकरिता असलेला देहभित्तीचा पोकळ संकोचशील भाग) पुढे आलेले असतात. श्वसन आणि उत्सर्जन हे यांचे कार्य असते. कंटकांच्या भोवती आणि त्वचा क्लोमांच्या मधून चिमट्यांसारख्या सूक्ष्म संदंशिका (पकड घेणाऱ्या संरचना) असतात. यांना स्पर्श झाला की, त्यांची उघडमीट होते. लहान जीव पकडण्याकरिता आणि कचरा काढून टाकून पृष्ठभाग स्वच्छ ठेवण्याकरिता त्यांचा उपयोग होतो. अपमुखपृष्ठाच्या मध्याजवळ बारीक गुदद्वार असते आणि त्याच्या जवळपास छिद्रे असलेले एक लहान गोलसर तकट किंवा मॅड्रेपोराइट (एक चापट, वाटोळे किंवा पंचकोनी, पृष्ठावर खोबणी असलेले व आरपार भोके पडलेले कॅल्शियममय तकट) असतो. मुखपृष्ठाच्या मध्यावर मुख असून ते परिमुख-कलेने (पातळ पटलाने) वेढलेले असते. प्रत्येक बाहूच्या मुखपृष्ठाच्या मध्यावर त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलेली एक लांब खाच असते हिला चरणार प्रसीता म्हणतात. या खाचेच्या दोन्ही काठांवर मोठे कंटक असतात आणि तिच्यापासून पुष्कळ बारीक नालपाद (नळीसारखे पाय) पुढे आलेले असतात. नालपादांच्या चार वा दोन ओळी असतात. प्रत्येक बाहूच्या टोकावर एक लहान मऊ स्पर्शग्राही संस्पर्शक आणि एक प्रकाश–संवेदी नेत्रबिंदू असतो.
सगळे शरीर पक्ष्माभिकामय (केसांसारख्या वाढींनी युक्त असलेल्या) बाह्यत्वचेने आच्छादिलेले असते. हिच्या खाली मध्यस्तर असून त्यात अंतःकंकाल (आतील सांगाडा) असतो. अंतःकंकाल निरनिराळ्या पण निश्चित आकारांच्या अनेक लहान कॅल्शियमी अस्थिकांचा बनलेला असतो. या अस्थिका संयोजी ऊतकात (समान रचना व कार्य असणाऱ्या व जोडणाऱ्या पेशीसमूहात) घट्ट बसविलेल्या असून स्नायुतंतूंनी जोडलेल्या असतात. कंकालाच्या आत मोठी देहगुहा असून तिला पक्ष्माभिकामय उपकलेचे अस्तर असते. देहगुहेत आंतरिक अंगे असतात. देहगुहा लसीकेसारख्या (रक्तद्रवाशी साम्य असणाऱ्या परिवाहक द्रवासारख्या) एका द्रवाने भरलेली असून त्यात मुक्त अमीबीय कोशिका (अमीबासदृश पेशी) असतात आणि त्या परिवहन, श्वसन आणि उत्सर्जन या क्रियांत भाग घेतात. अमीबीय कोशिका द्रवातून निरुपयोगी पदार्थ गोळा करतात आणि त्वचाक्लोमांतून बाहेर पडतात.
जलवाहिका तंत्र (ज्या वाहिन्यांमधून पाण्यासारख्या पातळ द्रवाचे परिवहन होते त्यांची बनलेली शरीरसंस्था) हा देहगुहेचा विशेषित भाग असून तो पुढील विभागांचा बनलेला असतो : (१) चाळणीसारखा मॅड्रेपोराइट, यातून समुद्राचे पाणी आत जाऊ शकते (२) अश्मनाल, हा मॅड्रेपोराइटापासून निघून वलयनालाला जोडलेला असतो (३) वलयनाल, हा मुखाभोवती असतो (४) अरीय नाल, हे पाच असून वलयनालापासून निघालेले असतात प्रत्येक बाहूमध्ये चरणार प्रसीतेच्या वर एक अरीय नाल असून तो बाहूच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलेला असतो (५) पार्श्वनाल, हे अरीय नालांच्या दोन्ही बाजूंपासून निघालेले असतात (६) नालपाद, प्रत्येक नालपादाला एक पार्श्वनाल गेलेला असतो. वलयनालाच्या काठावर टीडेमान काय (एफ्. टीडेमान यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथिसदृश संरचना) असतात. जलवाहिका तंत्रातील द्रवात असणाऱ्या अमीबीय कोशिका या कायात उत्पन्न होतात.
प्रत्येक नालपाद दंडगोलाकार असून त्याच्या बाहेरच्या म्हणजे मोकळ्या टोकाशी चूषक (चोषण करून निर्वात निर्माण करणारे इंद्रिय) असतो आणि आतल्या म्हणजे देहगुहेत असणाऱ्या टोकावर फुग्यासारखी तुंबिका असते. दंडगोलाच्या भित्ती स्नायुमय असतात. तुंबिकेच्या संकोचनाने तिच्यातील द्रव नालपादात शिरतो आणि तो लांब, बारीक व लवचिक होऊन सगळीकडे वळविता येतो. मोकळ्या टोकाचा एखाद्या वस्तूला स्पर्श झाल्यावर स्नायूंचे संकोचन होऊन द्रव तुंबिकेत परत जातो व नालपाद आखूड होतो. तुंबिकेत द्रव परत गेल्यामुळे टोकाच्या भागातील दाब कमी होतो व ते टोक समुद्राच्या पाण्याच्या अथवा वातावरणाच्या दाबामुळे वस्तूला घट्ट चिकटते. नालपादांचा उपयोग चालण्याकरिता, एखाद्या आधाराला चिकटण्याकरिता आणि भक्ष्य पकडण्याकरिता होतो.
पचन तंत्रात मुख, जठर, यकृत अंधनाल (बाहेरच्या टोकाशी बंद असलेली नळी), आंत्र (आतडे) आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. मुख ताणून मोठे होऊ शकत असल्यामुळे यांना सापेक्षतेने मोठे प्राणी खाता येतात. जठर पिशवीसारखे असून त्याचे दोन भाग असतात : एक मोठा खालचा जठरागमी भाग आणि दुसरा लहान अपमुखपृष्ठीय अथवा जठरनिर्गमी भाग. जठरागमी भागाच्या भित्ती पातळ, घड्या पडलेल्या व स्नायुमय असतात आणि त्यांना प्रत्याकर्षक (आकुंचन पावून इंद्रिय आत ओढून घेणाऱ्या) स्नायूंच्या पाच जोड्या चिकटलेल्या असतात. जठरनिर्गमी भागात बाहूंमध्ये असलेल्या यकृत अंधनालांच्या (पचन ग्रंथीच्या) पाच जोड्यांपासून निघणाऱ्या वाहिन्या उघडतात. आंत्र अगदी आखूड व लहान असते.
रुधिर अथवा परिवहन तंत्राचा (रक्ताभिसरण संस्थेचा) ऱ्हास झालेला असून ते स्पष्ट दिसत नाही. त्यात मुखाभोवती असलेल्या वाहिन्या व पाच अरीय वाहिन्या (प्रत्येक बाहूत जलवाहिका तंत्राच्या नालाखाली एक) यांचा समावेश होतो.
तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) परिमुख तंत्रिकावलय (मुखाभोवतील मज्जांचे वलय) आणि बाहूंमधील तंत्रिका व तंत्रिका रज्जू यांचा समावेश होतो. प्रत्येक बाहूत पुढील तंत्रिका असतात : (१) चरणार प्रसीतेच्या आत बाह्यत्वचेमध्ये एक तंत्रिका रज्जू, (२) याच बाह्यत्वचेच्या आतल्या बाजूला खोलावर तंत्रिकांची एक जोडी व (३) अपमुखपृष्ठाच्या बाजूला पर्युदरात (उदरातील इंद्रियांवरील पातळ आवरणात) एक तंत्रिका रज्जू. नालपाद, बाह्यत्वचा आणि आंतरिक संरचनांना सूक्ष्म तंत्रिका गेलेल्या असतात.
लिंगे भिन्न असतात. प्रत्येक बाहूच्या बुडात जनन ग्रंथीची (अंडाशय अथवा वृषण म्हणजे शुक्राणूंची निर्मिती करणाऱ्या ग्रंथीची) एक जोडी असते. यांच्यापासून निघणाऱ्या बारीक वाहिन्या बाहूंच्या बुडाजवळ अपमुखपृष्ठावर उघडतात. शुक्राणू किंवा अंडी समुद्राच्या पाण्यात सोडली जातात आणि पाण्यातच अंड्यांचे निषेचन (फलन) होते. अंड्यातून बायपिनॅरिया डिंभ (भ्रणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थाः → डिंभ) बाहेर पडतो आणि त्याच्या रूपांतरणाने तारामीन उत्पन्न होतो. काही जातीत बायपिनॅरियाची वाढ होऊन त्याच्यापासून ब्रॅकिओलेरिया डिंभ तयार होतो. सु. सहा–सात आठवड्यांनी हा डिंभ तळाशी जाऊन एका देठाने एखाद्या आधाराला चिकटतो. तेथे त्याचे रूपांतरण होऊन तारामीन उत्पन्न होतो.
तारामिनांच्या अंगी पुनरुत्पादनाची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. अपघाताने किंवा इतर काही कारणांमुळे तारामिनाचे एक किंवा अधिक बाहू तुटले, तर त्यांच्या जागी नवीन उत्पन्न होतात. काही जातीत शरीरापासून अलग झालेल्या एका बाहूपासून शरीर आणि बाकीचे बाहू उत्पन्न होतात.
तारामीन आपला बहुतेक वेळ एखाद्या वस्तूला चिकटून राहण्यात घालवितो. त्याचे शरीर दिसायला ताठ व कडक असते, परंतु तो ते वाकवून पाहिजे तसे वळवू शकतो. सरळ उभ्या अथवा खडबडीत पृष्ठभागावर तो नालपादांनी चालतो, पण वाळूवर किंवा गुळगुळीत पृष्ठभागावर केवळ बाहूंचा उपयोग करून तो पुढे जातो.
तारामीन क्रस्टेशियन (कवचधारी) व मॉलस्क (मृदुकाय) प्राणी, नलिका–कृमी आणि इतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी खातो. पण कालवे, क्लॅम व ऑयस्टर हे मृदुकाय प्राणी त्याला विशेष आवडतात. कालव मोठे असल्यामुळे त्याला गिळता येत नाही, म्हणून त्याच्या दोन्ही शिंपांवर नालपादांनी घट्ट पकड घेऊन विरुद्ध बाजूंनी जोराने खेचून तो मिटलेल्या शिंपा अलग करतो. नंतर मुखातून जठर बाहेर काढून ते कालवाच्या शरीराभोवती पसरून त्यावर पाचक रस सोडतो. त्यामुळे त्याचे पचन होते. काही वेळाने या पचन झालेल्या अन्नासहित तो हळूहळू जठर शरीरात ओढून घेतो. खोल पाण्यात राहणारे तारामीन अन्नकण मिसळलेला समुद्रतळावरचा चिखल खातात. तारामीन खादाड आहेत, पण अन्नाशिवाय ते कित्येक दिवस राहू शकतात. ऑयस्टरांचे संवर्धन आणि व्यापार करणाऱ्यांचे तारामीन हे शत्रू होत. फक्त काही थोड्या प्राण्यांना तारामिनांचा खाद्य म्हणून उपयोग होतो. माणसाला त्यांचा काहीच उपयोग होत नाही.
पहा : ॲस्टरॉयडिया एकायनोडर्माटा.
कर्वे, ज. नी.
“